विद्यार्थ्यांनी उत्तम माणूस होण्याचे स्वप्न बाळगावे : कॅप्टन डॉ.मिलींद भगत यांचे आवाहन
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
विद्यार्थ्यांनी दररोज पंचेचाळीस मिनीटे तरी व्यायाम करणे आवश्यक असून शिक्षण नुसते पैसे कमविण्यासाठी न घेता खऱ्या अर्थाने ज्ञान मिळविण्यासाठी घ्यावे आणि प्रथम उत्तम माणूस होण्याचे स्वप्न बाळगावे, असे आवाहन कॅप्टन डॉ.मिलिंद भगत यांनी केले.
पोलादपूर तालुक्यातील सहयोग प्रतिष्ठान यांच्या वतीने तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यालयांचा व विद्यार्थ्यांचा तसेच आदर्श शिक्षक आणि गुणवंतांचा सत्कार करण्याचा शानदार गुणगौरव सोहळा साने गुरुजी विद्यालयाच्या प्रांगणात झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेचे अधिव्याख्याते कॅप्टन डॉ.मिलींद भगत तर अध्यक्षस्थानी सहयोग प्रतिष्ठान पोलादपूरचे कार्याध्यक्ष रमेश चव्हाण हे उपस्थित होते.
यावेळी व्यासपिठावर वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष साळुंखे, सहयोगचे कार्यवाह काठाळे व विश्वस्त सुरेंद्र जाधव, सुभाष ढाणे, सुखदेव मोरे, मदन एकबोटे, किसन सुरवसे, विजय दरेकर, लीलाजी शेडगे, अ.वि.जंगममास्तर तसेच मुख्याध्यापक पाटील, मुख्याध्यापिका सुगंधा वाढवळ, साधना चिकणे तसेच संजना शिंदे या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस हॅलीकॅप्टर दुर्घटनेत शहिद झालेले सी.डी.एस. बिपिन रावत व त्यांच्या पत्नी तसेच लष्करी अधिकारी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली व नंतर साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुखदेव मोरे यांच्या नेतृत्वाखाली संचालन करून प्रमुख पाहुणे कॅप्टन डॉ. मिलिंद भगत यांना मानवंदना दिली. दीप प्रज्वलन करून स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. काठाळे यांनी प्रस्तावना केल्यावर विद्यार्थी व शिक्षकांनी तसेच वरिष्ठ गटशिक्षण अधिकारी सुभाष साळुंखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
रमेश चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषणात, उत्तम ज्ञान मिळवून विद्यार्थ्यांना आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न बघा व आपल्या मातृभूमीचे आणि माता पित्यांचे, शिक्षकांचे ॠण कायम मानत रहावे, असे सांगितले. सुभाष ढाणे, चिवीलकर यांनी बक्षिस वितरण समारंभाचे सुत्रसंचलन केले.
यावेळी कापडे विद्यालय व उमरठ विद्यालय यांना फिरता शशीताई लाड फिरता स्मृती चषक देऊन सन्मानित करण्यात आले तर आदर्श शिक्षक किसन सुरवसे, आदेश साळवी, नारायण चोरगे शिक्षकेतर कर्मचारी शिपाई धनराज गोपाळ, गिरीधर दरेकर तसेच मुख्याध्यापिका सुगंधा वाढवळ यांचाही सत्कार करण्यात आला. शेवटी सुरेंद्र जाधव यांनी आभार मानले व राष्ट्र गीताने सांगता करण्यात आली. साने गुरुजी विद्यालयाच्या शिक्षिका अंकीता जंगम यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.








Be First to Comment