Press "Enter" to skip to content

शहरातील उपरी वाहिन्या भूमिगत करण्याची मागणी

कामोठे शहरासाठी नवीन उपकेंद्र उभारून वीज व्यवस्थेचे पर्याय उपलब्ध करून देण्याची किशोर मुंडे यांची मागणी

सिटी बेल | कामोठे |

कामोठे शहरासाठी नवीन उपकेंद्र उभारून वीज व्यवस्थेचे पर्याय उपलब्ध करून देणे व शहरातील उपरी वाहिन्या भूमिगत करण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कामोठे शहरचे कार्याध्यक्ष किशोर वसंत मुंडे यांनी अति,कार्यकारी अभियंता. कळंबोली विभाग, म.रा.वि.वि.कं.म. यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कामोठे शहरामध्ये वरचे वर वीज जाणे हे सत्र तर एक प्रकारे कामोठेवासियांना ग्रामीण भागात राहिल्या सारखीच अनुभूती देत आहे. तसेच याप्रकारामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. कारण कोवीड १९ च्या प्रभावामुळे बऱ्याच मुलांचे शिक्षण व नोकरदार वर्गाचे कामकाज हे ऑनलाईन पध्दतीने चालू आहे व या वीज जाण्याच्या सत्रामुळेच बऱ्याचदा यात खंड पडत असतो आणि त्यामुळे मुलांचे, नोकरदार वर्गाचे व व्यापाऱ्यांचे देखील मोठे नुकसान होत आहे आणि या गोष्टींसाठी सर्वस्वी जबाबदार हे महावितरण विभाग आहे.

कारण कामोठे सारख्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरात फक्त एकच उपकेंद्र आहे व त्यावर अधिकतम ताण येत असल्यामुळे वरचे वर महावितरण विभागाद्वारे शहरातील वीज घालवून त्यावर मेंटेनन्स ची कामे करावी लागतात तसेच खारघर कडून येणारीलाईन ही देखील सिंगल लाईन असल्याकारणास्तव लाईन वर होणारे एक्सीडेंट जसे लाईन वर झाड तुटून पडणे, वादळवारयामुळे पोल पडणे, कन्डक्टर वायर तुटणे यासारख्या घटणा घडत असल्यामुळे कामोठेकरांना बऱ्याच वेळेला अंधारात राहावे लागते व चोरांन मुळे भितीच्या सावटा खाली रहावे लागते. तसेच अजून एका महत्त्वपूर्ण मुद्द्याकडे आम्ही तुमचे लक्ष केंद्रित करू इच्छितो की, येथील भागात घरगुती व व्यवसायिक असे ८० हजार ग्राहक आहेत आणि परिणामी फक्त एकच उपकेंद्र आहे हे खूपच खेदजनक असून दुसरीकडे खारघर सारख्या शहरामध्ये ६० हजार ग्राहकांस महावितरण विभागाकडून १० उपकेंद्र उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत ही बाब नक्कीच कामोठेवासीयांन साठी अन्यायकारक आहे.

या मागणीचा महावितरण विभागाने गांभिर्याने विचार करावा व लवकरात लवकर कामोठे शहरासाठी नवीन उपकेंद्र उभारावे व शहरातील सर्व उपरी वाहिन्या या भूमिगत करून घ्याव्यात आणि शहरवासीयांची या त्रासातून सुटका करावी ही नम्र विनंती.

किशोर वसंत मुंडे, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामोठे शहर

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.