Press "Enter" to skip to content

सुधागडातील लढवय्ये नेते कालवश

वाघोशी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुनिल झुंजारराव यांचे दुःखद निधन

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली आदरांजली

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)

सुधागड तालुक्यातील लढवय्ये व स्वाभिमानी नेते तथा वाघोशी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व सर्वपरिचित व्यक्तिमत्व असलेले सुनिल झुंजारराव यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी  दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

वाघोशी ग्रामपंचायतीच्या राजकारणात सुनिल झुंजारराव यांनी गेली अनेक वर्षे आपले अस्तित्व निर्माण केले होते. त्यांचे जीवन म्हणजे एक संघर्षच होते. अनेक वादळांना तोंड देत ते दीपस्तंभासारखे उभे होते. सुधागड तालुक्याच्या सामाजिक व विकासात्मक जडणघडणीत त्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. सुनिल  झुंजारराव यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू व प्रेमळ होता. कुणी अडीअडचणीच्या प्रसंगात असले की ते तात्काळ मदतीसाठी पुढे यायचे, कुणावर अन्याय झाला की ते गर्जून उठायचे. समाजातील सर्वच घटकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. विशेषतः आदिवासी बांधवांचे ते अत्यंत लाडके नेते होते. सर्वांनाच सोबत घेऊन काम करण्याची त्यांची हातोटी होती. अन्यायाविरूध्द ते पेटून उठायचे. आपल्या सोबत असणाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमीच टोकाची भूमिका घ्यायचे. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांचे नेहमीच व्यक्तीगत नुकसान झाले, पण त्यांनी कधीच माघार घेतली नाही. 
"सुनिल झुंजारराव यांच्या निधनाने सुधागड तालुक्याची राजकीय व सामाजिक दृष्या अपरीमित  व कधीही  भरून न निघणारी हानी झाली आहे. सुनिल झुंजारराव यांच्या रूपाने सुधागडचे लढाऊ व झुंजार  नेतृत्व हरपले" 

आमदार रविशेठ पाटील
"सुनिल झुंजारराव यांच्या रूपाने  स्वाभीमानी व लढाऊ नेता हरपला. यांच्यासारखा अन्यायाविरूध्द पेटून उठणारा आक्रमक नेता होणे नाही. त्यांनी समाजकारण व राजकारणात स्वतःचा असा एक वेगळाच ठसा उमटविला होता."

दिलीप देशमुख,
माजी सरपंच,
दहीगांव ग्रामपंचायत
"सुनील झुंजारराव मित्रत्व जपणारा, तसेच एक झुंझार,  परखड आणि स्पष्टवक्ता असे व्यक्तिमत्व होते. त्यांचे अचानकपणे आपल्यातून निघून  जाण्याने सर्वांच्या मनाला चटका लागून गेला.  समाजात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली." 

रवींद्र देशमुख,
जिल्हा परिषद सदस्य

         

सुनिल झुंजारराव यांना श्रध्दांजली अर्पण करताना सम्यक क्रांती विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष तथा जनता मंचचे संपादक मंगेश वाघमारे यांनी “सुनिल झुंजारराव यांच्या अकाळी निधनाने भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असून अखेर एक वादळ शांत झाले असल्याचे म्हटले आहे. सुनिल झुंजारराव एक अभ्यासू व हरहुन्नरी व्यक्तीमत्व होते. लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारे होते. अडीअडचणीत असलेल्यांना सढळ हस्ते मदत करणारे होते. प्रसिद्धीसाठी न हपापता आपले काम इमाने इतबारे करणारे होते. असे व्यक्तीमत्व पुन्हा होणे नाही” असेही मंगेश वाघमारे म्हणाले.

सुनिल झुंजारराव यांच्या अंत्यविधीला पेण सुधागड रोहाचे आमदार रविशेठ पाटील, पाली पंचायत समितीचे सभापती नंदू सुतार, जिल्हा परिषद सदस्य रविंद्र देशमुख, शिवसेना तालुका प्रमुख मिलिंद देशमुख, माजी सभापती पी. डी. डुमणा, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, वाघोशीचे माजी उपसरपंच व शेकापचे तालुका चिटणीस उत्तम देशमुख, वाघोशीचे उपसरपंच दीपक पवार, आरपीआयचे जिल्हा सचिव रविंद्रनाथ ओव्हाळ, आरपीआयचे तालुकाध्यक्ष राहुल सोनावळे, परळीचे माजी उपसरपंच अमोल देसाई, व-हाड जांभुळपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रविंद्र खंडागळे, पेडली व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष विक्रम देशमुख, दहीगांवचे माजी सरपंच दिलीप देशमुख यांच्यासह विविध सामाजिक , धार्मिक , क्षेत्रातील तसेच  राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व पंचक्रोषीतील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती. सुनिल झुंजारराव यांच्या पश्चात पत्नी, ३ मुली, १ मुलगा, जावई असा परिवार आहे. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.