मी यशवंतराव आहे पण.. चव्हाण नाही, मी ठाकरे आहे पण.. बाळासाहेब नाही !
सिटी बेल ∆ पनवेल ∆
काही व्यक्तिमत्त्वांसाठी वय हे केवळ एक आकडा असते. अशांपैकीच एक असणारे, निस्सीम समाजसेवेचा वसा घेतलेले यशवंतराव ठाकरे २१ डिसेंबर रोजी ९१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. काँग्रेस पक्षाच्या सर्व समावेशक समाजकारणाच्या संस्काराशी अत्यंत एकनिष्ठ असणारे यशवंत ठाकरे आजही त्याच उर्जेने, त्याच सजग वृत्तीने, सेवाभावी कार्य करत आहेत. नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त पदी काम केलेले ठाकरे यांनी हाफकिन इन्स्टिट्यूट चे संचालक म्हणून निवृत्तीपर्यंत सेवा दिली. निवृत्तीनंतरच्या सेकंड इनिंग मध्ये पनवेल प्रवासी संघ, ज्येष्ठ नागरिक संघ, लायन्स क्लब, तळोजा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, रेल्वे स्थानक सल्लागार समिती अशा अनेक सेवाभावी संस्थांतून ते आजही त्याच तडफेने कार्य करत आहेत.
मूळचे चंद्रपूरचे असणारे यशवंत ठाकरे यांचा जन्म २१ डिसेंबर १९३२ रोजी त्यांचे आजोळ यवतमाळ जिल्ह्यातील वणी या गावी झाला. तीन भाऊ आणि दोन बहिणी अशा भावंडांच्यात ते सगळ्यात थोरले. काँग्रेसच्या विचारधारेचा वारसा त्यांना घरातूनच प्राप्त झाला. मूळताच हुशार असणाऱ्या यशवंत ठाकरे यांनी चौथीपर्यंतचे शिक्षण मुन्सिपलिटीच्या प्राथमिक शाळेतून घेतले. संपूर्ण जिल्ह्यातून तिसरे आलेल्या ठाकरे यांना गव्हर्मेंट जुबली हायस्कूलमध्ये सरळ सरळ प्रवेश मिळाला. त्याकाळी मॅट्रिक होणे हे देखील अत्यंत सन्मानाचे समजले जायचे. परंतु गव्हर्मेंट जुबिली हायस्कूलचा अगोदरच्या वर्षी मॅट्रिकचा रिझल्ट शून्य टक्के लागला होता. ठाकरे ज्या बॅच मधून मॅट्रिक झाले त्या बॅचमध्ये अवघी दोन मुले उत्तीर्ण झाली होती. चंद्रपूर मध्ये महाविद्यालयीन शिक्षणाची सोय नसल्याकारणामुळे ठाकरे यांनी नागपूर मधील सिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ठाकरे यांना फिजिओलॉजी हायजिन हा विषय देखील घ्यावा लागला. विशेष म्हणजे आयत्यावेळी पदरात पडलेल्या या विषयाच्या संपूर्ण वर्षाचा अभ्यास त्यांनी अवघ्या दोन महिन्यात पूर्ण केला. बी ए झाल्यानंतर ठाकरे यांनी सोशीओलॉजी मधून एम ए करायचे ठरविले. परंतु पदवी प्राप्त करेपर्यंत हा विषय कधीही अध्ययनात नसल्यामुळे त्यांना महाविद्यालय प्रशासनाने प्रवेश देण्यास नकार दिला. परंतु परिस्थिती पुढे झुकतील तर ते यशवंत ठाकरे कुठले? प्राचार्य डॉक्टर मोजेस यांना थेट भेटून त्यांनी ते करत असलेल्या समाजकार्याबद्दल अवगत केले. ठाकरे त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्ष असलेल्या भारत सेवक समाज या सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते होते. विद्यार्थी दशेत असताना वैद्यकीय विद्यार्थ्यांना जोडीला घेत ते उन्हाळी सुट्ट्यांच्यात दुर्गम खेड्यांमध्ये जाऊन लहान मुलांकरता स्वच्छता शिबिर, आरोग्य शिबिर असे उपक्रम घेत असतात. अखेरीस प्राचार्य डॉक्टर मोजेस यांनी तीन महिन्याच्या प्रोव्हिजनल कंडिशन वरती प्रवेश दिला. ठाकरे यांची सचोटी पाहून अखेर महाविद्यालय प्रशासनाने त्यांना सोशीओलॉजी मध्ये एम कॉम करण्याची अनुमती दिली.
