सिडको प्रशासनाने कायम प्रकल्पग्रस्तांचे ऋणी राहिले पाहिजे
– जी एस गिल
सिटी बेल | उलवे |
उलवे नोड विकसित करण्याच्या नियोजनामध्ये मी देखील सहभागी झालो होतो. सिडकोच्या माध्यमातून याविभागाचा झालेला कायापालट पाहता आज अत्यानंद होत आहे. या प्रक्रियेचे किमयागार जरी सिडको असले तरीदेखील त्या प्रशासनाने प्रकल्पग्रस्त बांधवांचे सदैव ऋणी राहिले पाहिजे असे उद्गार सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक जी एस गील यांनी काढले. ते दुधे बिल्डर्स निर्मित सी रिजेंसी या प्रकल्पाच्या उद्घाटन समयी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.सोमवार दिनांक 13 डिसेंबर रोजी हा उद्घाटन सोहळा पार पडला.

तुकाराम दुधे संचलित दुबे बिल्डर्स यांच्या वतीने उलवे नोड सेक्टर 3 येथे अद्ययावत अशा गृहनिर्माण प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. सी रीजेन्सी असे या प्रकल्पाचे नाव असून नावाप्रमाणेच अथांग निळ्याशार समुद्राच्या किनारी असणारा हा प्रकल्प निश्चितच राहण्यासाठी एखाद्याचे ड्रीम डेस्टिनेशन असेल. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री साई संस्थान शिर्डी चे माजी अध्यक्ष सुरेश हावरे, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा इंटक चे राष्ट्रीय सचिव, कामगार नेते महेंद्र शेठ घरत, नवी मुंबई पोलिस परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक शंकर शेठ म्हात्रे, वास्तुरचना तज्ञ ठाकरे, जळगावचे जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, ऍडव्होकेट जगदीश उरणकर, मयुरेश खिसमतराव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

दुधे बिल्डर्स ने या प्रकल्पाकरिता “लाईफ स्टाईल फार बियोंड ऑर्डीनरी” अशी टॅग लाईन ठेवली आहे. येथील अद्ययावत घरांच्यात वास्तव्य करणाऱ्यांची लाईफ स्टाईल एका अनोख्या पातळीवर उंचावली जाणार आहे. उद्घाटन समयी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रवेश कक्ष, तरण तलाव, जिम्नॅशियम, इंडोर गेमिंग झोन, लहान मुलांचे प्ले गार्डन यांची फित कापून उद्घाटने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी गेल्या अडीच दशकांतील दुधे बिल्डर्स यांच्या प्रवासाचे कौतुक करत त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जी एस गिल यांनी, त्यांच्या निवृत्तीनंतर देखील तुकाराम दुधे यांनी मैत्रीपूर्ण संबंध जपून आजी तसेच माजी अधिकारी यांना देखील कार्यक्रमात सन्मानाने बोलावल्याबद्दल त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला.

यावेळी भावना प्रकट करताना सुरेश हावरे म्हणाले की, तुकाराम दुधे आणि त्यांच्या तमाम सहकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. दुधे यांचे अभिनंदन करत असताना त्यांनी एक विकसक म्हणून यशस्वी होण्याची चतुःसुत्री उपस्थितांसमोर विशद केली. त्याच बरोबर येथील प्रकल्पग्रस्त बांधवांना सिडकोने अद्यापही हक्काच्या जमिनीचे पुनर्वसन पोटी साडेबारा टक्के विकसित भूखंड पूर्णपणे दिले नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. आज ज्या पद्धतीने प्रकल्पग्रस्त बांधवांनी एकजुटीने हे हक्क मिळविले त्याच पद्धतीने पुन्हा एकदा एकजूट करून उर्वरित पावणे चार टक्के हक्क मिळवावे लागतील असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.

सी रिजेंसि या प्रकल्पातील अत्याधुनिक सोयींनी आणि सुविधांनी युक्त अशा सदनिका खरेदीसाठी उपलब्ध झाल्याची घोषणा मान्यवरांनी या कार्यक्रमातून केली. या इमारतीत उभे राहून पाहिल्यानंतर बेलापूर सीबीडी पासून ते थेट दक्षिण मध्य मुंबई पर्यंतचा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. शेजारीच असणार्या न्हावा शिवडी सी लिंक प्रकल्पामुळे सी रीजेंसी या गृहनिर्माण प्रकल्पाला नजीकच्या भविष्यात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे.
तुकाराम दुधे व विकी दुधे यांनी मान्यवरांचे शाल,पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.सुप्रसिद्ध गायक गुरु कदम यांनी बहारदार आवाजात उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन केले तर एकनाथ दुधे यांनी कार्यक्रमाचे अंती आभार प्रदर्शन सादर केले.
आज येथील प्रकल्पग्रस्त बांधव गुण्यागोविंदाने ऐश्वर्या संपन्न जीवन जगत आहे याचे श्रेय प्रकल्पग्रस्तांची आन-बान शान असणारे लोकनेते दि बा पाटील यांचे आहे. त्यांनीच उभारलेल्या 1984च्या ऐतिहासिक लढ्यात मी स्वतः सहभागी झालो होतो याचा मला अभिमान आहे. येथील विभागाचा रायगड जिल्हा परिषद सदस्य असताना देखील वीस वर्षांपूर्वी मी वास्तव्यासाठी पनवेलला गेलो. कारण या पंचक्रोशीत फारसा विकास झालेला नव्हता. परंतु आज मात्र दिवस पालटले आहेत मी पुनश्च माझ्या गावच्या घरी राहायला आलो असून आता येथून मुंबई, नवी मुंबई,ठाणा, येथे थेट ॲक्सेस निर्माण झाले आहेत. आज अवघ्या दहा मिनिटात आपण येथून पनवेल येथे पोहोचतो. तुकाराम दुधे यांच्या सोबत माझे मैत्रिपूर्ण संबंध असून त्यांचे काम मी गेली दोन दशके जवळून पाहत आहे. प्रामाणिकपणा आणि सचोटी च्या जीवावर त्यांनी या ठिकाणी एक यशस्वी विकसक म्हणून नावलौकिक कमाविला आहे.
– महेंद्र घरत
काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा इंटक चे राष्ट्रीय सचिव








Be First to Comment