अपयशावर मात करीत आयकर निरीक्षक लोकसेवा परीक्षा पास
सिटी बेल लाइव्ह / पनवेल/ प्रतिनिधी #
ध्येयाच्या दिशेने वाटचाल करीत असताना अनेकदा यश हुलकावणी सुद्धा देते. परंतु सतत प्रयत्नशील राहून परिश्रम केल्यास यश हे हमखास आपलेच असते. हे खांदा वसाहतीत राहणाऱ्या सुनिल राजेंद्रराव शिंदे या आयकर निरीक्षक म्हणून काम करीत असलेल्या तरुणाने सिद्ध करून दाखवले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दोनदा मुलाखतीपर्यंत पोहोचलेले शिंदे यांना सुरूवातीला अपयश आले. मात्र त्यावर मात करीत ते सनदी अधिकारी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
सीमावर्ती कर्नाटकातील एका छोट्या बेळकोनी या खेड्यातून आलेले वडील राजेंद्र शिंदे हे लोहा येथील कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. सुनील हे अभियांत्रिकी शिक्षण घेऊन टाटा उद्योग समूहात नोकरीला लागले. मात्र त्यात समाधान वाटलं नाही, आणि मन अजिबातच जमले नाही.आईवडिलांची अधिकारी होण्याचे असलेले स्वप्न व त्यांची प्रेरणा घेऊन यूपीएससी कडे वळले.
2012 साली पहिल्याच प्रयत्नात आयकर विभागात इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून निवड झाली. याठिकाणी आठ वर्षापासून हे नोकरी करीत आहेत. आता त्यांना प्रमोशन सुद्धा आले होते . पत्नी आणि दोन मुलांसह सुनील शिंदे खांदा वसाहतीतील तुळशी प्रेरणा सोसायटीत राहतात. तीन वर्ष त्यांनी नोकरी सांभाळून यूपीएससीचे क्लास केले. नोकरी कुटुंब दुहेरी जबाबदारी सांभाळून त्यांनी अभ्यास केला.
विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात तोंडी परीक्षा पर्यंत मजल मारली, यातूनच आत्मविश्वास दुपटीने वाढला. मनात जिद्द बाळगून पुन्हा तयारी साठी मुंबई हून दिल्लीला मुक्काम हलवला आणि एक वर्ष दिवसरात्र अभ्यास केला. पुन्हा मुलाखतीपर्यंत शिंदे पोहचले मात्र नशिबाने या वेळेस ही हुलकावणी दिली. त्याला कारण ही असेच होते. त्यांच्या मोठ्या भावाचे कर्करोगाने निधन झाले. हा मोठा आघात सुनील यांच्या मनावर झालेला होता. एका रात्रीत घरच्या सर्व जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडल्या. पण त्यांनी सर्व दुःख बाजूला सारले. आव्हानाला आव्हान करून सामोरे गेले. आणि हिमतीने लढण्याचा मनी इरादा पक्का केला. त्याचवेळी कुटुंबीयांच्या आग्रहास्तव दोनाचे चार हात करावे लागले. मात्र मनात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवण्याची पेटलेली मशाल तेवत होती. ती सुनील शिंदे यांना स्वस्थ बसू देत नव्हती . भावाच्या अकाली जाण्याने आलेले दुःख त्याचबरोबर यूपीएससी परीक्षेत दोनदा आलेले अपयश गिळून नव्याने मैदानात उतरण्याची खुणगाठ मनाशी बांधली. सगळ्या जबाबदाऱ्या खांद्यावर घेऊन सहा महिन्याचे भावाचे मुल व त्याचा संसार सांभाळत हे सगळ केले. त्याचबरोबर अभ्यासही सुरू ठेवला.
सुनील शिंदे यांच्याकडे असलेल्या चिकाटी व जिद्दीने हुलकावणी देणारे यश मिळवले. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ते उत्तीर्ण झाले. माणसाने कासवासारखे सतत कार्यरत राहिले तर यश आपल्या पायाशी येते. हे या युवकाने दाखवून दिले.
प्रबळ इच्छाशक्तीची अपंगत्ववर मात
सुनिल राजेंद्रराव शिंदे हे एक वर्षाचे असताना दुर्दैवाने उजव्या पायाला पोलिओ झाला. मात्र शारीरिक क्षमतेवर त्यांनी मात केली. अपंगत्वाला त्यांनी आपले उद्दिष्ट आणि ध्येयाच्या जवळपास सुद्धा फिरकू दिले नाही. दहावी आणि बारावी परीक्षेत अपंगा मध्ये त्यांनी पहिला क्रमांक मिळवला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करून सुनील यांनी आपल्या अंगी असलेल्या जिद्दीचा वस्तुपाठ इतरांसमोर ठेवला. त्यांनी यशाचे श्रेय आई-वडील यांना दिलेले आहे
तरुणांनी क्लासेस जॉईन करताना दिखावा न पाहता डोळसपणे पर्याय निवडावेत. सर्वात महत्वाचे म्हणजे आपली क्षमता ओळखून त्या नुसार प्रयत्न करणे आवश्यक आहे. तीन-चार वर्ष मेहनत आणि परिश्रम घेतल्यास यशाला गवसणी घालता येईल. नोकरी करीत असताना यूपीएससी चे प्रयत्न सुरू ठेवावे. क्षेत्रात अनिश्चितता असल्याने दुसरा पर्याय आपल्या हातात असणे आवश्यक आहे.
- सुनील राजेंद्र शिंदे






Be First to Comment