सिटी बेल ∆ नागोठणे ∆ महेश पवार ∆
नागोठण्यातील नाभिक समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, नागोठणे बाजारपेठेतील एक जुने मराठी व्यावसायिक व नागोठणे ज्येष्ठ नागरिक संघाचे सल्लागार रमाकांत उर्फ रमनभाई सीताराम रावकर (वय ८१) यांचे शनिवारी (दि.२०) सकाळी ७.३० वा.च्या सुमारास वयोवृद्धत्वामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी कुसूम रावकर, दोन विवाहित मुलगे शेखर व सुधीर, एक विवाहित मुलगी संगिता चव्हाण, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे.
दिवंगत रमाकांत रावकर यांचे नागोठणे बाजारपेठेत जुन्या काळापासून महाराष्ट्र जनरल स्टोअर्स हे दुकान आहे. नागोठणे बाजारपेठेतील एक खुप जुने मराठी व्यावसायिक असलेल्या रमाकांत रावकर यांनी आपल्या शांत, प्रेमळ व खेळकर स्वभावामुळे खुप मोठा मित्रपरिवार जोडला होता. नागोठणे शहर व विभागात ते रमनभाई म्हणूनच परिचित होते. त्यामुळे रमनभाई यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दिवंगत रमनभाई यांच्या पार्थिवावर नागोठण्यातील अंबा घाटावरील वैकुंठ स्मशानभूमीत शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नागोठणे व विभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर, त्यांचे नातेवाईक तसेच नागोठण्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कै. रमाकांत रावकर यांचे दशक्रिया विधी सोमवार दि. २९ आॅगस्टला उध्दर येथे तर उत्तरकार्य (तेरावे) गुरुवार दि. १ सप्टेंबरला नागोठण्यातील त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याचे रावकर कुटुंबियांकडून सांगण्यात आले.
Be First to Comment