काँग्रेस करणार जुलमी राजवटीचा निषेध
सिटी बेल | पनवेल |
देशातील जनतेला भरमसाठ खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपच्या हुकूमशाही राजवटीने आणलेल्या शेतकरी विरोधी तीन काळ्या कायद्यांमुळे संपूर्ण देशाची आर्थिक स्थिती पूर्णतः ढासळली आहे. हे कायदे मागे घ्यावेत म्हणून जगाचा पोशिंदा गेल्या ११ महिन्यांपासून दिल्लीत ठाण मांडून बसलेला आहे, तरी या जुलमी सरकारला त्यांची कीव येत नाही. उलट त्यांचा क्रूर पध्दतीने छळ केला जात आहे. ही बाब केंद्रातल्या भाजप सरकारसाठी निर्लजास्पद आहे.
तसेच केंद्रातील मोदीच्या कपटी सरकारने या देशातील सर्व सरकारी यंत्रणा ताब्यात घेऊन देश बर्बादीचा घाट घातला आहे. देशातील सर्व सार्वजनिक उपक्रम जसे रेल्वे, बँका, विमानसेवा, रस्ते, विमा कंपन्या, सार्वजनिक उद्योग, दुरसंचार आणि बंदरे इत्यादी एक-एक करून विकत आहे. अलिकडेच विक्री झालेल्या बंदरातून मोठ्या प्रमाणात तस्करी झाली आहे. अदानीच्या मालकीच्या गुजरातमधील मुंद्रा बंदरातून २१ हजार कोटी किंमतीच्या ड्रग्जची तस्करी सापडली आहे. अशा अंमली पदार्थांच्या तस्करीतून देशातील तरूणाई मोदी सरकार संपवायला निघाले आहे. तरूणांना दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देऊ असे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारने असलेल्याही नोकऱ्या संपुष्टात आणल्या आहेत. या अशा मार्गाने देशातला तरूण बेरोजगार करुन त्याला देशोधडीला लावण्याचा प्रयत्न मोदीच्या कटकारस्थानी सरकारकडून सातत्याने सुरू आहे.
त्याचप्रमाणे दिवसेंदिवस कृत्रिम महागाई निर्माण करून अदानी अंबानी सारख्या उद्योगपत्यांचे खीसे भरण्याची खेळी मोदी सरकारकडून सूरू आहे. या महागाईच्या झळीत सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. एकीकडे खोट्या विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे महागाई वाढवून, देशातल्या सर्व संवैधानीक संस्था ताब्यात घेऊन सार्वजनिक संस्था विकून शेतकरी व सर्वसामान्यांना देशोधडीला लाववण्याचे पाप भाजप सरकार करीत आहे. या जुलमी व अत्याचारी भाजप सरकारच्या विरोधात देशातील सर्व शेतकरी संघटना, डाव्या आघाड्यांनी तीव्र आवाज उठविला असून २७ सप्टेंबर रोजी देशव्यापी बंद ची हाक दिली आहे.
भारतीय काँग्रेस यात सहभागी होणार असून या जुलमी राजवटीला सत्तेतून खाली खेचण्याची वेळ आली असल्याचे काँग्रेस चे पनवेल जिल्हा अध्यक्ष आर सी घरत यांनी सांगितले.पनवेल काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.त्यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कमांडर कलावत,रायगड जिल्हा युवा काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे,रायगड जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा निर्मला ताई म्हात्रे,रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सतिश गायकवाड,नवीन पनवेल अध्यक्ष राहुल जानोरकर,माजी नगरसेवक लतीफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते.







Be First to Comment