Press "Enter" to skip to content

करंजा प्रकल्पांच्या रस्त्यांची वाट बिकट : वरिष्ठांकडे करणार चौकशीची मागणी

सुट्टीच्या दिवशी अधिकारी व ठेकेदाराचा कुटील डाव ग्रामस्थांनी उधळून लावला

सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू |

उरण परिसरातील करंजा परिसरात रोरो सेवा, मच्छीमार जेटी, पूल व इतर कोट्यावधींची कामे सुरू आहेत. परंतु ही सर्व कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असून मुदत संपूनही ती आजतागायत पूर्णत्वास गेलेली नाहीत. या सर्व कामांमध्ये शासनाची दिशाभूल करून संबंधित अधिकारी वर्ग व ठेकेदार मालामाल झाले आहेत. शनिवारी सुट्टीच्या दिवशी रोरो सेवा रस्त्याची पहाणी करण्यासाठी मुंबई मेरिटाइम बोर्डचे मेटकर व ठेकेदार आर. बी.चव्हाण आले होते. मात्र करंजा गावच्या जागृत ग्रामस्थांनी त्यांचा हा कुटील डाव हाणून पाडला असून ते त्यांची तक्रार वरिष्ठांकडे करून त्यांची  चौकशीची मागणी करणार असल्याचे समजते.     

शासनाकडून एखादा कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प सुरू करण्याआधी त्यासाठी मुख्य म्हणजे वाहतूक करण्यासाठी रस्त्यांची सोय करणे गरजेचे असतानाही त्याची कोणतीही रूपरेषा नाही. उरण तालुक्यातील करंजा गावात करंजा-रेवस रोरो सेवा, करंजा-रेवस पूल व मच्छीमारांसाठी जेटी अशी कोट्यवधीं रुपयांची कामे गेली अनेक वर्षांपासून सुरू आहेत. सदर कामांची मुदत संपूनही अद्याप ती पूर्णत्वास गेलेली नाहीत. तसेच सदर कामेही निकृष्ट दर्जाची असून यासाठी चोरीची माती व चिखल यांचा सर्रासपणे वापर करून शासनाची दिशाभूल संबंधित अधिकारी वर्ग व ठेकेदार यांनी केलेली आहे.     

शनिवार दि. 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता शासकीय सुट्टी असतानाही मुंबई मेरिटाइम बोर्डचे अधिकारी मेटकर व ठेकेदार आर. बी.चव्हाण आले होते. त्यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना  आपण रस्ता काँक्रेटचा करू असे सांगून भुलविण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु चाणजे परिसरात मोठं मोठे बंगले व घरे बांधण्यात आली आहेत. त्यामुळे करंजा येथून पुढे रस्ता बनविणे मोठे जिकरीचे बनणार आहे. त्यातील काही बंगले व घरे अनधिकृत असल्याचे समजते त्यावर शासन काय भूमिका घेते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी रस्त्यांची वाट बिकट बनली आहे.    

त्यावेळी करंजा गावचे सुपुत्र
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिवंगत रमेशशेठ डाऊर यांचे चिरंजीव सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी घटनास्थळी येऊन अधिकारी मेटकर व ठेकेदार चव्हाण यांना धारेवर धरीत सदर रस्त्याचा विचार तुम्ही प्रकल्प सुरू करण्याच्या आधी न करता  आता कसा करता असा सवाल करीत त्यांची बोलती बंदच केली. त्यात तुम्ही आज सुट्टीच्या दिवशी येऊन येथील ग्रामस्थांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. सदर जो रस्ता आहे, तो आमच्या डाऊर कुटूंबाने या परिसरातील जागृत देवस्थान समजले जाणारे द्रोणागिरी देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक व येथील जनतेच्या सेवेसाठी कोणताही मोबदला न घेता काही जमीन दिली आहे. त्या रस्त्याचा वापर या संबंधित प्रकल्पासाठी करता येणार नाही. तशा प्रकारचा संबंधित तक्रार अर्ज केला असल्याचे अधिकारी व ठेकेदार यांना ठणकावून सांगताच त्यांची पाचावर बसत बोलतीच पुरती बंद झाली.     

यानंतर उपस्थित सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर, सरपंच मंगेश थळी, करंजा ग्रामस्थ मंडळ जगदीश थळी, गजानन म्हात्रे, मेघनाथ थळी, कल्पेश थळी, रोहिदास म्हात्रे, धनेश म्हात्रे, चेतन माळी व मनोहर थळी आदींनी याला कडाडून विरोध करीत यासाठी आमची दिशाभूल करून प्रयत्न केल्यास तो हाणून पाडून त्या विरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.