Press "Enter" to skip to content

कामोठ्यात पाण्यासाठी हल्लाबोल

महाविकास आघाडीच्या मोर्च्याने कामोठे दणाणले : ऊथळ सिडको अधिकाऱ्यांना आमदार बाळाराम पाटिलांनी झापले

३० सप्टेंबर पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी दिली डेड लाईन

सिटी बेल | कामोठे |

कामोठे नोड मध्ये होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येसाठी महाविकास आघाडीने आक्रमक होत सिडको विभागीय कार्यालयावर आज दिनांक २२ ऑक्टोबर रोजी मोर्चाचे आयोजन केले होते.आमदार बाळाराम पाटील यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने सिडकोचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर चोतानी आणि सहाय्यक कार्यकारी अभियंते चहारे यांच्याशी चर्चा केली. यावेळी येत्या एक आठवड्यात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास महा विकास आघाडीने सिडको कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.

झपाट्याने विकसित होणाऱ्या कामोठे नोड मध्ये प्रतिदिन 40 एम इल डी पाण्याची आवश्यकता आहे.तूर्तास केवळ केवळ 30 एम एल डी पाणी येत असल्यामुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.याबाबत नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांनी अनेक निवेदने देऊन देखील निष्क्रिय अधिकाऱ्यांनी यावर कुठलीही कारवाई केली नव्हती.

सिडको अधिकाऱ्यांनी दिलेली उथळ उत्तरे ऐकून आमदार बाळाराम पाटील यांनी आक्रमक होत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.नागरिकांच्या प्रति तुमची संवेदनशीलता संपलेली असून तुम्ही नागरिकांना जाच देण्याची कामे करत आहात.हे प्रकार असेच चालू राहीले तर वैयक्तिक पातळीवरती महाविकासआघाडी तुम्हाला धडा शिकवेल असा सज्जड इशारा आमदार बाळाराम पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला.

चर्चेच्या अंती येत्या आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन सिडकोच्या अभियंता यांनी दिले.तसे न झाल्यास प्रत्येक वॉर्डात तुम्हाला घेऊन फिरू आणि जिथे कुठे पाणी मुरतय त्याचा छडा लावू असा इशारा आमदार बाळाराम पाटील यांनी दिला आहे.काँग्रेस पक्षाचे पनवेल जिल्हा अध्यक्ष भाई आर सी घरत यांनी यावेळी पाणी पुरवठा करणारे ठेकेदार जर आमच्या हक्काचे पाणी इतर कोणाला विकत असतील तर त्यांची गाठ आमच्याशी आहे असे म्हणत अभियंत्यांची शाळा घेतली.

या मोर्च्याला आमदार बाळाराम पाटील, काँग्रेस पक्षाचे पनवेल जिल्हा अध्यक्ष भाई आर सी घरत, राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल जिल्हा अध्यक्ष नगरसेवक सतीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सूरदास गोवारी,शेकाप चे पनवेल विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, नगरसेवक शंकर शेठ म्हात्रे, नगरसेवक गोपाळ भगत, माजी नगरसेविका शशिकला सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे कामोठे शहर कार्याध्यक्ष किशोर मुंडे,माजी नगरसेवक प्रमोद भगत,अमोल शितोळे,तालुका चिटणीस राजेश केणी, पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र पाटील, देवेंद्र मढवी उपस्थित होते.

या मोर्चाचे आयोजन करत असताना पोलिसांनी हा मोर्चा काढू नये म्हणून मोर्चेबांधणी केली होती.पाणीपुरवठा सुरळीत होईल तुम्ही मोर्चा काढू नका अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन मोर्चा दाबण्याचा पोलिसांच्या वतीने प्रयत्न झाला.मोर्चा काढला तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू अशा स्वरूपाची दटावणी देखील करण्यात आली होती.पोलीस प्रशासनाचा हा रवय्या पाहता आमदार बाळाराम पाटील यांनी पोलिस प्रशासनाला देखील कानपिचक्या देत आडातच नाही तर तुम्ही कुठं पाणी देणार ? अशी विचारणा केली.हिम्मत असेल तर तुम्हीच चाळीस एमएलडी पाणीपुरवठा करून दाखवा असे आव्हान देखील त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले.आमदार बाळाराम पाटील यांचा आक्रमक पवित्रा पाहता त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन उभे राहण्या शिवाय पोलिसांकडे दुसरा पर्याय शिल्लक राहिला नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.