Press "Enter" to skip to content

नामदेव शंकर गोंधळी यांचा घणाघाती आरोप

शासकीय अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीने गिळंकृत केली जमीन

सिटी बेल ∆ पनवेल ∆

शासकीय अधिकाऱ्यांनी अभद्र युती करून माझी आणि माझ्या काकांचे वारसदार यांची जमीन गिळंकृत केल्याचा खळबळजनक आरोप वावंजे येथील मूळ जमीन मालक नामदेव शंकर गोंधळी यांनी केला आहे. पनवेल तहसीलदार कार्यालयासमोर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. तत्पूर्वी सदर प्रकरणाची इत्यंभूत माहिती देणारे फलक त्यांनी पनवेल शहर हद्दीत लावल्याने कोण नामदेव शंकर गोंधळी? अशी चर्चा सर्वत्र झडत होती. नुकतेच प्रसिद्धी माध्यमांसमोर येऊन त्यांनी या प्रकरणाची विस्तृत माहिती दिली.

एखादा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपल्या क्षेत्रात आला की क्षेत्राच्या विकासाची गाडी जोरदार धावत सुटते असे म्हणतात. पनवेल तालुक्यात मात्र प्रकल्प येण्यापूर्वीच त्याच्या लाभाच्या जमिनीच्या तुकड्यांचे पळवा पळवी सुरू झाल्याचे विदारक दृश्य दिसून येते. याबाबत मूळ हकीकत अशी की तक्रारकरते नामदेव शंकर गोंधळी यांच्या कुटुंबाच्या मालकीची वावंजे येथे सर्वे क्रमांक 123/2 वर 38.70 गुंठे जमीन आहे. कौटुंबिक वाटणी नुसार दक्षिणेकडील 18.70 गुंठे क्षेत्र त्यांच्या मालकीचे असून उत्तर दिशेकडील 17.70 क्षेत्र त्यांच्या काकांच्या मालकीचे आहे.

नामदेव गोंधळी यांनी 20 नोव्हेंबर 2019 रोजी केलेल्या वचन चिठ्ठीनुसार सिद्धार्थ भल्ला यांना त्यांच्या हिश्याची जमीन विकण्याचा निर्णय घेतला.4 लाख 35 हजार रुपये प्रति गुंठा दराने सदरचा व्यवहार ठरला. परंतु सिद्धार्थ भल्ला यांनी सदर जमीन विक्रांत संसारे यांच्या नावाने विकत घेण्याचे निश्चित केल्यामुळे हे खरेदीखत नामदेव गोंधळी आणि विक्रांत संसारे यांच्या दरम्यान नोंदणीकृत करण्यात आले. दरम्यानच्या कालखंडात नामदेव गोंधळे यांना कर्करोगाने ग्रासले. ते कामाला असलेल्या दीपक फर्टिलायझर्स कंपनीतील सहकाऱ्यांनी त्यांना अत्यंत उच्च दर्जाचे वैद्यकीय उपचार मिळवून दिल्यामुळे ते या असाध्य रोगावरती मात करू शकले. त्यानंतर त्यांच्या असे निदर्शनास आले की यादरम्यान खोटे दस्तावेज बनवून सदरच्या खरेदी खतानुसार त्यांच्या काकांची जमीन देखील विक्री केली असे नमूद होते.

यानंतर सदर प्रकरणात गोंधळी आणखीन खोलात शिरून तमाम खोट्या दस्तावेजांची प्रत मिळवली. त्यांचे सहकारी व कंपनीतील कामगार युनियन चे जनरल सेक्रेटरी प्रकाश म्हात्रे यांनी सदरचे प्रकरण सचिन भाऊ आहेर यांना देखील कळविले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणात लक्ष घालण्यास विनंती केली. सदर प्रकरणात जिल्हाधिकारी महोदयांनी चौकशी करून फौजदारी गुन्हे नोंदविण्याचा शेरा मारला असल्याचे गोंधळी यांना खात्रीलायक सूत्राकडून समजले आहे. परंतु सदरच्या आदेशाची प्रत देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून टाळाटाळ होत असल्याचा आरोप देखील गोंधळी करतात.

वास्तविक सदर जमिनीची पुनरमोजणी करण्याची विनंती देखील गोंधळी यांनी केली होती. सदर जमिनीतील सात एकर जमीन कॉरिडोर प्रकल्पात जाणार असल्याने त्यासाठीच तर हा सारा अट्टाहास केला नाही ना? असा संशय देखील निर्माण होतो. कर्करोग ग्रस्त नामदेव गोंधळी हे जमीन विकल्यानंतर या आजारातून बरे होतील याची शक्यता नाही असे गृहीत धरून कुणा एजंटाने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरत हा उपद्व्याप केला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

याबाबत तहसीलदार विजय तळेकर यांनी मात्र तक्रारदार अत्यंत खोडसाळ,निराधार पद्धतीने आरोप करत असून सदर प्रकरणात काहीही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. आजही आपण सदरच्या मिळकतीचा सातबारा उतारा पाहिला असता त्यावर गोंधळी यांनी जमीन विकलेले संसारे आणि त्यांचे काका याची संयुक्त नोंद आढळते. नामदेव गोंधळी यांची जमीन मोजणी बाबत तक्रार होती. त्यावर मुख्य अधीक्षक, भूमी अभिलेख अलिबाग यांच्या कार्यालयातून चौकशी सुरू आहे. परंतु महसूल विभागावर त्यांनी केलेले आरोप मात्र पूर्णपणे निराधार आहेत असे सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.