महानगर पालिकेतील कर्मचारी यांना कोव्हिड काळात वाढीव दैनंदिन भत्ता व आरोग्य सुरक्षा कवच देण्याची मागणी
पनवेल महानगरपालिका कर्मचारी सेना अध्यक्ष यतिन देशमुख यांनी केली मागणी
सिटी बेल लाइव्ह / पनवेल #
महानगर पालिकेतील कर्मचारी यांना कोव्हिड काळात वाढीव दैनंदिन भत्ता व आरोग्य सुरक्षा कवच देण्यात यावे अशी मागणी पनवेल महानगरपालिका कर्मचारी सेना अध्यक्ष यतिन देशमुख यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात देशमुख यांनी म्हटले आहे की, कोव्हिड सदृश परिस्थितीमध्ये आपल्या महानगरपालिकेमार्फत वेळोवेळी अनेक धाडसी निर्णय घेत परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बऱ्याच वेळा काही निर्णयांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शवत काही सूचना देखील मांडल्या आहेत व आपण त्याचा सकारात्मक विचार करून तोडगा काढला आहात. या सर्व गोष्टी मध्ये परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी महत्वाची भूमिका हि आपल्या महानगर पालिकेतील कर्मचारी व अधिकारी वर्गाने केलेली आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुकच आहे.
परंतु त्यांच्या या कार्याला महानगर पालिकेकडून दाद दिली गेली नसल्याचे लक्षात आले. आपले कामगार वाढीव तास काम करूनही त्यांना त्याचा मोबदला दिला जात नाही. तसेच कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आरोग्य विमा कवच देण्यात आलेला नाही. कामगारांचा हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच आग्रही राहिली आहे. आपण पनवेल महानगर पालिकेतील क्मचारी यांना इतर महानगरपालिके प्रमाणे रु.३००/- वाढीव दैनंदिन भत्ता व ५० लाख पर्यंत आरोग्य सुरक्षा कवच देऊन त्यांचा सन्मान करावा अशी आम्ही आपणास आग्रही विनंती करत आहोत.






Be First to Comment