नागोठण्यात दुस-या कीर्तन महोत्सवाचे १७ मे ला आयोजन
सिटी बेल • नागोठणे • महेश पवार •
सद्गुरू श्री गणपतबाबा अलिबागकर महाराज प्रेमवर्धक वारकरी सांप्रदाय, स्वानंद सुख निवासी सद्गुरू स्वामी गणेशनाथ महाराज सांप्रदाय व आदिनाथ नामधारक सांप्रदाय यांच्या आशीर्वादाने चाळीसगाव वारकरी सांप्रदाय, नागोठणे विभाग यांच्या वतीने नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या प्रांगणात १७ व १८ मे, २०२२ रोजी दुस-या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती चाळीसगाव वारकरी सांप्रदायाचे संस्थापक ह.भ.प. रायगड भूषण दळवी गुरुजी यांनी दिली.
या कीर्तन महोत्सवात ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीच्या ९ व्या व १२ व्या अध्यायाचे पारायण, अखंड हरीनाम तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कीर्तन महोत्सवाची सुरुवात मंगळवारी (दि.१७) सकाळी नऊ वाजता मंगल पूजनाने होणार आहे. त्यानंतर दीप प्रज्वलन, मंगल पूजन, कलश पूजन, ध्वजारोहण, वीणा पूजन, श्री ज्ञानेश्वरी पूजन, नंतर श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन, सायंकाळी नागोठणे विभागातील चाळीसगाव वारकरी सांप्रदायाचे सामुदायिक हरिपाठ व रात्री ७ वाजता जळगाव येथील प्रसिद्ध कीर्तनकार खानदेश्वररत्न ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली जळकेकर यांचे कीर्तन व त्यानंतर हरी जागर होणार आहे.
या कीर्तन महोत्सवाचा समारोप बुधवार दि. १८ मे रोजी सकाळी दहा वाजता वाणीभुषण, भिवंडी येथील ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे.
रायगड भूषण पुरस्कारप्राप्त वांगणी येथील ह.भ.प. दळवी महाराज (गुरुजी) यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला व यंदा दुसरे वर्ष असलेल्या या कीर्तन महोत्सवाची जय्यत तयारी सुरु असुन हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी या कीर्तन महोत्सवाच्या आयोजक समितीचे अध्यक्ष ह.भ.प. हिराजी महाराज शिंदे, कार्याध्यक्ष के.के. कुथे भाऊसाहेब, उपाध्यक्ष ह.भ.प. नानाजी महाराज शिरसे, खजिनदार उदंड(आप्पा) रावकर व सचिव घनश्याम जंगम, सहखजिनदार तुकाराम राणे, सहसचिव ह.भ.प. नरेश महाराज जाधव, नागोठणे विभाग चाळीसगाव वारकरी सांप्रदायच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह आयोजक समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य मेहनत घेत आहेत.
Be First to Comment