9 कोरोना रूग्ण उपचारानंतर घरी परतले- 1 पोलीस बाधित
सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर)
तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या मंदावली असून एकाच दिवशी 9 कोरोना रूग्णांना उपचारांनंतर घरी पाठविण्यात आले असल्याची अधिकृत माहिती आयुषचे डॉ.राजेश शिंदे यांनी दिली आहे. शनिवारी एका वाहतुक पोलीस कर्मचाऱ्याची कोविड-19 टेस्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गुलाबराव सोनावणे यांनी दिली.
दरम्यान, गुरूवारी आणि शुक्रवारी दोन कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कोरोनामृत्यूची संख्या 9 झाली आहे.
शनिवारी पोलादपूर शहरातील सहयाद्रीनगर पोलीस भागातील वाहतूक पोलीसाची कोविड-19 टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर एकूण कोरोना रूग्णांची संख्या 90 झाली असून शुक्रवारी एकाच दिवशी 9 रूग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आल्याने घरी परतलेल्यांची संख्या 72 झाली आहे. सध्या 9 पॉझिटीव्ह रूग्ण उपचार घेत आहेत.
यादरम्यान, गुरूवारी सडवली येथील दत्ताराम कोंडीराम जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर शुक्रवारी पोलादपूर शहरातील जोगेश्वरी गाडीतळ येथील श्रीरंग एस.जाधव या एस.टी.महामंडळातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल नवीमुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापूर्वी पोलादपूर शहरातील मठगल्ली, चरई, तुर्भे बुद्रूक, देवपूर, पोलादपूर प्रभातनगर, काटेतळी आणि माटवण येथील कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी पोलादपूर तालुक्यातील कोरोना मृत्यूची संख्या 9 झाली आहे. मात्र, शुक्रवारीच दिवसभरात 9कोरोना रूग्णांना उपचारांनंतर घरी पाठविण्यात आल्यामुळे एकूण 90 रूग्ण संख्येपैकी 10 टक्के मृत्यू आणि 10 टक्के उपचार घेत असून 80 टक्के रूग्ण बरे होऊन घरी परतल्याने पोलादपूर तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे.






Be First to Comment