Press "Enter" to skip to content

उरणमधील शाळांकडून पालकांवर फी ची सक्ती


सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)

कोरोना कोविड १९ च्या महामारीत पालकांकडून पाल्याच्या फी ची सक्ती करू नये असे सक्त आदेश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले असतानाही उरणमधील शाळा कडून पाल्याच्या फी ची सक्ती पालक वर्गावर केली जात असल्याने पालक वर्गात नाराजीचा सूर निघत आहे.

गेले ४ ते ५ महिन्यापासून कोरोना कोविड १९ महामारीचे संकट राज्यात सुरू आहे. या कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमावत कुटुंब पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव मुलांवर होऊ नये म्हणून राज्यातील शाळा, कॉलेज अद्याप सुरू झालेले नाहीत. जो पर्यंत शाळा सुरू होत नाही तोपर्यंत मुलांकडून कोणत्याही प्रकारची फी वसुली करण्यात येऊ नये अशा प्रकारचे आदेश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले असतानाही उरणमधील काही शाळांकडून पालकांवर फी भरण्याची सक्ती का केली जात आहे.

या शाळांची परिस्थिती सदन असतानाही ते शिक्षकांमार्फत फी वसुलीची सक्ती करीत आहेत. मुलांची फी वसुली झाली तरच तुमचा पगार करता येईल असे शाळा प्रशासन कमिटीकडून सांगितले जात असल्यानेच आम्हाला नाईलाजाने पालकांना फी भरण्यासाठी फोन करावा लागत असल्याची माहिती काही शिक्षकवर्गांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. तसेच एवढी वर्षे शाळा प्रशासनाने जी फी किंवा इतर रक्कम गोळा केली त्याचा हिशोब पालक संघटना किंवा पालकांना देण्याची कधी तसदी का घेतली का ? हे न समजण्या इतपत पालक नक्कीच दुधखुळे नाहीत.

कोरोनाच्या महामारी संकटात सर्वच ठप्प आहेत. त्यात उत्पादनाचे साधनही अपुरे पडत आहे. त्यात कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. काहींना कोरोनाची लागण होऊन त्यात काहींचा मृत्यू होऊन त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. या भयानक परिस्थितीशी झगडत जीवन जगत असताना व दुसरीकडे पाल्याचे ऑनलाईन शिक्षण याचा खर्च करताना पालकांची दमछाक होत आहे. त्यात शाळा प्रशासनाने आपण नामोनिराळे रहात शाळेतील शिक्षकांचा पगार ही कमी केला असून पुढील पगार हवा असेल तर फी ची वसुली तुमच्या विद्यार्थ्यांकडून करा यासाठी दबावतंत्राचा वापर केला जात आहे.

यामुळे शिक्षकही पालकांना फोन करून फी भरण्यासाठी तकादा लावत आहेत. तरी याबाबत उरणमधील गटशिक्षणाधिकारी यांनी वेळीच लक्ष घालून ठोस उपाययोजना करावी अन्यथा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे याबाबत पालकवर्ग तक्रार करणार असल्याची माहिती पालकवर्गांनी दिली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.