विशेष उल्लेखनीय म्हणजे मास्टर ऑफ आर्ट्स करत असताना यशवंत ठाकरे एल एल बी सुद्धा करत होते.इतकेच नव्हे तर मधल्या काळात ते पोस्ट व तार विभागात ऑडिटर म्हणून काम देखील करत होते. शिक्षण घेता घेता या ठिकाणी त्यांनी दोन वर्षे काम केले. सकाळी एल एल बी चे वर्ग त्यानंतर दहा ते चार वाजेपर्यंत पोस्ट व तार विभागात नोकरी आणि त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात मास्टर ऑफ आर्ट्स चे वर्ग. जवळजवळ अशक्य कोटीतील वाटावी अशी ही जीवनशैली जगलेले यशवंत ठाकरे यांच्या ठायी असलेल्या ऊर्जेची यावरूनच कल्पना येते. या दोन्ही पदव्या त्यांना एकाच पदवीदान समारंभात प्रदान करण्यात आल्या हे आणखीन विशेष. ज्या तळमळीने यशवंत ठाकरे यांनी त्यांचे शैक्षणिक कारकीर्द पूर्ण केली तो आजच्या जमान्यातील विद्यार्थ्यांकरता एक आदर्शवत असा दाखला असेल.
त्यानंतर काही काळासाठी यशवंत ठाकरे मुंबईमध्ये आले. मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या पुढाकाराने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथे काही महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविले जाणार होते. त्याकरता रिसर्च असिस्टंट म्हणून यशवंत ठाकरे यांनी अर्ज केला, पुढे त्यांचे सिलेक्शन झाले ते रुजू झाले. येथे त्यांनी जवळपास आठ महिने काम केले आहे. त्यानंतर एका मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी नागपूर महानगरपालिकेत अर्ज केला. स्थायी समिती सदस्यांनी घेतलेल्या इंटरव्यू मध्ये अव्वल नंबराने सिलेक्ट होऊन ते पब्लिक कन्वेंयंस सुप्रीमटेंडंट म्हणून रुजू झाले. नागपूर महानगरपालिकेत सेवा देत असताना त्यांनी अनेक माइल स्टोन प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. येथील प्रभागांचे विस्तारीकरण करण्याच्या प्रक्रियेत यशवंत ठाकरे यांचे योगदान अतुलनिय आहे.५६ वरून ७५ प्रभाग बनविण्याची प्रक्रिया यशवंत ठाकरे यांच्या सक्षम खांद्यावर सोपविण्यात आली. रेकॉर्ड ब्रेक वेळेमध्ये यशवंत ठाकरे यांनी ही जबाबदारी अत्यंत नेटाने व खुबीने निभावली. साउथ ईस्ट एशिया मधून शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचे काम देखील यशवंत ठाकरे करत असत. जवळपास शंभर टक्के कर्मचारी संपावर गेले असताना सुद्धा नागपूर महानगरपालिकेतील नागरिकांना पायाभूत सुविधा मिळवून देण्याचे त्यांचे कार्य अफाट आहे. पुढे तेरा वर्षे सेवा दिल्यानंतर आयुक्त गवई यांच्या सल्ल्यानुसार यशवंत ठाकरे यांनी नागपूर महानगरपालिका सोडून पब्लिक सर्विसेस मध्ये अर्ज करण्याचे ठरविले.
वास्तविक महानगरपालिकेच्या भ्रष्टव्यवस्थेमध्ये यशवंत ठाकरे यांच्यासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या, प्रामाणिक आणि हुशार व्यक्तिमत्त्वाने राहू नये असे प्रामाणिक मत आयुक्त गवई यांचे होते.हाफकीन इन्स्टिट्यूट मध्ये यशवंत ठाकरे रुजू झाले त्यावेळेस या संस्थेमध्ये अकराशे कर्मचारी कार्यरत होते. इम्युनायझेशन हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याची जबाबदारी या संस्थेवरती होती. याच संस्थेमध्ये यशवंत ठाकरे यांची स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी भेट झाली. त्यावेळी राजीव गांधी पायलट होते. आई पंतप्रधान असून देखील कुठलाही बडेजाव न करता अत्यंत साधेपणाने एका मित्राच्या पत्नीसाठी ब्लड प्लाजमा घ्यायला आलेले राजीव गांधी यांना खरंतर तिथे कोणी चटकन ओळखले देखील नाही. काँग्रेसमध्ये अशा उदात्त विचारसरणीच्या लोकांसोबत काम करायला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो असे यशवंत ठाकरे यांचे म्हणणे आहे.
