स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यास सज्ज व्हा : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसमोर त्याग आणि शिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे. पक्षाच्या आदेशानुसार काम करण्याच्या आपल्या सामर्थ्याच्या जोरावर आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या आहेत आणि पक्ष संघटना मजबूत करायची आहे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी पनवेल येथे केले.
भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारिणी बैठक शनिवार दिनांक २३ जुलै रोजी पनवेल मधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडली. यावेळी उद्धाटन सत्रात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी सी. टी. रवी, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाशजी, प्रदेश सहप्रभारी जयभानसिंह पवय्या आणि ओमप्रकाश धुर्वे, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व विजया रहाटकर, चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि आ. आशिष शेलार, रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, संजय कुटे, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी श्रीकांत भारतीय व्यासपीठावर उपस्थित होते.
चंद्रकांतदादा पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्याचे आवाहन केल्यानंतर उपस्थित प्रतिनिधींनी जागेवर उभे राहून टाळ्यांच्या कडकडाट उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात भाजपाने राज्यात विविध निवडणुका जिंकल्या व जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष केला. महाविकास आघाडी सरकारने भाजपाच्या कार्यकर्त्यांना चिरडण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण एकही कार्यकर्ता डगमगला नाही. कार्यकर्त्यांचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यात आघाडी सरकारच्या काळात हिंदु्त्व संकटात आले. नवे सरकार सत्तेवर येणे गरजेचे होते. अशा स्थितीत मा. एकनाथ शिंदे यांनी नेतृत्वाला आव्हान दिल्यानंतर भाजपाने त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला, असेही त्यांनी नमूद केले. तसेच या बैठकीच्या यशस्वी नियोजनासाठी विशेष प्रयत्न घेणारे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुकही त्यांनी आवर्जून केले.
हे सरकार यावे ही तर श्रीची इच्छा -उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : हे सरकार यावे ही तर श्रीची इच्छा . याठिकाणी ईश्वर म्हणजेच महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेची ही इच्छा होती. त्यांच्या मनातील संकल्पना आपण पूर्ण केली असल्याचे प्रतिपादन राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पनवेल येथे शनिवारी भाजपाच्या राज्य कार्यकारणीच्या समारोप प्रसंगी बोलताना केली.
भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारणीची बैठक शनिवार ( दि. 23 ) रोजी पनवेलच्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बाळवणात फडके नाट्य गृहात झाली. यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रात पुन्हा रयतेचे राज्य आल्यावर पहिली कार्यकारणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यात होत आहे याचा आनंद व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज गड जिंकल्यावर त्याठिकाणी कधीच थांबायचे नाहीत . गडाची डागडुजी करायचे आणि चिरेबंदी लावून पुढे जायचे आपल्याला ही हेच करायचे आहे. महाराष्ट्रातील सत्तेचा गड जिंकला असला तरी आपण हे मानणारे आहोत की सत्ता हे आपले साध्य नसून आपले साधन आहे. सामाजिक आर्थिक परिक्रमाचा उपक्रम म्हणून त्याकडे पाहतो. म्हणूनच आपण हा गड जरी जिंकलो असलो तरी मोदीजींनी विकासाची यात्रा सुरू केली आहे त्या यात्रेत अग्रेसर होण्यात मागे पडला आहे तो वेगाने पुढे विकासाच्या पहिल्या क्रमांकावर आणण्याचा गड जिंकल्याशिवाय थांबायचे नाही.
