Press "Enter" to skip to content

आता पेटवू सारे रान

एक महिन्याचा अल्टिमेटम : येत्या काळात तब्बल एक लाख भूमिपुत्र रस्त्यावर उतरणार

तर एक लाख भूमिपुत्र रस्त्यावर उतरवणार; दिबांच्या नावासाठी १०५ हुतात्मे द्यायला तयार – दशरथदादा पाटील

तो पर्यंत लढाई अधिकाधिक तीव्र केली जाईल. – माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर

यापुढे बेमुदत काम आंदोलन; येत्या काळात सिडकोचा चक्का जाम करायचा – आमदार प्रशांत ठाकूर

हे घ्या रक्त किती पाहिजे ते सांगा – दशरथ भगत

लोकभावना न घेता बाळासाहेबांच्या नावाचा ठराव – कॉम्रेड भूषण पाटील

एके ५६ वाल्यांनो हिंमत असेल तर पहिली गोळी मला घाला- माजी उप महापौर जगदिश गायकवाड

सिटी बेल | पनवेल | हरेश साठे |

आता पेटवू सारे रान असा एल्गार करत भूमिपुत्रांनी सिडकोला त्यांच्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. एवढेच नाही तर सिडको वठणीवर नाही आली तर येत्या काळात तब्बल एक लाख भूमिपुत्र रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा या आंदोलनातून जाहीर करण्यात आला आहे. दिबांच्या नावासाठी काहीही झाले तरी चालेल, अशी रोखठोक भूमिका कायम ठेवत ‘जय दिबा’ असा जयघोष करत आज (२४ जानेवारी) ओवळे फाटा येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लाक्षणिक काम बंद आंदोलन लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, २७ गाव प्रकल्पबाधित कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली हजारो प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या साक्षीने झाले.

प्रकल्पग्रस्तांच्या मागील आंदोलनांचा अनुभव घेत या आंदोलनावेळी हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात करावा लागला होता. वारकरी मंडळींनी टाळ पखवाजचा ठेका घेत दिबांचा जयजयकार केला. तर दिबासाहेबांचा विजय असो, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, सिडको मुर्दाबाद, अशा घोषणांनी भूमिपुत्रांनी आसमंत दणाणून सोडला होता. या आंदोलनाचा धसका घेऊन सिडकोने स्वतःहून विमानतळाचे काम बंद केले. अन्यथा विमानतळ क्षेत्रात घुसून काम बंद करण्याची तयारी यावेळी स्प्ष्टपणे दिसत होती. मात्र विमानतळाचे काम बंद आहे कि नाही याची खात्री करण्यासाठी आमदार महेश बालदी, नंदराज मुंगाजी यांच्या नेतृत्वाखाली भूमिपुत्रांच्या ५० भूमिपुत्रांनी विमानतळ कामाची पाहणी करून काम बंद असल्याची खात्री केली.

रखरखत्या उन्हात या आंदोलनात लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, २७ गाव प्रकल्पबाधित कृती समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीता पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, माजी उपमहापौर जगदिश गायकवाड, कॉम्रेड भूषण पाटील, राजाराम पाटील, संतोष केणे, गुलाब वझे, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, समितीचे खजिनदार जे. डी. तांडेल, दशरथ भगत, रुपेश धुमाळ, प्रेम पाटील, राजेश गायकर, दीपक पाटील, उत्तम कोळी, सुनील पाटील, किसान सभेचे रामचंद्र म्हात्रे, प्रभाग समिती सभापती वृषाली वाघमारे, नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, अमर पाटील, दिलीप पाटील, विजय चिपळेकर, प्रवीण पाटील, संतोष शेट्टी, विकास घरत, नगरसेविका दर्शना भोईर,चारुशीला घरत, सुशीला घरत, हेमलता म्हात्रे, प्रमिला पाटील, युवा नेते दशरथ म्हात्रे, कुंडेवहालचे सरपंच सदाशिव वास्कर, विजय घरत, गोवर्धन डाऊर, दगडू गायकवाड, युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

