Press "Enter" to skip to content

शिवा संघटनेचे संस्थापक प्रा.मनोहर धोंडे यांच्या उपस्थितीत मंत्रालयामध्ये आढावा बैठक संपन्न

तीर्थक्षेत्र कपिलधारच्या सर्वांगीण विकासासाठी 100 कोटीच्या प्रस्तावाला ग्रामविकास मंत्र्यांची मान्यता

मंजूर कामातील निकृष्ट दर्जाच्या कामांच्या चौकशीसाठी समिती गठित

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

वीरशैव लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र कपिलधारच्या सर्वांगीण विकासासाठी 100 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात यावी, आणि जी कामे मंजूर झालेली आहेत त्या कामामध्ये झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी केली होती. या मागणी वरून मंत्रालयामध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आ. संदीप क्षीरसागर, बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार ,कार्यकारी अभियंता आदींच्या प्रमुख उपस्थितीसह शिवा संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शंभर कोटीच्या विकासकामांना मंजुरी आणि निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्याचे आदेश ग्रामविकास मंत्र्यांनी पारित केले.

मुंबई येथील मंत्रालयात ग्राम विकास मंत्री तथा कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या तिसऱ्या माळ्यावरील मंत्रालय कक्षामध्ये तीर्थक्षेत्र कपिलधार येथील संत शिरोमणि मन्मथ स्वामी देवस्थान विकास कामासंदर्भात ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीला सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, बीड विधानसभेचे आ. संदीप क्षीरसागर, बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हाळीकर यांच्यासह शिवा संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांत आप्पा शेटे, राज्य उपाध्यक्ष वैजनाथराव तोनसुरे, राज्य सरचिटणीस रुपेश होनराव, पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव विवेक स्वामी बीड, राज्य संघटक नारायण कंकणवाडी,ठाणे जिल्हाप्रमुख शिवा बिराजदार, ठाणे जिल्हा संघटक गुरुलिंग औटे, सोशल मीडिया प्रमुख शंभू जळकोटे, ज्ञानेश्वर बनसोडे, अनिल बदोले, शेवडीचे सरपंच बसवेश्वर धोंडे, आदीं प्रमुख शिष्टमंडळ उपस्थित होते.

या बैठकीमध्ये शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी तीर्थक्षेत्र कपिलाधारच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शंभर कोटी रुपयांचा प्रस्ताव शिवा संघटनेने मागील पंधरा वर्षांपासून दिलेला आहे, त्यापैकी 11 कोटी 26 लक्ष रुपये मागील भाजपा सरकारच्या कार्यकाळात मंजूर झाले असून तो निधी देखील वर्ग झालेला आहे. त्यापैकी जी कामे सुरू आहेत ती निकृष्ट दर्जाची होत असल्याने ती कामे थांबवावीत आणि कामे दर्जेदार करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने द्यावेत, त्याच बरोबर कपिलधारच्या सर्वांगीण विकासासाठी शंभर कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी अशी मागणी केली.

यावर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तीर्थक्षेत्र कपिलधारच्या विकासासाठी शिवा संघटनेने केलेली मागणी रास्त असून त्या मागणीनुसार ग्रामविकास खात्याने तात्काळ निधी मंजूर करावा आणि प्रस्तावित कामाला मंजुरी देण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाने अद्यावत प्रस्ताव तयार करावा असे आदेश जिल्हा प्रशासन बीडला दिले. जी कामे मंजूर झालेले आहेत, ती जर निकृष्ट दर्जाची होत असतील तर त्याचे तात्काळ जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश काढावेत. सर्व कामे दर्जेदार करावीत, जर कामे निकृष्ट झालेली असतील तर ती कोणीही केलेली असो त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी स्पष्ट भूमिका मांडली.

यावेळी बैठकीचे अध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी बीड आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना केली की, तीर्थक्षेत्र कपिलधारच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांचा नव्याने अद्यावत प्रस्ताव तात्काळ सादर करावा. जी कामे सुरू आहेत ती जर निकृष्ट दर्जाची होत असतील तर तात्काळ तीन सदस्यीय समिती नियुक्त करून सदरील कामांचा आढावा घ्यावा. सदरील काम जर निकृष्ट दर्जाचे झालेले असतील तर ती कामे कोणीही केलेली असली तरीदेखील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी त्यांना पुढील आदेश निघेपर्यंत निधी देण्यात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या.

सदरील बैठकीमध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सकारात्मक भूमिका घेऊन कपिलधार च्या विकास कामासाठी तात्काळ उचललेली विधायक पावले आणि निकृष्ट कामासंदर्भात घेतलेला आक्रमक पवित्रा याबद्दल शिवा संघटनेच्या वतीने संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांनी बैठकीनंतर विशेष आभार मानून त्यांचे अभिनंदन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.