नांदगावच्या पुरातन जागृत दैवत श्री सिध्दिविनायकाचा माघी उत्सव संपन्न
सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
अष्टविनायक स्थान नसले तरीही पुरातन आणि जागृत भक्तांच्या हाकेला धावणार्या अत्यंत कडक अशा स्वयंभू श्रीसिध्दिविनायक देवस्थानाचा माघी उत्सव कोरोना, ओमायक्राॅन चे संकट बाजूला सारून परंतु त्या संबंधीच्या सर्व नियमांचे पालन करीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
माघ शुध्द प्रतिपदे पासून पुण्याचे ह.भ.प मांडके बुवांच्या सुश्राव्य कीर्तनाने या माघी उत्सवास प्रारंभ झाला.चिटणीस-गुप्ते ट्रस्ट, सेवा मंडळ,नित्यपूजा,नैवेद्य व ब्राह्मणभोजन ट्रस्ट तथा माघ चतुर्थी वार्षिक उत्सव ट्रस्ट यांच्या तर्फे सदर उत्सवाचे आयोजन करण्यात येते.प्रतिवर्षाप्रमाणे प्रतिपदेच्या दिवशी श्रींची बालमूर्ती यजमानांकडून आणून तिचे षोडशोपचारे पूजन करुन पुण्याहवाचन केले गेले .
त्यानंतर कीर्तन,महाप्रसादी कार्यक्रम तर चतुर्थीच्या दिवशी पहाटे एक वाजता मंदिराचे पुजारी महेश जोशी,शैलेश जोशी,मनोज जोशी, विनायक जोशी,चिन्मय जोशी,रोहीत जोशी आदींनी केलेल्या पाद्यपूजे नंतर ट्रस्टच्या यजमानांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर पहाटे दोन वाजता मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
रायगडच्या जिल्हाधिकार्यांनी जारी केलेल्या
आदेशानुसार मंदिरासमोरील पटांगणात जत्रेतील विविध वस्तु,मिठाई व अन्य दुकानांना परवानगी देण्यात आली नव्हती.तर तेथे भक्तांना रांगेसाठी दर्शनासाठी बांबू बांधण्यात आले होते.दरवर्षी प्रमाणे ग्रामस्थ मंडळींतर्फे भक्तांना शिर्याचा प्रसाद वाटण्यात आला.पहाटे आठ वाजल्यापासून स्थानिक भजनी मंडळांची सुस्वर भजने सुरु होती.सकाळी अकरा वाजता श्री गणेशजन्माचे कीर्तन तल 12.40 वा.श्रीगणेश जन्म सोहळा व त्यानंतर भगिनींचे सुस्वर पाळणा गित व आरतीनंतर उपस्थित भक्तगणांना बाळगणेशाचे दर्शन दिले गेले.
गत वर्षी कोरोना महामारीमुळे सुरु असलेल्या लाॅकडाऊनमुळे उत्सवास खीळ बसली होती परंतु यावर्षी तिच्या सावटाखाली परंतु कमी गर्दीत मोठ्या आनंदात हा उत्सव साजरा करण्यात आला. उत्सवाकरीता मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिरातही फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.रात्री पालखी सोहळा,पहाटे लळीताचे कीर्तन,एकविस पदार्थांचा महाप्रसाद अर्पण करुन या माघी उत्सवाची सांगता करण्यात आली.
Be First to Comment