आदिवासी नेते रमेश पवार यांचे आवाहन
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात व विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून साजरा केला जातो. मात्र यावर्षी संपूर्ण जगावर कोरोना सारख्या जागतिक साथ रोगाचे संकट आहे. त्यामुळे यंदाचा जागतिक आदिवासी दिवस साजरा करताना सामाजिक भान राखून शासन नियम व अटींचे काटेकोरपणे पालन करून साजरा करावा असे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद (दिल्ली संलग्न) कोकण संघटक रमेश पवार यांनी केले आहे. कोरोना व निसर्ग चक्री वादळाच्या परिस्थितीत जागतिक आदिवासी दिनी यंदा नेहमीप्रमाणे रॅली किंवा गर्दीचे मोठे कार्यक्रम घेणे शक्य नाही.
जागतिक पातळीवर भीतीचं वातावरण आहे. असे असताना आदिवासी संस्कृती जगाला कशी तारून नेऊ शकते हे पटवून देण्याची ही एक चांगली वेळ आहे. निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन आदिवासी करत आले आहेत, व पुढेही करत राहतील. दिवसेंदिवस परिस्थिती बदलत आहे. आदिवासी समाजाच्या जमिनीवर बड्या भांडवलंदारांचा गिधाडासारखा डोळा आहे. अन्याय अत्याचार व शोषणाचे आदिवासी बांधव बळी पडत आहेत. आदिवासी समाजात होणारी घुसखोरी, बेरोजगारी, शेतातील नापिकी, वनांपासून जाणीवपूर्वक आदिवासींना दूर केले जाणे अशा हजारो समस्या आहेत. परंतु अशा परिस्थिती माझा आदिवासी बांधव खचून न जाता लढत आहे. जागतिक आदिवासी दिनी आदिवासी बांधवांच्या उत्कर्षासाठी व संरक्षणासाठी संकल्प करावेत. आदिवासी बांधव आता जागरूक झाला असून जल, जंगल आणि जमिन बचावासाठी लढताना दिसतोय. जागतिक दिनाचे औचित्य साधून सर्वानी आपली शिस्त व आदर्श संस्कृती दाखवून देत हा दिवस शांततेत व शासन नियमांचे पालन करून साजरा करूया, असे आवाहन रमेश पवार यांनी केले आहे.






Be First to Comment