Press "Enter" to skip to content

कंपनीला १५ दिवसांचा अल्टीमेट

कोरोनाने मृत कामगाराच्या पत्नीचा नोकरीसाठी बेक केमिकल कंपनीसमोर उपोषणाचा इशारा

कंपनीकडून फसवणूक झाल्याचा विद्या भगत यांचा पत्रकार परिषदेत आरोप : किशोरभाई म्हात्रे करणार लढ्याचे नेतृत्व

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळात कोरोनानेच मृत्यू झालेले धाटाव औद्योगिक वसाहतीमधील मे. बेक केमिकल प्रा.लि. या कंपनीतील कायम कामगार नरेश दत्ताराम भगत यांच्या पश्चात नोकरीत लावण्याचे आश्वासन देऊनही कंपनी व्यवस्थापन नोकरी देण्यास टाळाटाळ करून फसवणूक करीत असल्याचा आरोप नरेश यांच्या पत्नी विद्या भगत यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच बेक केमिकल कंपनी व्यवस्थापनाने येत्या १५ दिवसांत समाधानकारक निर्णय न दिल्यास कंपनीच्या प्रवेशद्वारासमोरच बेमुदत उपोषण करण्याचा इशारही मृत कामगाराच्या पत्नीने दिला आहे.

नागोठण्यातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष किशोरभाई म्हात्रे, विद्या यांचे वडील चंद्रकांत रटाटे, आई प्रमिला रटाटे, मावशी मालती कदम, ६ वर्षाची मुलगी ओवी आदी उपस्थित होते. दरम्यान या लढ्याचे नेतृत्व किशोरभाई म्हात्रे हे करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

धाटाव-रोहा येथील मे.बेक केमिकल या कंपनीत बोरघर(ता.रोहा) येथील दिवंगत नरेश भगत हे १ ऑक्टोबर २०१३ पासून कायम कामगार म्हणून नोकरीत होते. मात्र कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळात २७ जुलै २०२० रोजी त्यांचा पनवेल-मुंबई येथील रुग्णालयात उपचाराअंती मृत्यू झाला. नरेश भगत यांच्या पश्चात पत्नी विद्या भगत व ओवी ही एक सहा महिन्याची मुलगी आहे. या मुलीच्या शिक्षणासह संपूर्ण पालनपोषणाची जबाबदारी विद्या यांच्यावर आली आहे. त्यामुळेच आपले पती नरेश भगत यांचे निधनानंतर विद्या यांनी वारसदार म्हणून बेक कंपनीकडे आपले पती नरेश यांच्या कंपनीतील सर्व कायदेशीर देणी मिळण्यासाठी अर्ज केला होता. याचवेळी मुलीचे शिक्षण व संगोपन करण्यासाठी कंपनीत नोकरी मिळण्यासाठीही त्यांनी विनंती केली होती.

त्यानंतर काही दिवसांनी २ जानेवारी, २०२१ रोजी बेक कंपनीचे येथील एक वरिष्ठ अधिकारी व कंपनीचे सर्वेसर्वा अतुल आठवले यांनी श्रीमती विद्या नरेश भगत यांना कंपनीत बोलवून त्यांची दिशाभूल करीत फुल अँड फायनल सेटलमेंटच्या नावाखाली केवळ ७८ हजार, ११९ रुपये एवढी तुटपुंजी रक्कम विद्या यांच्या बँक खात्यात जमा करून तुम्हाला कंपनीमध्ये नोकरी देतो, उर्वरीत पैसेही देतो अशी बतावणी केली. तसेच विद्या यांना दिवंगत नरेश यांच्या ग्रॅज्युइटी पोटी युनियन बँकेचा रु, २ लाख, ९२ हजार, ४३३ रुपयांचा धनादेश देऊ केला असता नोकरीचा विषय शिल्लक असल्याने तसेच कंपनीतील जनरल मजदूर सभा या अधिकृत कामगार संघटनेचा एकही प्रतिनिधी त्यांची मिटिंग सुरु असल्याने उपस्थित नसल्याने विद्या यांनी हा धनादेश घेण्यास नकार दिला होता. मात्र ही रक्कम तुमची हक्काची असल्याने याचा नोकरीशी काही संबंध नाही. नोकरीचा विषय वेगळा असून तो आपण नंतर घेणारच आहोत अशी दिशाभूल करीत आठवले यांनी स्वतः पत्र लिहून त्यावर विद्या भगत यांची सही घेतली व त्यामध्ये कंपनीकडून आता इतर कोणत्याही कायदेशीर येण्यांपैकी काहीही रक्कम येणे नाही असाही उल्लेख करून फसवणूक केल्याचे विद्या भगत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याबाबत विद्या भगत व त्यांच्या नागोठण्याजवळील वणी या माहेरच्या गावातील मंडळी कंपनी व्यवस्थापनाला जाब विचारण्यास कंपनीच्या गेटवर गेले वर्षभर फेरफटके मारत असताना कधी आठवले साहेब मिटिंग मध्ये आहेत तर कधी बाहेर गेले आहेत असे उत्तर सुरक्षा रक्षक देत आहेत.

दरम्यान अशाप्रकारे एका विधवा व निराधार महिलेची दिशाभूल करून लेखी घेऊन व नोकरीच्या बाबतीत टाळाटाळ करीत फसवणूक करण्याचे काम बेक कंपनी व्यवस्थापनाने केले आहे. त्यामुळे विद्या भगत यांना कंपनीमध्ये कायमस्वरुपी नोकरीत सामावून घावे अन्यथा कंपनीच्या गेटसमोर बेमुदत उपोषणासह उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी किशोरभाई म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिला. यासंदर्भात कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अतुल आठवले यांच्याशी संपर्क होऊनही त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.