आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या,नगरपालिकांच्या निवडणुकीचे तटकरेंनी रोह्यातून फुंकले रणशिंग
राज्यपातळीवर,जिल्हापातळीवर आघाडीचा जो काही निर्णय होईल त्याची अंमलबजावणी करीत १०० टक्के यश आपल्याला मिळवायचे आहे : खा.सुनील तटकरे
सिटी बेल ∆ रोहा – धाटाव ∆ शशिकांत मोरे ∆
रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे हे अधोरेखित सत्य आहे.राजकीय प्रतिकूल परिस्थितीमधे राष्ट्रवादी पक्षाला १ नंबर वर ठेवण्यात आपल्याला यश मिळाले आहे.सध्या राज्यात काय सुरू आहे या सर्व गोष्टीत कुठलेही मतप्रदर्शन करण्यापेक्षा आपल्याला आगामी निवडणुकांना सामोरे जायचे आहे.लोकसभेच्या निवडणुकीचे परिमाण असते त्याचप्रमाणे विधानसभेचेही वेगळे असते.आज जिल्हा परिषद,पंचायत समित्या,नगरपालिका यांची बदललेली परिस्थिती सुद्धा त्याठिकाणी केंद्रित होत असते.पक्षाच्या माध्यमातून राज्य पातळीवर,जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी मिळाली या भूमिकेतून उद्याच्या भविष्याची वाटचाल आपल्याला ठामपणे करायची आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थान जिल्हा परिषद,पंचायत समित्या अथवा नगरपालिकेत राष्ट्रवादीला सोबत घेतल्याशिवाय कुणालाही सत्तेवर बसता येणार नाही यास्थितिवर नेवुया असे सांगून राज्यपातळीवर, जिल्हापातळीवर आघाडीचा जो काही निर्णय होईल त्याची अंमलबजावणी करीत १०० टक्के यश आपल्याला मिळवायचे आहे असे आवाहन रायगडचे खा.सुनील तटकरे यांनी केले.
आज रोह्यात धाटाव विभागातील किल्ला येथे ओम नम शिवाय मंगल कार्यालयात रा.कॉ.पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आयोजित भव्य मेळावा व जाहीर सत्कार सोहळ्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते.
याप्रसंगी माजी पालकमंत्री आ.अदिती तटकरे,आ.अनिकेत तटकरे,प्रदेश सरचिटणीस विजय मोरे,नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील,रोहा तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष विनोद पाशिलकर, माजी उपसभापती अनिल भगत,महिला अध्यक्षा प्रितम पाटील, सुरेश महाबळे,सुरेश मगर,रामचंद्र चितळकर,दिलीप टके,शिवराम शिंदे, नारायण धनवी,रामचंद्र सकपाळ,नरेश जाधव,विलास चौलकर,युवक अध्यक्ष जयवंत मुंढे,युवती अध्यक्षा रविना मालुसरे यासह विविध सेलचे अध्यक्ष,जिल्हा परिषद गट,पंचायत समिती गणाचे अध्यक्ष,विभागातील कार्यकर्ते उपस्थित होते.तळागाळातील कार्यकर्त्यांनी हा सभागृह भरगच्च भरल्याचे पहावयास मिळाले.
