Press "Enter" to skip to content

पंचनाम्याचे सोपस्कर पार करण्यापूर्वी सरसकट सर्व शेतकर्‍यांना 50 हजार रुपये मदत द्या

जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड. रेवण भोसले यांची मागणी

सिटी बेल | उस्मानाबाद |

मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात पावसाने कहर केला असून हातातोंडाशी आलेले पीक तर उद्ध्वस्त झालं असून घरादाराचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाल आहे ,आधीच कोरोना संसर्ग व नंतर अतिवृष्टीने शेतकरी पार कोलमडला आहे ,त्यामुळे आता पोकळ आश्वासने व पंचनाम्याचे सोपस्कर पार करण्यापूर्वी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला व शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयाची तात्काळ मदत द्यावी तसेच मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राला मोठा फटका बसला असल्यामुळे शासनाने ओला दुष्काळही तातडीने जाहीर करण्याची मागणीही जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड. रेवण भोसले यांनी केली आहे.

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत भीषण परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भ, मुंबई, ठाणे व राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. राज्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असून सोयाबीन व कापसाचे अतोनात नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील जवळपास प्रत्येक धरण -बंधारा ‘ओव्हरफ्लो’ झाला आहे. एकट्या मराठवाड्यात 37 जणांचा मृत्यू झाला असून पाच हजारावर जनावरे दगावली आहेत.

यंदाच्या पावसाळ्यात महापुराने सुमारे साडेचारशे पेक्षा अधिक लोकांचा बळी घेतला आहे. वीस लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले आहे. राज्यातील नदी-नाले, धरणे- बंधारे तुडुंब भरली असली तरी लाखो एकर शेती उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. आकस्मिक संकटांनी शेतकरी ,कष्टकरी, हातावर पोट असणारे घटक पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या’ गुलाब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या पाऊस पडत असून काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे.

लाखो शेतकऱ्यांचे या पावसामुळे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे शासनाने पॅकेज देण्याची अत्यंत गरज आहे .खरीप हंगाम धोक्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत करावी तसेच शेतकऱ्याकडे असणारे संपूर्ण कर्ज माफ केले तरच उध्वस्त झालेला शेतकरी पुन्हा उभा राहील असे स्पष्ट मतही ॲड भोसले व्यक्त केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.