Press "Enter" to skip to content

मधुमेहींना विषेश सल्ला

दिवाळीनंतर शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी नागरिकांची जिमकडे धाव

जागतिक मधुमेह दिनानिमित्त डॉक्टरांचे सतर्क राहण्याचे आवाहन

सिटी बेल | आरोग्य प्रतिनिधी |

दिवाळी संपल्यानंतर शरीरातील मुख्यत्वे साखरेचे प्रमाण संतुलित राहण्यासाठी शहरातील नागरिक जिमकडे जात असल्याचे निरीक्षण समोर आले आहे. मुंबईला लागूनच असलेली ठाणे नवी मुंबई, कल्याण डोंबिवली ते थेट कर्जत कसारा, पनवेल पालघर ही शहरे पूर्णपणे विकसित झाली असून इथे अत्याधुनिक आरोग्य सुविधा वाढू लागल्या आहेत व यात प्रामुख्याने खाजगी जिमचा पुढाकार आपल्याला दिसून येतो.

नवी मुंबई येथील बिफोर- यु- स्पिक या खाजगी सर्वेक्षण संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार दिवाळीनंतर खाजगी जिम मध्ये मुख्यत्वे चाळिशी पुढील नागरिकांची ऍडमिशन घेण्यासाठी झुंबड उडाली आहे. या संस्थने नवी मुंबई, पनवेल येथील २४ खाजगी जिमशी संपर्क साधल्यावर हि बाब पुढे आली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदय शल्यविशारद डॉ. संजय तारळेकर म्हणाले, ” कोरोना महामारीमुळे आपल्याला निरोगी आरोग्याचे महत्व पटले आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीनुसार रोजच्या खानपानात वाढलेले फास्टफूड, व्यायामाचा अभाव, मानसिक ताणतणाव यामुळे प्रामुख्याने मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. भारतात मधुमेहाच्या रुग्‍णांची संख्या वेगाने वाढत असल्याचे ‘असोचेम’ने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. त्यानुसार २००६ मध्ये देशात मधुमेह झालेल्या नागरिकांची संख्या अडीच कोटी होती तर, ती २०१४ मध्ये वाढून तब्बल सात कोटींच्या घरात पोचली आहे. खानपानात जर बदल केला नाही तर २०३५ पर्यंत भारतातील मधुमेहाच्या रुग्‍णांची संख्या पंधरा कोटींच्या बाहेर जाईल. गेली दोन वर्षे आपण सर्वचजण कोरोना महामारीशी लढत होतो व या लढाईत मधुमेह हा महत्वाचा शत्रू होता. मधुमेह हा पूर्णपणे बरा न होणारा पण नियंत्रीत ठेवता येणारा एक प्रदीर्घ आजार आहे. रक्तातील वाढलेल्या साखरेमुळे शरीरातील रक्तवाहिन्यांसह महत्त्वाच्या अवयवांवर गंभीर परिणाम होतो. मधुमेहाचा मूत्रपिंड आणि हृदयासह रक्तवाहिन्यांवरही मोठा परिणाम होतो. मधुमेहाचा त्रास वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन पक्षाघात, अंधत्व, वंध्यत्व येऊ शकते. तसेच रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा झाला तर पायात रक्तपुरवठा न होणे, जखमेत संसर्ग, जखमा बऱ्या न होणे, जखमा दूषित होणे, पाय सडणे, असे त्रास सुरू होतात. या दोन वर्षांत नागरिक खूपच सजग झाले आहेत व आरोग्य क्षेत्रासाठी हि एक जमेची बाजू आहे. दिवाळीनंतर गोडधोड खाल्यानंतर अनेक नागरिकांमध्ये साखरेची मात्रा वाढते व अनेक नागरिक याकडे सर्रास दुर्लक्ष करतात.”

आपल्या शरीरात पेंक्रीयाझ नावाची एक ग्रंथी असते. यातून इन्सुलिन नावाचं हार्मोन तयार होत असतं. हेच इन्सुलिन आपली शरीरातील रक्तात तयार होणाऱ्या ग्लुकोज वा साखरेची मात्रा नियंत्रित ठेवण्याचे काम करतं. पण शारीरिक बदलासह पेंक्रीयाझ इन्सुलिन तयार करू शकत नाही आणि साखरेचा स्तर वाढत जातो. शेवटी तो मनुष्य मधुमेहाला बळी पडतो. मधुमेह असलेल्या नागरिकांनी फास्ट फूड, कोल्डड्रिंक्स, शिळे अन्न पदार्थ, तळलेले पदार्थ, स्निग्ध पदार्थ, दूध, दूधाची साय, लोणी, नारळ, अंडी, पामतेल, शुद्ध तूप, साखर, गूळ, मिठाई, चॉकलेट, मैदा, ब्रेड, भात, बटाटा, रताळे यांच्यासह आंबा, केळी, चिक्कू, द्राक्ष ही फळे खाऊ नयेत. तसेच ट्रान्स फॅटी ऍसिड घातक असल्याने वनस्पती तूप, वारंवार तळलेले पदार्थ, चीज, पिझ्झा, बर्गर, वडापाव, पावभाजी असे पदार्थ टाळण्याचा अथवा कमी खाण्याचा सल्ला कल्याण येथील सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.अभय गायकवाड यांनी दिला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.