भगवंताने दाखविलेला मार्ग स्वतःबरोबर दुसऱ्यालाही आनंद देतो : ना. आदितीताई तटकरे
वणी येथील विठ्ठल रखुमाई मूर्तींचा प्राण प्रतिष्ठा सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
रोहा तालुक्यातील धाटावसह अन्य ठिकाणी होणाऱ्या हरीनाम सप्ताहांना उपस्थित राहण्याची संधी मला व अनिकेतभाईंना मिळत असते. तेथे दरवर्षी महाप्रसादाचा कार्यक्रमही साहेबांच्या उपस्थितीत होत असतो त्यामुळे तटकरे कुटंबिय स्वतःला भाग्यवान समजते. हरिनाम सप्ताहात होणाऱ्या कीर्तनाच्या कार्यक्रमातून भगवंताचा मार्ग दाखवत असतांना चूक काय व बरोबर काय याचे मार्गदर्शन होत असते. आज वणीतील कीर्तन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ह.भ.प. पुरुषोत्तम पाटील महाराज यांच्या किर्तनाच्या माध्यमांतून रोहा तालुका, जिल्हा असो वा राज्यभर भगवंताचा मार्ग दाखविला जातो. हा मार्ग कठीण असला व सोपा नसला तरी त्या मार्गावर आपण चालत राहिलो तर आपण स्वतःही सुख व आनंद कमऊ शकतो व दुसऱ्यालाही सुख देऊ शकतो अशा भावना रायगडच्या पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे यांनी व्यक्त केल्या.
नागोठण्याजवळील वणी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरातील मूर्तींची प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आदितीताई तटकरे यांनी मंदिरात भेट दिली त्यावेळी त्या बोलत होत्या. आदिनाथ नामधारक मंडळ व ग्रामस्थ मंडळ वणी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला गुरुवर्य ह.भ.प.विठोबा महाराज मांडलुस्कर, प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील, राष्ट्रवादीचे विभागीय नेते भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, विलास चौलकर, बाळासाहेब टके, दिलीप आवाद, पिगोंडेचे सरपंच संतोषभाई कोळी, वणीच्या सरपंच प्रगती आवाद, विक्रांत घासे, दीपेंद्र आवाद, कडसुरे सरपंच राजेंद्र शिंदे, सखाराम ताडकर, दिनेश घाग, रोशन पारंगे, अक्षय नागोठणेकर आदींसह नागोठणे विभाग आदिनाथ सांप्रदायातील भक्तगण व ग्रामस्थ यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
तत्पूर्वी पालकमंत्री आदितीताई तटकरे यांनी विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन मूर्तींचे भक्तिभावाने दर्शन घेतले. त्यानंतर आदितीताई तटकरे उपस्थितांमध्ये बसून काही काळ कीर्तनामध्ये तल्लीन झाल्याचे यावेळी पहावयास मिळाले. यावेळी आदिनाथ नामधारक मंडळ व वणी ग्रामस्थांच्या वतीने ना. आदितीताई तटकरे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. श्री विठ्ठल रखुमाई मंदिरासमोर सभामंडप होण्यासाठी एक निवेदन यावेळी सरपंच प्रगती आवाद व आदिनाथ सांप्रदायाच्या वतीने आदितीताई तटकरे यांना देण्यात आले. दोन दिवस हरिपाठ, भजन, कीर्तन अशा भरगच्च कार्यक्रमांनी व अत्यंत भक्तीमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.
Be First to Comment