तर एक लाख भूमिपुत्र रस्त्यावर उतरवणार; दिबांच्या नावासाठी १०५ हुतात्मे द्यायला तयार – दशरथदादा पाटील
रायगडला दिबा नावाचे नेतृत्व दैवत मिळाले आहे. भूमिपुत्रांचे हे आंदोलन दीर्घकाळ चालणार आहे, आणि तशी तयारी भूमिपुत्रांनी ठेवली आहे. सरकारची सकारात्मक दृष्टी होत नाही तो पर्यंत आक्रमक पवित्रा असणार असून यापुढे तीव्र आणि आक्रमक आंदोलन असतील. भूमिपुत्र संतापलेला आहे. त्यामुळे सिडकोच्या अधिकाऱ्यांना बांगड्या भरायला कमी पडणार नाही. भूमिपुत्रांच्या बाबतीत सिडकोच्या एमडींकडे निर्णय क्षमता नसेल तर त्यांनी पद सोडावे. हे सरकार रक्तपिसावू असेल तर रक्त घ्या पण दिबांचे नाव आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात. राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील यांनीही दिबांच्या नावास पाठींबा दिला आहे. दिबांच्या नावासाठी सर्व पक्षातील नेत्यांनी राजकीय चपला बाजूला सारून सहभागी झाले पाहिजे. हे आंदोलन अनेक वर्ष चालेलही पण भूमिपुत्र शांत राहणार नाही आणि भूमिपुत्र अशांत झालं तर सरकार चालवणे कठीण होईल. संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्मे झाले तसे दिबांच्या नावासाठी १०५ हुतात्मे द्यायला तयार आहोत. पुढील २४ तारखेला पुन्हा आंदोलन करणार आहोत त्याची रणनीती येत्या १० दिवसात जाहीर करू आणि त्याच्यापुढची आंदोलने यशस्वी होईपर्यंत तीव्र अति तीव्र स्वरूपात होतील त्याचबरोबर येत्या काळात पाचही जिल्ह्यातील एक लाख भूमिपुत्र रस्त्यावर उतरवणार आहोत, असेही त्यांनी जाहीर केले.

तो पर्यंत लढाई अधिकाधिक तीव्र केली जाईल. – माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर
दिबासाहेबांचे नाव आणि प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विमानतळाचे काम बंद पाडण्याची भूमिका घेऊन आपण सर्व आलो. सिडकोला माहित होते काम बंद नाही केले तर भूमिपुत्र आंदोलक आक्रमक होईल आणि तोच धसका घेऊन विमानतळाचे काम बंद केले. ज्या स्तरावर आंदोलन होईल त्या वेळेला पुढे जाण्यासाठी युवा आणि महिला सरसावले आहेत. सर्वपक्षीय कृती समिती आणि २७ गाव समिती दिबासाहेबांचे नाव, ७९ गाव तसेच ९५ गावांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करीत आहे. सर्व बाबतीत सिडको चालढकल करतेय. चार दिवसापूर्वी झालेल्या सिडको सोबतच्या चार तासाच्या बैठकीत सिडकोचे अधिकारी चर्चेत फक्त वेळकाढूपणा करत होते. किती दिवस चर्चा करायची आता लढाई उत्तरोत्तर तीव्र करायची. कितीही आंदोलने करावी लागली तरी चालेल सिडकोला स्वस्थ बसू द्यायचे नाही. सिडकोच्या कार्यालयात घुसण्याची तयारी करावी लागेल. हुतात्म्यांचे रक्त वाया जात नसते वाया जाऊ द्यायचे नसते. हे दिबांनी शिकवले आहे. जो पर्यंत दिबांचे नाव आणि भूमिपुत्रांचे प्रश्न सुटत नाही तो पर्यंत लढाई अधिकाधिक तीव्र केली जाईल.

यापुढे बेमुदत काम आंदोलन; येत्या काळात सिडकोचा चक्का जाम करायचा – आमदार प्रशांत ठाकूर
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या प्रश्नावर सिडकोने डोळे बंद केलेले आहेत, ते उघडण्यासाठी हे आंदोलन उभारले आहे. तळपत्या उन्हात तहान मांडून भूमीपुत्र या आंदोलनात सहभागी झाला आहे. दिबासाहेबांनी संघर्षाचा मूलमंत्र दिला आहे, हि भूमी संघषाची भूमी आहे. प्रकल्पग्रस्तांचे हक्क संघर्षाशिवाय मिळत नाही आणि मिळाले नाहीत. सिडकोकडे एमडी, जॉईंट एमडी, आयएएस दर्जाचे अधिकारी आहेत ते फक्त बैठका घेतात पण निर्णय घेत नाहीत. हे अधिकारी दोन तीन वर्षासाठी येतात, आणि नव्याने उजळणी करत बसतात त्यांचा कार्यकाळ संपतो तो पर्यंत त्यांना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाशी काही देणे घेणे नसते, त्या जागी पुन्हा दुसरे आले कि पुन्हा सुरुवाती पासून उजळणी सुरु असे ३० वर्षे सिडकोने वेळ मारू पणा केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सिडकोचे अध्यक्ष केले. त्यानंतर प्राधान्याने मी प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय आणि भूमिका घेण्याचे अधिकाऱ्यांना वारंवार सांगत आलो. त्या अनुषंगाने निर्णय झाले. साधारण दीड वर्ष मी अध्यक्ष होतो. या काळात दोन निवडणुकांच्या आचारसंहिता लागल्या. वेळ कमी मिळाला पण प्रकल्पग्रस्त स्थानिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सकारात्मक कामे केली. पण आज पुन्हा येरे माझ्या मागल्या करत कारभार करत आहे. सिडकोला वाटतंय कोविड बचावासाठी येईल, सिडको प्रकल्पग्रस्तांना गांभीर्याने घेत नाही सिडकोकडे निर्णय क्षमता राहिली नाही त्यामुळे आंदोलनाशिवाय पर्याय उरला नाही. दिबासाहेबांचे नाव विमानतळाला लागले पाहिजे यासाठी सर्व आंदोलनात भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांचा मोठा वाटा आहे. काम बंद पाडणे आपले उद्दिष्ट नाही तर प्रकल्परस्तांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत हे आपले प्रमुख उद्दिष्ट आहे. सिडको आणि राज्य सरकार भूमिपुत्रांच्या बाबतीत गंभीर नाही हे प्रकर्षाने जाणवत आहे.आज एक दिवस लाक्षणिक आंदोलन केले पण यापुढे बेमुदत काम आंदोलन करावे लागेल आणि येत्या काळात सिडकोचा चक्का जाम करावाच लागेल, असा इशाराही आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको व राज्य शासनाला दिला.