ठाकरे यांचा पिंड अगदी सुरुवातीपासूनच समाजासेवेचा राहिला आहे. अगदी एक दोन दिवसाची सुट्टी मिळाली तरी सुद्धा ठाकरे विद्यार्थ्यांची शिबिरे आयोजित करत असत. हिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये सगळे विद्यार्थी मित्र आजूबाजूच्या खेड्यात जाऊन श्रमदान करत असत. रस्ते बांधणे, कालवे खोदून देणे अशी कार्य ते करत असत. अशाच एका शिबिराचे वेळेस नागपूर चंद्रपूर नॅरो गेज वरती रेल्वेला अपघात झाल्याचे समजले. शिबिरातील विद्यार्थ्यांना सोबत घेत ठाकरे यांनी मदत कार्यात स्वतःस झोकून दिले. याची दखल घेत जगजीवन राम यांनी स्वतः ठाकरे यांचे आभार मानणारे पत्र लिहिले आहे.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचा पगडा असणारे यशवंतराव ठाकरे हे स्वतः पंडितजींना दोन वेळेस भेटले आहेत.१९५५ साली नागपूर युनिव्हर्सिटी च्या विद्यार्थी मित्रांसमवेत पहिल्यांदा ते भेटले, तर नागपूर महानगरपालिकेत असताना जानेवारी १९५९ मध्ये काँग्रेस अधिवेशनादरम्यान पंडित जी, इंदिरा गांधी आणि कृष्ण मेनन यांच्या समवेत वार्तालाप करण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी संतश्रेष्ठ तुकडोजी महाराज यांच्या समवेत त्यांनी भजने गायली आहेत.१९४२ च्या चले जाव चळवळीमध्ये लोकांचे प्रबोधन करताना तुकडोजी महाराज यांनी, पत्थर सारे बम बनेंगे.. वानर बनेगी सेना.. असे भजन रचले होते. त्यावेळी तुकडोजी महाराजांना चालू भाजनातून ब्रिटिश सरकारने अटक केली होती. या घटनेचे यशवंत ठाकरे स्वतः साक्षीदार आहेत. इतकेच नव्हे तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म त्यागून नवबौद्ध बांधवांना दीक्षा दिली त्या ऐतिहासिक कार्यक्रमाचे देखील यशवंत ठाकरे साक्षीदार आहेत.
लायन्स क्लब ऑफ न्यू पनवेल स्टील टाऊन मधून यशवंत ठाकरे आजही हीरीरीने प्रत्येक उपक्रमात सहभागी होतात. लायन्स क्लबचे इंटरनॅशनल प्रेसिडेंट यांनी त्यांना विशेष मेडल देऊन गौरविले आहे.२५ सदस्य जोडल्याबद्दल हा बहुमान देण्यात येतो. इतकेच नव्हे तर क्लबच्या आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी ते आज पर्यंत चार वेळा प्रदेशात गेले आहेत. हाँगकाँग, कॅनडामधील टोरंटो, अमेरिकेतील होनुलुलू आणि इटली मधील कॉन्व्होकेशन मध्ये ते सहभागी झाले आहेत. समाजसेवेत त्यांच्या पत्नीची त्यांना तोलामोलाची साथ लाभली. दुर्गम विभागातील आदिवासी बांधवांसाठी समाजकार्य करता यावे म्हणून त्यांची पत्नी उषा ठाकरे यांनी नातेवाईकांच्या माध्यमातून सतरा लाख रुपयांचा निधी उभारला. ती रक्कम मुदत ठेवींमध्ये ठेवून त्यावर प्राप्त होणाऱ्या व्याजाच्या रकमेतून लायन्स क्लबचे बहुतांश उपक्रम चालतात.
