कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना घरपोच देत आहेत औषध व मदत कार्य
सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
संपूर्ण जगभरात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्याने परिस्थिती अधिकच जोखमीची होत आहे. केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक पातळीवर सातत्याने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. महाराष्ट्रात देखील रुग्णांचा आकडा वेगाने वाढत आहे त्यांतच कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रांत रुग्णांची संख्या कमालीची वाढत आहे. याचं परिस्थितीत महानगरपालिकेने ज्या रुग्णांना आपल्या घरीच विलगीकरणात राहणे शक्य आहे त्यांना घरातच विलगीकृत केले. संबंधित रुग्णांना घरपोच औषधे देण्यासाठी स्वयंसेवकांनी पुढाकार घ्यावा यांसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात बैठक ठेवण्यात आली मात्र तेथे केवळ दोन युवक उपस्थित राहिले होते. बैठकीला उपस्थित अविनाश पाटील या युवकांने आपले इतर दोन मित्र चेतन म्हामुणकर आणि स्वप्नील शिरसाठ यांच्या मदतीने हे अवघड काम करण्यास होकार देत मदत कार्य सुरू केले.
७ जुलै पासुन रोज संबंधित रुग्णांच्या घरी जावुन त्यांना हे युवक औषधी देत आहेत यांसाठी लागणारे औषधे संबंधित हेल्थ पोस्ट कडुन या युवकांना दिले जाते त्याचबरोबर पेशंटच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी वरीष्ठ नागरिकांचा एक गट देखील कार्यरत आहेत पेशंटला गोळ्या संदर्भात मार्गदर्शन करणे त्यांची वेळोवेळी विचारपूस करणे हे काम ते करत आहेत. स्वयंसेवकांच्या नियोजनपूर्वक कामामुळे हेल्थपोस्टला देखील मदत मिळत असल्याची माहिती अविनाश पाटील यांनी दिली.
अविनाश पाटील आणि स्वप्नील शिरसाठ यांनी समाजकार्याचे व्यावसायिक शिक्षण घेतले आहे तर चेतन म्हामुणकर गेल्या पंधरा वर्षांपासून सामाजिक कार्य करत आहे. कल्याण शहरांतील या तीन कोविड योध्दामुळे अनेकांना तातडीने मदतमिळत आहे त्यामुळे या तरुणांच्या कामांचे कौतुक सर्वच स्तरांतुन होत आहे. महापालिका आयुक्त विजय सुर्यवंशी त्याचबरोबर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील आणि आरोग्य केंद्राचे डॉ. सतेज शर्मा, डॉ. सीमा जाधव, डॉ. शोभा साबळे, डॉ. रश्मी ठाकुर, डॉ. वैशाली काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे या संपुर्ण कामांचे नियोजन डॉ. स्नेहलता कुरीस ह्या करत आहेत.
Be First to Comment