डॉ. बाबासाहेब यांच्या खऱ्या कार्याची महान आठवण आजच्या पिढीला होणे गरजेचे : सरपंच डॉ. चेतन जावसेन
सिटी बेल | बोर्ली मांडला | अमूलकुमार जैन |
दलितांच्या उद्धारासाठी आयुष्यभर लढा देणारे डॉ. बाबासाहेब यांच्या खऱ्या कार्याची महान आठवण आजच्या पिढीला होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन बोर्ली सरपंच डॉ. चेतन जावसेन यांनी ग्रामपंचायत कार्यलायात महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना केले.
यावेळी सरपंच डॉ. चेतन जावसेन यांनी सांगितले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर देशाचा कारभार आतापर्यंत चालत आला आहे. मात्र मागील काही वर्षापासून संविधानातील मुल तत्वांना तिलांजली दिली जात असून संविधानच संपुष्टात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. संविधानाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी असून हिच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी आदरांजली ठरेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ बौद्ध धर्मियांनीच नव्हे; तर इतर समाजातील युवकांनी देखील त्यांचे चरित्र वाचत समाजातील प्रखर परिस्थितीशी नाळ जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.प्रत्येक गोष्टीत त्यांचा प्रचंड अभ्यास होता. दूरदृष्टी हा त्यांच्या विचारांचा गाभा होता.महापरिनिर्वाण दिन किंवा महापरिनिर्वाण दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो.
आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक ‘बोधिसत्व’ मानतात.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य वामन चुनेकर, उपसरपंच मतीन सौदागर,अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे कोकण विभागीय अध्यक्ष अमूलकुमार जैन, लिपिक सागर माळजी,नूतन नरहरी,ग्रामस्थ उपस्थित होते.








Be First to Comment