राजकीय कालखंडातील नेतृत्वावरील तत्कालीन सरकारच्या आठवणीना उजाळा देत तटकरे पुढे म्हणाले की,जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो किंवा नगरपालिका असो जो निर्णय आघाडीत होईल त्या जागा १०० टक्के निवडून आणायच्याच असा निर्धार कार्यकर्त्या समोर केला.तर मी आमदार असताना जेवढा निधी आणला नाही त्यापेक्षा सरस निधी अदितीने आघाडीच्या माध्यमातून आणला याचा मला अभिमान असल्याचे सांगून तत्कालीन काळात तुझे आजोबा कै.दत्ताजीराव तटकरे काँग्रेस आय पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते याची आ.अनिकेत तटकरे यांना आठवण करून द्यायला मात्र ते विसरले नाहीत.तर भाईसाहेब पाशिलकर यांच्या सोबतच्या कारकिर्दीची आवर्जून आठवण करून देत तत्कालीन राजकीय घडामोडींचा त्यांनी आपल्या भाषणात अनेकदा स्पर्श केला. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांच्या निवडीवर बोलताना राज्याच्या मुख्यमंत्रिनिवडीबाबत जेवढा सस्पेन्स होता तसाच सस्पेन्स जिल्हाध्यक्ष निवडिदरम्यान ठेवला गेला होता असे तटकरे यांनी सांगताच कार्यकर्त्यात चांगलाच हशा पिकल्याचे पहावयास मिळाले.तालुक्याची सुरुवात रोह्यापासून केल्याने आपल्याला कुठलीच कमतरता भासली नाही असे सांगून आगामी निवडणुकाना सज्ज रहा असे आवाहन त्यांनी शेवटी कार्यकर्त्यांना केले.
आपल्याला आघाडी सरकार मध्ये असताना महिला स्त्री रुग्णालय असावं आणि त्याची मान्यता मिळविण्यात आपण यशस्वी ठरल्याचे सांगून औद्योगिक वसाहतीत आरोग्य सक्षमता असावी यासाठी इएसआयसीच्या माध्यतून आपण पाठपुरावा करीत असल्याचे सांगत आपण जे काम केले आहे ते ठासून लोकांपर्यंत नेण्याचे काम आपण केले पाहिजे.आजचा मेळावा संघटना बांधणीसाठी आहे.साहेब जो निर्णय घेतील तो निश्चितपणे कार्यकर्ता म्हणून घेऊ.त्यामुळे तालुक्यातील गण आणि गटात राष्ट्रवादीचा झेंडा कायम राहील असे झोकून काम करूया असे मंत्री महोदय,पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केले.
आपल्या दमदार भाषणात आ.अनिकेत तटकरे म्हणाले की,जिल्ह्याला शोभेल असे अध्यक्ष मिळल्याने जिल्ह्यात आगामी निवडणुकीत चांगलं यश आपण मिळवणार आहोत.आपल्या पक्षावर फाजील वक्तव्य कोणी केले तर जशास तसे उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत असे सांगून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष जर का शिवतीर्थावर बसवायचा असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम जिल्ह्यात अधिकाधिक जोमाने सुरू ठेवूया असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,पक्ष वाढीसाठी आम्ही मेहनत घेणारच आहोत मात्र प्रदेशला असलेला बूथ कमिटीचा डाटा आम्हाला उपलब्ध व्हावा.त्या अनुषंगाने आपण नव्याने पद नियुक्ती करणारच आहोत असे सांगत साहेब आपण जिल्हा परिषदेवर असताना शाळेतील मुलांना शाळा सारवायला लागायची ते लाद्या फरश्या टाकून सारवण्याचे काम बंद केले.अदितीने पाण्या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या डोक्यावरील हांडे उतरविण्याचे काम केले,तर अनिकेत भाईने तरुणांसाठी व्यायाम शाळा देऊन तरुणांसाठी काम केले आहे याची आठवण करून हे फक्त तटकरे करू शकतात हे ठामपणे सांगून जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी तुमचा आदेश आम्ही पाळणारच. अध्यक्ष म्हणून जिल्ह्यात चांगलं काम करण्याची संधी आपण दिलीत ती सार्थ ठरविन असे त्यांनी सांगितले.
तालुक्यातील विविध भागातील नेते सुरेश महाबळे,सुरेश मगर,रामचंद्र चितळकर,रामचंद्र सकपाळ,प्रितम पाटील,स्नेहा आंबरे,महादेव सानप यांनी,साहेब,भाई आणि ताई असताना आपल्याकडे सत्ता असली काय आणि नसली काय आम्हाला काहीही फरक पडत नाही असे सांगून आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले.
या भव्यदिव्य कार्यक्रमाचे उत्तम नियोजन रोहा तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष विनोद पाशिलकर,युवक अध्यक्ष जयवंत मुंढे यांसह सहकारी वर्गाने केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविकांत दिघे यांनी केले.
Be First to Comment