Press "Enter" to skip to content

उड्डाणपुलावरील सुकलेल्या दुभाजकावर नव्याने वृक्षारोपण

खांदा वसाहत – नवीन पनवेल पुलावर लावली झाडे

आ. प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका सिताताई पाटील यांचा उपक्रम

सिटी बेल लाइव्ह / पनवेल /प्रतिनिधी-

पनवेल – दिवा रेल्वेमार्गावर बांधण्यात आलेल्या खांदा वसाहत- नवीन पनवेल उड्डाणपुलावरील दुभाजकावर यापूर्वी लावण्यात आलेली बहुतांशी झाडे जळून गेले होते. याठिकाणी हिरवाई निर्माण व्हावी म्हणून नगरसेविका सिताताई सदानंद पाटील यांनी येथे झाडांची पुनर्लागवड केली.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा पर्यावरणपूरक उपक्रम घेऊन झाडे लावा झाडे वाचवा हा संदेश नागरिकांना दिला.

सिडकोने अनेक ठिकाणी दुभाजक आणि पदपथाच्या लगत झाडे लावून वनमहोत्सवात आपला सहभाग नोंदवला होता. परंतु एकदा झाडे लावल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची वस्तुस्थिती अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. त्याला खांदा वसाहत -नवीन पनवेल हा उड्डाणपूल सुद्धा अपवाद ठरला नाही. पनवेल- दिवा लोहमार्गाच्या वरून बांधण्यात आलेल्या या पुलावर दुभाजक आहे. त्यावर कुंडया ठेवून सिडकोने वृक्षारोपणाचा दिखावा केला होता. त्यानंतर या झाडांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्यांना वेळेवर पाणी न दिल्याने बहुतांशी झाडे जळून गेले आहेत. त्यामुळे येथील कुंड्या झाडा विनाच धूळ खात पडून होत्या. ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर नगरसेविका सिताताई सदानंद पाटील यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत याठिकाणी स्वखर्चाने झाडे आणून वृक्षारोपण केले.

"काही कुंड्यांमध्ये पुन्हा मृदा भरण करून त्यामध्ये शोभेची झाडे लावण्यात आली आहेत. विशेष म्हणजे जास्त पाणी न लागणारे रोपांची त्या ठिकाणी लागवड करण्यात आली आहे.  सर्व ऋतू मध्ये याठिकाणी हिरवाई रहावी म्हणून अशा प्रकारचे वृक्षारोपण आम्ही केले. सिडकोकडे पाठपुरावा करत बसण्यापेक्षा. तसेच त्यांना पत्र व्यवहार करून वेळ वाया न घालवता पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम हाती घेतला." 
सिताताई पाटील, नगरसेविका

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संतुलन आणि समतोल राखण्यासाठी हा स्तुत्य कार्यक्रम हाती घेऊन सीताताई पाटील यांनी वृक्षसंवर्धनाचा संदेश पनवेल करांना दिला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.