Press "Enter" to skip to content

हिंदु जनजागृती समितीची मुंबई महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी

हिंदवी स्वराज्य विरोधक टिपू सुलतानचे नाव छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातील क्रीडासंकुलाला का ? क्रीडासंकुलाचे नामकरण त्वरित रहित करा !

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

मालवणी येथील क्रीडासंकुलाला क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव देण्याचा कोणताही अधिकृत प्रस्ताव नसल्याचे मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. अर्थात क्रीडासंकुलाचे ‘टिपू सुलतान’ हे नामकरण अनधिकृत आहे, हेच यातून स्पष्ट होते. टिपू सुलतान ‘हिंदवी स्वराज्य विरोधक’ होता. त्याच्या नावाचे क्रीडासंकुल छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात का ? असा प्रश्‍न उपस्थित करत या क्रीडासंकुलाचे नामकरण रहित करा, तसेच या क्रीडासंकुलाच्या प्रवेशद्वारावर असलेला ‘टिपू सुलतान क्रीडासंकुल’ हा फलक त्वरित काढण्यात यावा, अशी मागणी आज हिंदु जनजागृती समितीने केली. या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीचे सतीश सोनार यांनी राज्याचे मुख्यमंत्री, मुंबईच्या महापौर आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्या कार्यालयात दिली.

‘क्रूर टिपू सुलतान : दक्षिण भारत का औरंगजेब’ या ऑनलाईन विशेष संवादातील मान्यवराचे विचार !

टिपू सुलतान हा खलनायकच होता आणि खलनायकच राहील ! – अधिवक्ता सतीश देशपांडे

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘क्रूर टिपू सुल्तान : दक्षिण भारत का औरंगजेब? ’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये बोलतांना इतिहास आणि संस्कृतीचे अभ्यासक-लेखक तथा अधिवक्ता सतीश देशपांडे म्हणाले की, टिपू सुलतान आणि औरंगजेब यांना भारतीय संस्कृतीशी काही देणे-घेणे नव्हते. टिपूच्या शासनकाळात हजारो हिंदूंच्या मंदिरांचा विध्वंस करण्यात आला, हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या, हिंदु स्त्रियांवर बलात्कार करण्यात आले, हिंदूंचे बळजबरीने धर्मांतरण करण्यात आले. हिंदु संस्कृतीचा विनाश करण्याचे कामच टिपू सुलतानने केले, हे सर्व इतिहासात उपलब्ध आहे. अशा स्थितीत टिपू सुलतानचे भारतीयीकरण करून, त्याला आदर्श मानून कोणी राष्ट्रीय नायक बनविण्याचा प्रयत्न करत असेल, तर हे भारतीयांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. भारत कधीच टिपूला ‘नायक’ म्हणून स्वीकारणार नाही. टिपू सुलतान हा खलनायकच होता आणि खलनायकच राहील.

या संवादात विश्‍व हिंदु परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्रमंत्री शंकर गायकर म्हणाले की, हिंदूंनी शिथिलता आणि सद्गुण विकृती यांमुळे स्वतःचे खूप नुकसान करून घेतले आहे. क्रूरकर्मा टिपू सुलतानचे महिमामंडन या देशात होता कामा नये. टिपू सुलतानचे उदात्तीकरण रोखणे, हे सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह सर्व हिंदूंचे दायित्व आहे.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट म्हणाले की, आज अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्यासाठी टिपू सुलतान आणि मोगल आक्रमकांचे उदात्तीकरण केले जाते. फक्त राजकीय पक्षच नव्हे, तर सध्याची शिक्षणव्यवस्था अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करत चुकीचा इतिहास आपल्याला शिकवत आहे, हा इतिहास पालटला पाहिजे. मुंबईतील अवैध ‘टिपू सुलतान क्रीडासंकुला’वर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही. तोपर्यंत हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा विरोध सुरूच राहील.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.