हिंमत होती तर आज विमानतळाचे काम करून दाखवले पाहिजे होते. प्रकल्पग्रस्तांची ताकद काय आहे ते दाखवून दिली असती. आजचा हा इशारा होता पुढचे आंदोलन सिडकोची विचित्र असेल.
– – नंदराज मुंगाजी, अध्यक्ष- २७ गाव समिती

हा लढा फक्त २७ गावाचा राहिला नाही तर संपूर्ण भूमिपुत्रांचा झाला आहे. एक दिवस लाक्षणिक आंदोलन झाले पण पुढच्यावेळी आंदोलन तीव्र असेल. डिसेंबर २०२४ ला विमान उडेल असे सिडकोचे अधिकारी सांगतात पण प्रकल्पग्रस्तांनी विमानतळाचे काम बंद पडले तर विमान कसे उडेल. – जगन्नाथ पाटील, माजी मंत्री

लोकभावना न घेता बाळासाहेबांच्या नावाचा ठराव – कॉम्रेड भूषण पाटील
आजचे लाक्षणिक काम बंद आंदोलन हा तीव्र लढाईचा इशारा आहे. जो पर्यंत दिबासाहेबांचे नाव नाही तो पर्यंत थांबायचे नाही. लोकांच्या भावना लक्षात न घेता बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव केला पण मागणी करूनही सिडको अद्यापही ठराव भूमीपुत्रांकडे लेखी स्वरूपात का देत नाही, न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार.

एके ५६ वाल्यांनो हिंमत असेल तर पहिली गोळी मला घाला- माजी उप महापौर जगदिश गायकवाड
सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या विरोधात कटकारस्थान केले आहे. विमान उडले नाही तर प्रकल्पग्रस्तांना काहीही फरक पडणार नाही. प्रकल्पग्रस्त, पोलीस उन्हात आणि सिडकोचे अधिकारी वातानुकूलित कार्यालयात बसले आहेत. दिबांच्या विचारांचे चिलखत आमच्याकडे आहे म्हणू एके ५६ वाल्यांनो हिंमत असेल तर पहिली गोळी मला घाला. दिबांचे नाव आणि योग्य पुनर्वसन अशा मागण्या आहेत त्या पूर्ण करा. पोलिसांना पुढे करायचे आणि आंदोलन चिरडायचे हा सिडकोचा धंदा आहे, पण आता माघार नाही तर प्रकल्पग्रस्तांना सर्वपरीने न्याय मिळत नाही तो पर्यंत हि लढाई सुरूच राहणार.

हा घ्या रक्त किती पाहिजे ते सांगा – दशरथ भगत
यावेळी दशरथ भगत यांनी आपल्या भाषणात, हे जन सरकार नाही तर दंडसरकार आहे.पोलीस बांधव आपल्यासोबत आहेत कारण त्यांना माहीत आहे की सिडकोने प्रकल्पग्रस्तांवर अन्याय केला आहे. १९८४ च्या रक्तरंजीत लढाईतून सरकारने रक्त घेतले, पाच हुतात्मे झाले. असा घणाघाती हल्ला चढवत सरकारला रक्ताचा अभिषेक पाहिजे का? आम्ही देतो पण दिबांचे नाव विमानतळाला द्या असे आवाहन करत स्वतःच्या हातावर वार करत रक्त काढले आणि हा घ्या रक्त किती पाहिजे ते सांगा अशी हाक देत गावागावात रक्ताचा अभिषेक कार्यक्रम घेऊ, तुमच्याकडे गोळी,बंदुका, बॉम्ब आहे पण आम्ही घाबरणार नाही, आम्हाला नक्षलवादी बनवायचे आहे का ते सांगा.

यावेळी विक्रांत घरत, प्रेम पाटील, राजाराम पाटील, ह. भ. प. विठाबाई भोईर, जे. डी. तांडेल, गुलाब वझे, पंढरीनाथ पाटील, दगडू गायकवाड, निलेश तांडेल यांचीही भाषणे झाली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.