Press "Enter" to skip to content

रमेश शिंदे यांचे निधन

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते राकेश शिंदे यांना पितृशोक

तटकरे कुटुंबीयांनी व्यक्त केला शोक, वरसगाव कोलाड पंचक्रोशीवर पसरली शोककळा

सिटी बेल • पाली/बेणसे • धम्मशील सावंत •

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते राकेश शिंदे यांचे वडील रमेश शिंदे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी गुरुवारी रात्री 10 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर वरसगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेश शिंदे (आप्पा ) हे वरसगाव गावाचे आधारस्तंभ व मार्गदर्शक होते. आप्पांनी सामाजिक, धार्मिक व सेवाभावी क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ व मनमिळावू होता. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या आदिवासी कातकरी समाजबांधवांच्या उत्कर्षासाठी आप्पानी महत्वपुर्ण योगदान दिले. अडिअडचणीत व संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदतीचा हात देवून त्यांना आधार देण्याचे काम आप्पानी सातत्याने केले. मुलांनी शिकून समाजसेवेच्या कामी झोकून देवून काम केले पाहिजे याकरीता ते आग्रही होते. त्यांनी नेहमीच मुलांना व समाजाला दिशादर्शक मार्गदर्शन केले. बहुजन समाजाच्या उत्कर्षासाठी त्यांनी आजन्म तनमनधनाने योगदान दिले. कै. शिंदे यांच्या सामाजिक, सेवाभावी कार्याचा वसा राकेश शिंदे , व राहुल शिंदे प्रभावीपणाने जपण्याचे व पुढे नेण्याचे काम करीत आहेत.

आप्पा सर्वपरिचित व जनमानसात लोकप्रिय होते.तरुणांना सामाजिक , धार्मिक, चळवळीत समाविष्ट करून घेण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले. गावात कायम बंधुत्व, सामाजिक सलोखा व एकोपा राखला जावा यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले. कुणाच्याही अडीअडचणीच्या प्रसंगात ते मदतीला धावून जात असत. तसेच सर्वांच्या सुखदुःखात देखील ते सहभागी होत असत.

यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांनी अंत्ययात्रेस उपस्थित राहून आप्पाच्या कार्यकर्तृत्वाबद्दल माहिती देत आदरांजली वाहिली. तसेच आप्पाच्या निधनानंतर खासदार सुनिल तटकरे , पालकमंत्री आदीतीताई तटकरे यांनी शोक व्यक्त करून आदरांजली वाहिली. अंत्ययात्रेस विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पछात पत्नी,दोन मुले व एक मुलगी , नातवंडे असा परिवार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.