Press "Enter" to skip to content

ऑनलाइन शिक्षण पद्धतीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांकडून इतर शुल्क मागू नये

पनवेल महानगरपालिका विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांची मागणी

सिटी बेल लाइव्ह / पनवेल #

पनवेल विभागातील काही शाळांकडून पालकांना शाळा प्रशासनाने शिक्षण शुल्क, वाहतूक आणि इतर शुल्क भरण्यासाठी सांगितले जात आहे. ऑनलाइन शिक्षण पद्धतीच्या काळामध्ये शाळांच्या देखील बर्‍याच खर्चांमध्ये कपात झाली असल्याने शाळांनी विद्यार्थ्यांकडून इतर शुल्क मागू नये अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केली आहे.

प्रितम म्हात्रे यांनी याबाबत शाळांना दिलेल्या पञात म्हटले आहे की, “ 21 मार्च 2020 पासून सरकारने कोरोना व्हायरस साथीच्या आजारमुळे सतत लॉक डाऊन केले. सर्व आर्थिक आणि व्यावसायिक कामे बंद आहेत. याचा आपल्या सर्वांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे. वेतनात कपात, नोकरी गमावणे अशा अनेक विवंचनेतून पालक वर्ग जात आहे. या संदर्भात शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी प्रतिनिधि आणि पालक शाळेला परिवहन शुल्क आणि ऑनलाइन शिक्षण कालावधीत इतर विविध शुल्क माफ करण्याची शाळेला विनंती करत आहेत. आजपर्यंत लॉकडाऊनमुळे त्यांची मुले चालू शैक्षणिक वर्ष 20-21 सुरू झाल्यापासून शाळेत जात नाहीत. शाळा पुन्हा केव्हा सुरू होईल याबाबत अत्यंत अनिश्चितता आहे. जोपर्यंत ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू आहे तो पर्यंत पालक शिकवणी शुल्क सवलतीच्या दरात भरण्यास तयार आहेत."

विद्यार्थ्यांची ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या कालावधीसाठी परिवहन आणि संगणक फी व इतर सुविधा ज्याचा उपयोग विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण पद्धतीच्या काळामध्ये घेत नाहीत या सर्वांची फी माफ करण्याचे आदेश शिक्षण विभागातर्फे द्यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केली आहे .

जर मुले वाहतुकीचा व इतर शालेय सुविधांचा लाभ घेत नाहीत तर त्याचे शुल्क आकारणे योग्य आहे का ? काही शाळांकडून पालकांना शुल्क भरण्यासाठी वारंवार एस.एम.एस. केले जातात. पालक वर्ग प्रचंड आर्थिक परिस्थितीबाबत तणावाखाली आहे. मी शालेय शिक्षण मंत्री महोदयांना या अगोदरच ऑनलाईन शिक्षण पद्धती मधील शुल्क घेण्याबाबत धोरण ठरवण्याची विनंती केली आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्वरित कारवाईची अपेक्षा आहे.
प्रितम म्हात्रे,
पनवेल महानगरपालिका
विरोधी पक्षनेते

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.