१९९४ साली यशवंत ठाकरे नवीन पनवेलच्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये जोडले गेले. पुढे 1999 साली ते या संघाचे अध्यक्ष झाले. या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून त्यांनी 300 स्क्वेअर मीटरचा भूखंड प्राप्त केला. लोकसहभागातून तळमजला बांधून काढला. तत्कालीन खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निधीमधून प्राप्त झालेल्या रकमेच्या जोरावर पहिला मजला देखील बांधून काढला. यशवंत ठाकरे कार्यरत असणाऱ्या या ज्येष्ठ नागरिक संघाचा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सर्वोत्कृष्ट जेष्ठ नागरिक संघ म्हणून पुरस्कार देऊन गौरव केला आहे. अर्थातच या साऱ्यामध्ये यशवंत ठाकरे यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
पनवेल प्रवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भक्ती कुमार दवे यांच्या नेतृत्वाखाली यशवंत ठाकरे उपाध्यक्ष या नात्याने या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. सेंट्रल रेल्वेच्या पनवेल स्टेशन कन्सल्टिटिव्ह कमिटीचे ते सन्माननीय सदस्य आहेत. अध्यक्ष दवे आणि सचिव श्रीकांत बापट यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून यशवंत ठाकरे प्रवाशांच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी अग्रस्थानी असतात.१९९१ पासून त्यांच्या जावयाच्या आग्रहाखातर तळोजा मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सेक्रेटरी जनरल म्हणून त्यांनी अत्यंत यशस्वीपणे कारभार पाहिला आहे. जवळपास ४५० कंपन्या असणाऱ्या या औद्योगिक वसाहतीतील समस्या सोडविण्यासाठी यशवंत ठाकरे यांचा प्रगल्भ अनुभव अत्यंत कामी आला आहे. संस्थेने कर्ज काढून इमारत बांधल्यानंतर हप्ते फेडायचे कसे ? ही विवंचना असताना. अबकारी कराच्या कार्यालयाचे एक्सटेंशन काउंटर या इमारतीत सुरू करून त्यांनी मॅन्युफॅक्चररना एक सुविधा निर्माण करून दिली तसेच एक कायमस्वरूपी रेवेन्यू जनरेशन मॉडेल निर्माण करून दिले. अशी अनेक अशक्य कोटीची वाटणारी कामे लिलया करणारे यशवंत ठाकरे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून समाजामध्ये ताठ मानेने उभे आहे. समाजातील प्रत्येक घटकाने या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श आपल्या डोळ्यापुढे ठेवला पाहिजे.
यशस्वी जीवन जगण्यापेक्षा समाधानी जीवन जगणे अत्यंत महत्त्वाचे! या सिद्धांतावर यशवंत ठाकरे यांचा पराकोटीचा विश्वास आहे. काँग्रेस हा पक्ष नसून तो एक विचार आहे ही शिकवण ते आजच्या पिढीला देतात. मी अखेरच्या श्वासापर्यंत एक काँग्रेसी राहीन असा कणखर आत्मविश्वास देखील ते जागवतात. अशा व्यक्तिमत्त्वाला केवळ एका लेखात बांधणे अशक्य आहे. आज यशवंत ठाकरे यांच्या बद्दल मी जितकं लिहिलं आहे ते एखाद्या हिमनगासारखे आहे. शब्द मर्यादेमुळे जितकं लिहिलंय त्याच्या तीन पट अजून लिहायचं बाकी आहे. त्यांच्या शतकपूर्ती पर्यंत ते नक्कीच लिहून काढेन. यशवंत ठाकरे यांना दीर्घ आयुष्य,उत्तम आरोग्य लाभो, त्यांच्या ठाई असणारा ऊर्जा स्त्रोत असाच खळखळता वाहत राहो या सदीच्छेसह त्यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
तीर्थक्षेत्र अवश्य फिरा पण आधुनिक भारतातील तीर्थक्षेत्र देखील आवर्जून पहा
– यशवंतराव ठाकरे
जन्मदिनाच्या निमित्ताने आज सगळ्यांना काय संदेश द्याल असे विचारले असता यशवंतराव ठाकरे म्हणाले की मी तोच संदेश तीन जो पंडित जवाहरलाल नेहरूंनी आम्हाला विद्यार्थीदशेमध्ये दिला होता. ते म्हणाले होते की तीर्थक्षेत्र जरूर फिरावेत परंतु आधुनिक भारताने निर्माण केलेल्या आधुनिक तीर्थक्षेत्रांना देखील तुम्ही भेटी दिल्या पाहिजेत आणि भारताच्या जडणघडणीमध्ये त्यांचे असलेले महत्त्व जाणून घेतले पाहिजे. भाक्रा नांगल धरण, दामोदर व्हॅली प्रोजेक्ट, हीराकुंड डॅम, विशाखापट्टणम शिप यार्ड, पुणे डिफेन्स अकॅडमी अशी पाच आधुनिक तीर्थक्षेत्रे भारत आणि निर्माण केली आहेत. देशाच्या जडणघडणीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असणारी ही तीर्थक्षेत्र प्रत्येक भारतीयाने पाहिलीच पाहिजेत.
Be First to Comment