कॉ. राजेश ठाकूर यांच्या अपघाती मृत्यूला BPCL, सिडको, वाहतूक पोलीसांचा निष्काळजीपणा कारणीभूत
सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |
उरण सामाजिक संस्थेने भेंडखळ बीपीसीएल रस्त्याला ट्रक टँकर कंटेनर अशा वाहनांच्या अवैध बेशिस्त पार्किंगबद्दल अनेकदा आवाज उठवला. या रस्त्याला नागरिकांना तसेच नागरी वाहनाना होत असलेली गैरसोय, होणारे अपघात याची जाणीव BPCL, सिडको, वाहतूक पोलीस यांना करून दिली. त्यानंतर काहीकाळ हे रस्ते मोकळे झालेही. परंतु पुन्हा काही दिवसांनी या रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग करणारे पार्किंग माफिया पुन्हा सक्रिय झाले. आणि वाहनं बिनबोभाट उभी राहू लागली. उरण सामाजिक संस्था किंवा अन्य कुणी संस्था आपापल्या परीने यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतात परंतु त्यांना स्थानिकांचीही तितकीच साथ असावी लागते. नेमकी ती साथ हव्या त्या प्रमाणात मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे.
आता नेमक्या त्याच रस्त्याला याच अवैध बेशिस्त पार्कींगमुळे BPCL कंपनीचे कर्मचारी असलेले कामगारनेते कॉ. राजेश ठाकूर यांना जीव गमवावा लागलाय. ही घटना दुर्दैवी आहे. परंतु यातून कुणी बोध घेणार आहेत की नाही ? BPCL, सिडको, वाहतूक पोलीस यांचे पार्किंग माफियांशी साटेलोटे आहे की काय असा प्रश्न पडतो. त्यामुळे या अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या या प्रत्येक व्यवस्थेला जबाबदार धरलं पाहिजे.
उरण सामाजिक संस्थेने BPCL, सिडको, वाहतूक पोलीस यांना यापूर्वीही वेळोवेळी पत्रव्यवहार केला. बैठक घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे सुचवले. परंतु BPCL कंपनी प्रशासन कंपनीच्या आत प्रचंड मोकळ्या आवारात वाहनांना पार्किंग नाकारते. आणि त्या सर्व वाहनांना कंपनीच्या बाहेरील सिडकोच्या रस्त्यावर उभी करायला लावते. त्यांची ही कृती नागरिकांच्या जीवितास धोका पोहचवण्याची आहे. नव्हे तर ते जाणीवपूर्वक निष्काळजीपणा करताहेत, असं म्हणावे लागेल.
कॉ. राजेश ठाकूर यांचा गेलेला जीव परत येणार नाही. परंतु त्याना अद्दल घडवली पाहिजे. त्याचबरोबर सिडको, वाहतूक पोलीस यांनाही जबाबदार धरुन यांच्या वर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भेंडखल ग्रामस्थ, स्थानिक ग्रामपंचायत यांच्या कडून केली जात आहे.








Be First to Comment