Press "Enter" to skip to content

पोलादपूरमध्ये तब्बल तीन तासांनी ‘रेस्क्यू ऑपरेशन’ यशस्वी

भंगार गोळा करणाऱ्याला नदीपलीकडून आणताना अन्य दोघेजणही अडकले

सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर)

शहरातील जोगेश्वरी गाडीतळ भागातील आदिवासी वस्तीसमोरील चोळई आणि सावित्री नदीपात्रांच्या संगमावर बुधवार,गुरूवारी झालेल्या पावसामुळे वाहून आलेला भंगार गोळा करण्यासाठी नदीपात्रातून पलीकडील बेटसदृश्य भूभागात गेलेल्या एका व्यक्तीला पुन्हा पोलादपूर बाजूला आणण्यासाठी गेलेल्या दोघांसह काढण्याचे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरित्या राबविण्यात आले.

पोलादपूर तालुक्यातील उत्तरवाहिनी सावित्री नदीला दि लेप्रसी मिशन हॉस्पिटल ऑॅफ इंडिया चोळई नदी येऊन मिळते. तेथून काही अंतरावर जोगेश्वरी गाडीतळ भागातील सावित्री नदी आणि चोळई नदीच्या संगमापासून काही अंतरावर तयार झालेल्या बेटसदृश्य जुटा या भूभागावर मोठया प्रमाणात भंगार वाहून आला होता. कापडे बुद्रुक आदिवासीवाडी येथे राहणारा तानाजी किसन जाधव हा भंगार गोळा करणारा अपंग तरूण सावित्री नदीपात्रातून चालत पलिकडे गेला. यावेळी त्याने मोठया प्रमाणात पोत्यामध्ये भंगार गोळा केल्यानंतर त्याला भंगारासह पुन्हा पोलादपूर शहराकडे आणण्यासाठी दिलीप जाधव आणि असिफ मुजावर हे दोघेजण याच नदीपात्रातून गेले. मात्र, यावेळी पोलीस आणि सतर्क प्रशासनाने त्यांना परत आणण्यासाठी रेस्क्यू टीम पाचारण करून ‘रेस्क्यू ऑपरेशन’ करण्याचे ठरविले. नंतर गेलेल्या दोघाजणांना नदीपात्रात पुन्हा न उतरण्यास सांगण्यात आले.

यानंतर महाड येथून प्रशांत साळुंखे यांची रेस्क्यू टीम घटनास्थळी आल्यानंतर प्रथम टायर टाकून प्रयत्न करण्यात आला. मात्र, नदीपात्रातून टायर आणि अन्य तरंगणाऱ्या रेस्क्यू साधने वाहून जात असल्याने शेवटी टीममधील एका व्यक्तीने काही अंतर पोहून व नंतर गुडघाभर पाण्यात चालून पलिकडे जात एका झाडाला दोरी बांधली. या दोरीने पोलादपूर बाजूकडून लाईफ जॅकेटस पाठविण्यात आल्यानंतर प्रथम भंगार गोळा करणाऱ्या तानाजी जाधव याला लाईफ जॅकेट घालून पोलादपूर बाजूला आणण्यासाठी रेस्क्यू टीमचे सदस्य कंबरभर पाण्यातून कधी पोहून तर कधी चालत निघाले. यावेळी पोलादपूर बाजूच्या किनाऱ्यावरील पोलीसांनी रेस्क्यू टिमचे टाळया वाजवून स्वागत करण्याचे आदेश दिल्यानंतर काही बघ्यांनी टाळया वाजवून कौतुक केले. यानंतर अन्य दोघेजण दोरी धरून पोलादपूरच्या दिशेने आल्यानंतर तब्बल दोन तासांनंतर हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झाले. मात्र, भंगारवाल्याने गोळा केलेले पोते पलिकडेच राहिले.

यावेळी पोलादपूर सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव, पोलीस उपनिरिक्षक ढोमे व पोलीस कर्मचाऱ्यांसह तहसिलदार दिप्ती देसाई आणि नायब तहसिलदार समीर देसाई तसेच रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी भंगार गोळा करणारा अपंग, अन्य दोघे यांच्यासोबत ग्रुप फोटो काढून ‘रेस्क्यू ऑपरेशन’ यशस्वी केल्याचा आनंद व्यक्त केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.