तब्बल दिड कोटी रुपये कर्जाची जिल्हा परिषदेकडे मागणी :
काही ग्रामस्थांचा मात्र विरोध !
सिटी बेल लाइव्ह / विनोद भोईर / पाली #
सुधागड तालुक्यातील रासळ ग्रुप ग्रामपंचायतीने गावाच्या विकासासाठी जिल्हा परिषदेकडे तब्बल दीड कोटी रुपये कर्जाची मागणी केली आहे. आर्थिक दृष्ट्या सक्षम व सधन असलेल्या ग्रामपंचायतीला इतके मोठे कर्ज घेण्याची आवश्यकता का आहे ? अशी विचारणा काही ग्रामस्थांनी करत या कर्जाला विरोध केला असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे कर्ज मंजूर न करण्याची मागणी निवेदना द्वारे केली आहे.
सागर मोरे , महेश सितापराव, चंद्रकांत जाधव, दर्शन मोरे, प्रवीण खाडे,सुभाष कदम, निलेश लहाने, चंद्रकांत खाडे, चंद्रकांत म्हसके, उमेश म्हसके, मारुती तेलंगे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
तसेच कर्ज मंजूर झाल्यास कायदेशीर लढाई व मुलाबाळांसह जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देखील दिला आहे.
रासळ ग्रामस्थांनी आपल्या निवेदनात सांगितले आहे की रासळ ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचा दाखला तालुक्यात दिला जातो. तसेच ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या कंपन्यांकडून मिळणाऱ्या सीएसआर फंडातून, लोकप्रतिनिधींच्या स्थानिक विकास निधीतून आजपर्यंत ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास केला जात आहे. असे असताना 26 फेब्रुवारी रोजीच्या तहकूब ग्रामसभेमध्ये ठराव क्रमांक 44/1 नुसार ग्रामपंचायतीच्या विकास कामांकरिता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तब्बल दीड कोटी रकमेचे कर्ज घेण्याकरिता हा प्रस्ताव दाखल केला आहे. परंतु अशा पद्धतीने कर्ज काढून ग्रामपंचायतमध्ये विकास कामे करणे आवश्यक नसल्याचे काही ग्रामस्थांचे मत आहे. सदर कर्ज काढून मिळणाऱ्या निधीचा चुकीच्या पद्धतीने वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वरील सर्व बाबींचा विचार केला असता ग्रामपंचायतीला कर्ज घेण्यासाठी आवश्यकता ग्रामस्थांना वाटत नाही. तरी या कारणाकरिता करण्यात आलेल्या कर्ज प्रस्तावाला काही ग्रामस्थांनी विरोध केला असून या विरोधाची नोंद घेऊन हा कर्ज प्रस्ताव थांबवण्याची कारवाई करण्यात यावी अशी विनंती काही ग्रामस्थांनी तक्रारी अर्जाद्वारे केली आहे. या अर्जानंतर देखील जिल्हा परिषदेकडून कर्ज प्रकरणाच्या बाबतीत पुढील कारवाई केली गेली, तर कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल. ग्रामस्थ आपल्या मुलाबाळांना घेऊन जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत असा इशारा रासळ ग्रामस्थांनी आपल्या तक्रारी अर्जामध्ये दिला आहे.
सुधागड तालुक्यातील एक श्रीमंत ग्रामपंचायत असून अंदाजे सव्वा कोटी रुपये वार्षिक बजेट ग्रामपंचायतीचे आहे. एवढे मोठे वार्षिक उत्पन्न असताना ग्रामपंचायतीने सरकारकडून दीड कोटीचे कर्ज घेण्याची गरज नाही. याबाबतीत ग्रामस्थांना अंधारात ठेवून विकास निधीच्या नावाखाली कोणाचा विकास साधणार आहेत ? ग्रामपंचायतीचा की सदस्यांचा ? मागील सहा वर्षात उपलब्ध साडे सात कोटी रुपये निधीचा वापर करून कोणती विकासकामे गावातून केली? आणि कोणाचा विकास झाला हा संशोधनाचा विषय आहे? त्यामुळे कर्ज प्रकरणात ग्रामस्थांचा विरोध असून याबाबत निवेदन जिल्हा परिषदेकडे पाठवले असून जिल्हा परिषद नियोजन सदस्य किशोर जैन यांच्याकडे ग्रामस्थांनी आपली व्यथा मांडली असून शिवसेना पूर्णपणे ग्रामस्थांच्या पाठी उभी राहणार आहे.
विनेश सितापराव,
ग्रामस्थ,रासळ
केवळ राजकीय द्वेषापोटी काही लोक गावाच्या विकास कामाच्या आड येत आहेत. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन तसेच ग्रामसभेचा ठराव व मासिक ठराव घेऊन व आवश्यक कार्यवाही करूनच कर्जाची मागणी केली आहे. या कर्ज रकमेतून गावात अंतर्गत भुयारी गटारे, रस्ते व पाणी सुविधा, तसेच ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये विविध विकास कामे आणि अद्ययावत ग्रामपंचायत कार्यालय अशी विविध विकास कामे होणार आहेत. या कर्जाची ग्रामपंचायत योग्य मुदतीत परतफेड देखील करणार आहे.
नरेश खाडे,
उपसरपंच,
ग्रामपंचायत, रासळ






Be First to Comment