यावेळी त्यांनी राज्यात अडीच वर्षात अघोषित आणीबाणी होती . कोणी विरुध्द बोलला की त्याला जेल मध्ये टाका असा प्रकार सुरू होता. अनाचार , दुराचार अत्याचार आणि भ्रष्टाचार याची परिसीमा गाठली होती. सगळीकडे स्थगितीमुळे प्रगतिचे सर्व मार्ग बंद झाले होते. केंद्र सरकारने कोट्यवधी रुपये दिलेले प्रोजेक्ट बंद पाडले त्यामुळे परिवर्तन पाहिजे असे वाटायचे. त्याविरुध्द आपण सातत्याने संघर्ष करीत होतो. सत्तेसाठी नव्हे असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभिनंदन करताना एक हिमतीचा छत्रपतींचा मावळा , मर्द मराठा म्हणून उल्लेख करून त्यांनी व 9 मंत्र्यांसह 50 आमदारांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी आपण हिंदू हृदय सम्राट बाळा साहेब ठाकरेंचा सच्चा शिवसैनिक आहे. त्यांच्या विचारांशी फारकत घेत असल्याचे पाहून हा निर्णय घेतला राज्याच्या हितासाठी हे आवश्यक होत असे ही त्यांनी सांगितले
एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करणे हे ठरवून घडले होते. भाजप सत्ता पिपासू नाही मुख्यमंत्री बनण्यासाठी सरकार पाडले नाही. आमची लढाई विचारांची आहे . निवडणुकीच्या निकाला नंतर आमचे अडीच वर्षाचे ठरले नव्हते मी फोन करून ही ते घेत नव्हते कारण त्यांचे आधीच ठरले होते असे सांगून त्यांनी शिवसेनेने आमच्याशी बेईमानी केली. ती शिवसेना म्हणजे आता जी उरली आहे ती असे सांगून 50 आमदार घेऊन ते येत असल्याने एकनाथ शिंदेना नेतृत्व देणे गरजेचं होते.आपल्याला वरिष्ठांनी आदेश दिल्यावर मी एका कार्यकर्त्याचा सन्मान समजून उप मुख्यमंत्री स्वीकारले. त्यानंतर आपल्या सरकारने कसे झटपट निर्णय घेतले .कोणते बंद केलेले प्रोजेक्ट सुरू केले याची माहिती त्यांनी दिली. दुपारी चंद्रकांत दादांच्या बोलण्याचा अर्थ चुकीचा काढून त्यावर मीडियात सुरू झालेल्या चर्चेचा ही त्यांनी यावेळी समाचार घेतला
सी. टी. रवी यांनी सांगितले की, राज्यातील राजकीय परिवर्तनामुळे केंद्र सरकारच्याच विचारांचे विकासाचे डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले आहे. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. राज्यात विकासवादी व हिंदुत्ववादी सरकार आले आहे. आगामी काळात कठोर परीश्रम करून संघटना आणखी मजबूत करायची आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभा निवडणुका जिंकायच्या आहेत.
शिवप्रकाशजी म्हणाले की, जनादेशचा सन्मान, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, सामान्यांची सुरक्षितता आणि हिंदुत्व यासाठी भाजपा शिवसेना सरकार सत्तेवर आले आहे. भाजपाला जनमत अनुकूल आहे. संघटनात्मक बांधणीत आता मोठी झेप घ्यायची आहे. प्रदेश सरचिटणीस रविंद्र चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. प्रदेश सरचिटणीस अतुल सावे यांनी शोकप्रस्ताव मांडला. तर भाजपा रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी सर्वांचे स्वागत केले.
ओबीसी आरक्षण परत मिळवून दिल्याबद्दल भाजपा-शिवसेना युती सरकारचे अभिनंदन ; भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत ठराव
ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण परत मिळवून दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टी- शिवसेना महायुती सरकारचे अभिनंदन करणारा ठराव शनिवारी पनवेल येथे झालेल्या भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत मंजूर करण्यात आला.हिंदुत्वाचा विचार आणि जनादेशाचा सन्मान करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना व सहयोगी आमदारांचे अभिनंदनही बैठकीत करण्यात आले. पक्षशिस्तीचा नवा आदर्श निर्माण करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्यकारिणी बैठकीत धन्यवाद देण्यात आले.
कार्यकारिणी बैठकीत माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजकीय प्रस्ताव, प्रदेश सरचिटणीस आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षण विषयक तर किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी शेती विषयक प्रस्ताव मांडला.
राजकीय प्रस्तावात म्हटले आहे की, २०१९ मध्ये महाराष्ट्राच्या जनतेने भाजपा -शिवसेना सरकारला १६१ जागांसह स्पष्ट बहुमत दिले होते.मात्र केवळ मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने भाजपा ची साथ सोडत काँग्रेस- राष्ट्रवादी शी हातमिळवणी केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाडस करत हिंदुत्वाच्या विचारांचे सरकार सत्तेत यावे यासाठी पुढाकार घेतला.
महाविकास आघाडी सरकारने नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालवले. हे आरक्षण परत मिळावे यासाठी भारतीय जनता पार्टीने राज्यव्यापी आंदोलन केले.सत्तेत आल्याआल्या हे आरक्षण परत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने आवश्यक ती कार्यवाही केली, असे या संबंधीच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीची बैठक आज पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. उत्कृष्ट आयोजन व यशस्वी नियोजन या बैठकीचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले. पनवेल व आजूबाजूच्या परिसरात संपूर्ण वातावरण भाजपमय पहायला मिळाले. बैठकीसाठी आलेल्या सर्व मान्यवर तसेच प्रतिनिधींचे स्वागत ते समारोप, निवास, पार्किंग, भोजन अशी सर्व व्यवस्था उत्तम होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वांनी नियोजनाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि सहकाऱ्यांचे कौतुक केले. माजी मंत्री व विद्यमान आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर महाराष्ट्रातील दहा सर्वोत्कृष्ट आमदारांमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांचे कार्य आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
Be First to Comment