सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
रात्रीच्या वेळी अचानक म्हैस समोर आल्याने अनेकांचे अपघात झालेले आपण नेहमीच पाहतो. संध्याकाळी प्रत्येक गावातील म्हशी चारून घरी परत आणतात तेव्हा त्यांचे गुराखी रस्त्याच्या मधूनच म्हशी घेऊन जातात. या जनावरांना समोरून येणाऱ्या गाडीबाबत काही कळत नाही. हॉर्न वाजवला किंवा गाडी जवळ आली, अगदी धडकली तरी त्या बाजूला होत नाहीत. त्यांच्या बरोबर असणारा गुराखी देखील त्यांना बाजूला करण्याची तसदी घेत नाहीत. त्यामुळे अपघात होतात आणि अनेक मोटरसायकल चालवणाऱ्यांना प्राणाला मुकावे लागले. त्यामुळे म्हशींच्या शिंगांना रेडियम पट्टी लावण्याची सक्ती करावी. अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.
काळा रंग असल्याने रस्त्यावर अचानक आलेली म्हैस वाहनचालकांना दिसत नाही. यामुळे बरीच वाहने, विशेषतः मोटारसायकलचा अपघात होऊन अनेक तरुणांचे जीव गेले आहेत. कशेळे येथील व्यापारी शंकर ठोंबरे हे कर्जतला जात असताना अचानक म्हैस आडवी आली. त्यामुळे त्यांची धडक बसून ते जबर जखमी झाले. त्यांना तातडीने अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या मेंदूला मार लागल्याने शस्त्रक्रिया सुद्धा केली. परंतु दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. अशा प्रकारच्या घटना अनेक ठिकाणी घडून कित्येक कुटुंबांचे आधारस्तंभ मृत्युमुखी पडले आहेत.
पूर्वी साधे रस्ते असायचे तसेच वाहने सुद्धा कमी होती. आता रस्ते चांगल्या स्थितीत आहेत आणि घरो घरी दोन – दोन, तीन – तीन वाहने आहेत. आता शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडेच नाही तर आदिवासी मुलांकडेही मोटरसायकल आहेत. त्यामुळे वाहनांची संख्या बेसुमार वाढली आहे. युवक मोटरसायकल चालवताना अगदी सुसाट असतात. अंधार पडल्यावर रस्त्यावर एखादे काळ्या रंगाचे जनावर अचानक आले तर मोटरसायकल वरील ताबा सुटून त्या जनावराला धडक बसते व अपघात होतो. या अपघातात एखादा अवयव निकामी होतो तर कधी जीवास मुकावे लागते. त्यामुळे मोटरसायकल चालकांनी गाडी चालवताना मर्यादित वेगात चालवावी आणि म्हशींच्या किंवा जनावरांच्या मालकांनी आपली जनावरांच्या शिंगांना रेडियमची पट्टी लावावी म्हणजे अपघात टळू शकतात.
‘माझी सर्व म्हैस मालकांना विनंती आहे, की आपण सायंकाळी म्हशी घरी आणताना रस्त्याच्या कडेने आणाव्यात.म्हशींच्या शिंगांना सफेद रंग किंवा रेडीअमची पट्टी लावावी. जेणेकरून समोरून येणाऱ्या वाहन चालकांना त्यांच्या शिंगावरील सफेद रंगामुळे किंवा रेडिअम पट्टीमुळे म्हशींचा कळप येत असल्याचे समजेल आणि अपघात टाळता येऊ शकेल. अपघाता मुळे या पुढे जीवितहानी होऊ नये याकरिता तबेले धारकांनी या सूचनेचा मान राखावा.’
—– उदय पाटील, ग्रामस्थ कशेळे








Be First to Comment