पत्रकार सुधीर पाटील यांचा पर्यावरण संवर्धनाचा आदर्श
सिटी बेल | पनवेल |
आपण निसर्गाचे देणं लागतो या उक्ती प्रमाणे काही माणसं निरपेक्ष भावनेने सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतात. असेच एक पर्यावरण प्रेमी म्हणजे पत्रकार सुधीर नामदेव पाटील. या अवलियाने एक-दोन नव्हे तर चक्क पाच लाख वनौषधी बियांचेे वाटप करून समाजापुढे पर्यावरण संवर्धनाचा आदर्शच ठेवला आहे.
निसर्गाच्या संरक्षणाचा ध्यास लागलेल्या सुधीर पाटील यांनी अर्जुनसादडा, विजयसार, बिब्बा,महानिंब,रानकेळी,टेंटू, निर्गुंडी,वज्रदंती,बहवा, भोकर,शाल्मली, सर्पगंधा, वाकेरी,गारबी,अगस्ता,करंज, खैर, कडूकिराईत, सर्पगंधा,अश्वगंधा,कांचनार, गोखरू,चित्रक,मालकांगोणी, मुरुडशेंग, सागरगोटा,रिठा, गुळवेल,कुटज, कोरांटी, शिवलिंगी,परिपाठ आदी जवळ-जवळ १५० प्रकारच्या वनौषधी झाडांच्या बियांचे वाटप केले. विशेष म्हणजे यामध्ये देशी वृक्षांच्या बियांचे प्रमाण अधिक होते.
स्थानिक वनौषधीचा एन्साक्लोपिडिया म्हणून ओळखले जाणारे सुधीर पाटील हे फक्त बीज वाटप करून थांबले नाहीत. चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा,वनौषधी परिचय शिबिरे, वृक्षारोपण,वृक्ष संवर्धन, चर्चासत्रे आदी कार्यक्रम राबवून त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले आहे. गेल्या दहा वर्षात २००० पेक्षाही अधिक मोफत वनौषधी परिचय शिबिरे त्यांनी घेतली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना मेडिसिनल प्लॅन्ट मॅन,पर्यावरण मित्र,वन मित्र,वनौषधी मित्र या सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
सुधीर पाटील म्हणजे चालती बोलती चळवळ आहे.या वनौषधी मित्राने आज पर्यंत अक्षरशः हजारो झाडे लावली आहेत. वनौषधी झाडे लागवड,संवर्धन त्यांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहचविता येईल याचाच त्यांना नेहमीच ध्यास लागलेला असतो. चांगल्या कामाचा शेवट नसतो, असते ती फक्त सुरुवात. पर्यावरण संवर्धनाचे हे व्रत प्रत्येकानेच कायम अंगिकारले पाहिजे असे सुधीर पाटील यांचे म्हणणे आहे.
Be First to Comment