Press "Enter" to skip to content

पुरात कोसळलेले विद्युत खांब तरुण ग्रामस्थांनी श्रमदानाने केले उभे

शिहु बेणसे विभागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी “परमार्थ” ग्रुपचे  परमार्थ कार्य

प्रेरणादायी कार्याचे सर्वत्र कौतुक

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)

निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील अनेक भागात १५ दिवसाहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. त्या निसर्ग चक्री वादळाची पुनरावृत्ती होत अतिवृष्टी व वादळाने शिहू बेणसे विभागातील किमान दहा ते बारा विद्युत खांब पुराच्या पाण्यात कोसळले. त्यामुळे हा विभाग अंधारात बुडाला. 

वीजवितरण विभागाचे कर्मचारी हतबल झालेले असताना जनसेवेचा वसा घेतलेल्या परमार्थ ग्रुप व मित्रमंडळातील शेकडो तरुणांनी व स्थानिक ग्रामस्थांनी वीजवितरण कर्मचाऱ्यांच्या सोबतीने पुढाकार घेत कोसळलेले पोल पुन्हा उभे करण्यासाठी दिवसरात्र श्रमदान केले. अजूनही हे काम सलग सुरूच आहे.  विद्युत खांब उभे करून विद्युत पुरवठा सुरळीत होणे कामी महत्वपूर्ण योगदान  देणाऱ्या परमार्थ ग्रुपच्या या प्रेरणादायी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

निसर्ग चक्री वादळात देखील शिहू बेणसे विभागाला वीजपुरवठा करणारे  किमान दहा  विद्युत खांब पुरात कोसळले होते, पंधरा दिवस हा विभाग अंधारात होता, यावेळी देखील परमार्थ ग्रुपच्या सदस्यांनी जीव धोक्यात घालून मदतकार्य केले होते. परमार्थ ग्रुप हा व्हॉटसअप ग्रुप असून सोशल मिडीयाचा सदुपयोग करून सामाजिक कार्य कसे करता येते हे या ग्रुपने दाखवून दिले आहे.

विविध सामाजिक व लोकाभिमुख प्रश्नांना न्याय देण्याच्या भूमिकेतून परमार्थ ग्रुप काम करीत आहे. या ग्रुपमध्ये शिहु, तरशेत, जांभूळटेप, मानी, शिहु फाटा, पंचवटी, झोतिरपाड़ा,  नवी मुंढाणी, हवेली येथील तरुणांचा सहभाग आहे. सलग दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली. आंबा नदीच्या सभोवताली असलेल्या अनेक गावांना खाडी भागातून असलेल्या विद्युत खांब व वाहिन्यांची जोडणी झाली आहे. त्यामुळे विद्युत खांब कोसळण्याची व वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या कायम उद्भवत असते. यावर कायमस्वरूपी पर्याय म्हणून पोयनाड अलिबाग भागातून वीजजोडणी करण्यात यावी अशी मागणी सातत्याने होताना दिसते.

  वीज ही जीवनातील अत्यावश्यक सेवा मानली जाते, मात्र शीहू बेणसे विभागात वर्षाचे बारा महिने विजेचा लपंडाव सुरूच असतो.  कोरोनाच्या पाश्वभूमीवर सध्या  सारेच घरात आहेत. शिवाय गृह विलगी करणात अनेक कोरोनाचे रूग्ण उपचार घेत आहेत, विज खंडित होताच त्यांची मोठी दमछाक होताना दिसते. 

वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक , बालबच्चे वृद्ध सारेच  बेजार होत आहेत. खंडित झालेला वीजपुरवठा केव्हा पूर्ववत होईल याचा अंदाज येत नसल्याने नागरिक सतत चिंतेत असतात. अशातच पावसाळ्याचे दिवस असल्याने सभोवताली गवत वाढलेले असते, साप, विंचू व कीटकांची भीती असते, रात्री अंधार असल्याने चहूबाजूंनी धोका जाणवत असतो. याबरोबरच पावसाळ्यात मच्छर व डासांचा उपद्रव मोठ्या  प्रमाणावर होऊन नागरिकांच्या आरोग्यास  धोका पोहचताना दिसत आहे. त्यामुळे  वीजपुरवठा कायम सुरळीत रहावा याकरीता वीजवितरण विभागाने योग्य व कायमस्वरूपी  उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.