प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे डंपिंग ग्राउंड मध्ये होत आहे रुपांतर
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
स्वर्गीय अनंताकाका जोशी यांनी जोपासलेल्या कर्जत स्मशानभुमीचे काम एकीकडे सुरू आहे तर दुसरी कडे त्या परिसरात नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकत आहेत, नगरपरिषद प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे स्मशानभुमीचे रुपांतर डंपिंग ग्राउंड मध्ये होत आहे अशी प्रतिक्रिया माहिती अधिकार कार्यकर्ता प्रभाकर गंगावणे यांनी दिली आहे.
मरावे पण कीर्ती रूपे उरावे हि म्हण आपल्याला सांगते की, आपण किती आयुष्य जगले हे महत्वाचे नाही. पण, आपण जितके आयुष्य जगले त्यामध्ये असे काही चांगले कार्य केले पाहिजे की, लोक आपल्याला आपल्या मृत्युनंतर पण स्मरण करतील आणि आपली प्रशंसा करतील. मरावे पण कीर्ती रूपे उरावे हे समर्थ रामदासांचे बोध वचन आहे. समर्थांनी ह्या छोट्या शब्दात अतिशय मोलाचा उपदेश केलेला आहे. अशाचप्रकारे कर्जत शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना पक्षाचे खंबीर नेतृत्व म्हणजेच अनंताकाका जोशी. गोर गरीब, सामान्य तसेच अन्याय ग्रस्तांना न्याय मिळवुन देण्यासाठी रात्रीचा दिवस करून झटणारे, आबालवृद्धांच्या ह्रदयात राहणारे ह्रदयसम्राट म्हणुन नावलौकिक मिळवलेले असे स्वर्गीय अनंताकाका जोशी. आज काकांना जाऊन एका तपापेक्षा अधिक काळ लोटला गेला तरी, आजही कर्जत शहरातच नव्हे तर तालुक्यात, जिल्ह्यात काकांचे नाव लहानथोरांच्या स्मरणात आहे.

ज्यावेळी कर्जत नगरपरिषद ग्रामपंचायत म्हणुन अस्तित्वात होती, त्यावेळी शहरातील मृत व्यक्तींना अंत्यसंस्कार करण्यास स्मशानभुमीची आवश्यकता होती त्यावेळी अनंताकाकांनी पुढाकार घेऊन आपल्या व्यापारी मित्रांना तसेच शहरातील सहका-यांच्या सहाय्याने कर्जत स्मशानभुमीची निर्मिती केली आणि स्मशानभुमीतच अंत्यविधीसाठी लागणार-या लाकडांची देखील सोय केली. काकांनी सुमारे चाळीस ते पन्नास वर्षे जोपासलेल्या कर्जत स्मशानभुमीची मात्र त्यांच्या हयातीनंतर दयनीय अवस्था झाली. जसे घरातील कुटुंबप्रमुख दगावल्याने कुटुंब उघड्यावर पडतं.. काहीसं तसंच कर्जत स्मशानभुमीच देखील झालं आणि स्मशानभुमीचच स्मशान झालं. कालांतराने काकांच्या कार्याची उपरती होऊन नव्याने कर्जत स्मशानभुमी समितीची नोंदणीकृत स्थापना करण्यात आली. नव्या जोमाने नवनिर्वाचित कर्जत स्मशानभुमी समितीने स्मशानभुमीचे नुतनीकरण करण्याचे ठरविले आणि सुमारे ऐंशी लाख रुपये खर्चाचा आराखडा तयार करून पैकी वीस लाख रुपये खासदार संजय राऊत यांच्या विकास निधीतुन तर तीस लाख रुपये कर्जत नगरपरिषद फंडातुन असे सुमारे पन्नास लाख रुपये खर्चाचे काम करण्यात आले. परंतु, मागील दोन अडीच वर्षांपासुन आराखड्याप्रमाणे सुरू असलेल्या स्मशानभुमीचे काम पुर्ण न झाल्याने तसेच प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कर्जत स्मशानभुमी डंपिंग ग्राउंड मध्ये रुपांतरीत होत आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागी व मुख्य बाजारपेठ रस्त्यालगत असलेल्या स्मशानभुमीच्या प्रवेशद्वारापासून ते आतील सर्व भागात कच-याचे मोठमोठे ढीग तयार होत चालले आहेत, वाढलेल्या जंगली गवतामुळे व पडलेल्या वृक्षामुळे स्मशानभुमीचेच स्मशान झाले आहे. स्मशानभुमीच्या दयनीय अवस्थेमुळे स्वर्गीय अनंताकाकांच्या देखील डोळ्यात अश्रु आले असतील. परंतु, प्रशासनास मात्र त्याची तीळमात्र पर्वा नाही असे चित्र दिसत आहे.
हि बाब अत्यंत खेदजनक असुन कर्जत स्मशानभुमी समितीच्या सदस्यांनी स्वर्गीय अनंताकाका जोशी ह्यांनी जोपासलेल्या व जतन केलेल्या कर्जत स्मशानभुमीचे युद्ध पातळीवर नुतनीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत. हिच खरी स्वर्गीय अनंतकाकांना श्रद्धांजली ठरेल. नुसते जन्माला येणे व आयुष्य संपल्यावर मरून जाणे अशा जीवनाचा काही अर्थ नाही असे जीवन तर इतर प्राणीही जगतात. मग मनुष्याच्या जीवनात काय फरक राहिला ? ह्यासाठी प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनात अशा प्रकारे जगावे की शरीराने मरून सुद्धा अनंतकाका जोशी ह्यांसारखे कीर्तीरूपाने जिवंत राहिले पाहिजे.








Be First to Comment