पेण तालुक्यात शेकापक्ष पुन्हा जोमाने उतरणार — माजी आमदार धैर्यशील पाटील
सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆
शेकापक्ष हा कष्टकरी, श्रमजीवी, मजूर, शेतकरी या वर्गाचा असून गेली अनेक वर्षे रायगड जिल्ह्यामध्ये लढवय्या पक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्र याकडे पाहत आहे त्यामुळे पेण तालुक्यात शेकापक्ष पुन्हा निवडणुकीच्या माध्यमातून जोमाने उतरणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार धैर्यशील पाटील केले आहे.
शेतकरी कामगार पक्षाचा ७५ वा वर्धापन दिन पेण वडखळ येथे आयोजित करण्यात आला असून या निमित्ताने पेण येथील कार्यालयात आठावा बैठका घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा चिटणीस अँड. आस्वाद पाटील, कार्यालयीन चिटणीस प्रदीप नाईक, ज्येष्ठ नेते के.डी. म्हात्रे, अँड. सचिन जोशी, प्रल्हाद पाटील, जि.प. सभापती अँड.निलिमा पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, डी.बी. पाटील, प्रभाकर पाटील, संतोष जंगम देवा पाटील, माजी नगराध्यक्ष गुरुनाथ मांजरेकर आदींसह पेण तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना पाटील म्हणाले की मागील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पेण मधील पाचही जागा आम्ही निवडून आणल्या मात्र अध्यक्ष पद वरिष्ठ नेत्यांनी दुसरीकडे दिले याची खंत मनाला लागून राहिली अशी खंत त्यांनी यावेळी सांगितली तर यापुढे मात्र आमचा निर्णय आम्हालाच घ्यावा लागेल आम्ही दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणार नाहीत कार्यकर्ते जे ठरवतील तोच निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगून येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा पेणच्या सर्वच्या सर्व जागा जिंकण्यासाठी शेकापक्ष जोमाने उतरणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
तर या आढावा बैठकीत जिल्हा चिटणीस अँड.आस्वास पाटील यांनी सांगितले की पक्ष अधिक बळकट करण्यासाठी तरुणांनी गावागावात आपल्या पक्षाची बांधणी करणे गरजेचे आहे. पक्ष संघटना ही मोठी आहे. त्याच्यापेक्षा कोणीही मोठा नसतो त्यामुळे पक्षाची बांधिलकी जोपासणे आपले प्रथम कर्तव्य असून ७५ व्या वर्धापन दिनासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी सामील व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
Be First to Comment