होलि एंजल स्कुलच्या अध्यक्षा सिमा मुल्कवाड यांना पालकवर्गाने वाहिली श्रद्धांजली
सिटी बेल • नागोठणे • महेश पवार •
नागोठण्यातील नीव सोशियल अँड एज्युकेशनल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या होली एंजल स्कुलच्या अध्यक्षा सिमा विजय मुल्कवाड यांचे एका दुर्धर आजाराने वयाच्या ५५ व्या वर्षी निधन झाले होते. त्यानिमित्ताने बुधवार दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता पालकवर्गांनी व विद्यार्थ्यांनी स्कुलच्या प्रांगणात दिवंगत सिमा मुल्कवाड यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली.
सिमा मॅडम या एका दुर्धर आजाराने आपल्यातून निघून गेल्या असल्यातरी अप्रत्यक्षपणे त्या आपल्यातच आहेत. त्यांनी शिस्तबद्धपणे, कठोरतेने वागून पुढील पिढी घडविण्याचे मोलाचे काम केले असुन त्यांना फणसाची उपमा दिली तर वावगे ठरणार नाही. होली एंजल स्कुलचे लहान रोपट्यातून वटवृक्ष करण्यात सिमा मॅडम यांचा सिंहाचा वाटा आहे. स्कुलचे मुख्याध्यापक विजय मुल्कवाड, शिक्षक, कर्मचारी व आपण सर्व पालकवर्गांनी स्कुलच्या उज्ज्वल भविष्याचे सिमा मॅडम यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न करा अशी भावनिक साद पाली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा पालक राजेश मपारा यांनी श्रद्धांजली अर्पण करताना घातली.
श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागोठणेचे माजी सरपंच विलास चौलकर, सामाजिक कार्यकर्ते किशोरभाई म्हात्रे, सामाजिक कार्यकर्त्या श्रेया कुंटे, केदार कुंटे, निलेश म्हात्रे, मुख्याध्यापक विजय मुल्कवाड, विजय सरांच्या मुली रूधिरा, रेचल, बंधू सुनील ढाकणे, स्कूल इन्चार्ज मधुरा एकबोटे, हेडमिस्ट्रेस नीलिमा राणे, मुकेश मिसाळ, लेखनिक राजन विळेकर, स्कूल कोआॅर्डिनेटर नाजिया दफेदार, किमया मांडलुस्कर, सपना शिर्के आदींसह शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक वर्ग यावेळी उपस्थित होते.
आपल्याला सोडून जाताना विजय.. स्कुल, विजय.. स्कुल असे सिमा अस्पष्ट बोलत होत्या – विजय मुल्कवाड
सिमा मॅडम ह्या अनुशासन प्रिय व सदगुणी स्त्री होत्या. आपला शब्द पाळला जावा हीच त्यांची अपेक्षा असायची कारण त्यांना नेहमीच विद्यार्थ्यांच्या भवितव्याची काळजी असायची. त्या गेले दोन ते तीन वर्ष एका दुर्धर आजाराने ग्रासलेल्या होत्या. गेल्या सहा महिन्यांपासून त्या फारच थकल्या होत्या. सिमा मॅडम आपल्याला सोडून गेल्यामुळे आपल्यावर दुःखाचा डोंगर जरी कोसळला असला तरी सिमा मॅडमच्या मदतीनेच आपण पुन्हा शालेय कामकाज जोमाने सुरु करण्याचा प्रयत्न करू. आपल्याला सोडून जाताना विजय…. स्कुल, विजय…. स्कुल असे सिमा मॅडम अस्पष्ट बोलत होत्या त्यावरून त्यांना आपल्या शाळेची किती काळजी होती याची मला जाणीव झाली. यावेळी मुख्याध्यापक विजय मुल्कवाड यांना आपल्या भावनांना आवर घालणे अशक्य झालेले दिसून येत होते.
Be First to Comment