लॉकडाऊनचा फायदा घेत न्यायालयाचे स्थगिती आदेश धुडकावून नागोठण्यात बांधकाम ?
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
रोहा येथील कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने दिलेले स्थगिती आदेश धुडकावून नागोठण्यात लॉक डाऊनचा फायदा घेत नागोठण्यातील असगर मांडलेकर यांनी बांधकाम करण्यात आल्याची तक्रार नागोठण्यातील एक नागरिक व या प्रकरणातील अर्जदार अब्दुल नसीर इब्राहीम फामे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली असून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. तर आपण केलेले बांधकाम हे न्यायालयाने स्थगिती आदेश देण्यापूर्वीच केले असल्याने न्यायालयाचा अवमान होण्याचा प्रश्नच येत नाही असा खुलासा या प्रकरणातील प्रतिवादी असगर मांडलेकर यांनी केले आहे.
नागोठण्यातील अब्दुल नसीर फामे रा. वरचा मोहल्ला, पठाण बिल्डींग यांचे नागोठण्यातील मांडलेकर मोहल्ल्यात सिटी सर्वे क्र. ४५० मधील क्षेत्रात ग्रामपंचायत असेसमेंट क्रं. ८७ हे जुने घर आहे. तर फामे यांच्या या मिळकतीच्या पूर्वेला शौकत हसनमिया मांडलेकर व असगर हसनमिया मांडलेकर या बंधूंचे सिटी सर्वे क्र. ४५१ मधील क्षेत्रात जुने घर आहे.
मांडलेकर यांच्या घरा शेजारीच त्यांच्या मालकीची जागा आहे. या जागेवरच त्यांनी ग्रामपंचायतीची बांधकाम परवानगी घेवून इमारतीचे बांधकाम केले आहे. मात्र हे बांधकाम करीत असतांना आमच्या जागेतील हद्द कायम करून दिलेले सिमेंटचे सर्व खांबे व आमच्या हद्दीतील झाडे तोडून तसेच आमच्या जुन्या घरापासून पाच फुट अंतर न ठेवता बांधकाम केल्या प्रकरणी फामे यांनी रोहा येथील कनिष्ट स्तर दिवाणी न्यायालयात रे.मु.नं. ३७/२०१८ अन्वये दावा दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयाने सदर इमारतीच्या केवळ दुसऱ्या मजल्यापर्यंत भिंत व इतर बांधकाम स्वताच्या जबाबदारीवर करण्याचे व इमारतीचे बांधकाम न उठविण्याचे आदेश प्रतिवादी मांडलेकर बंधू यांना दिले होते.
मात्र मांडलेकर यांनी न्यायालयाचे स्थगिती आदेश धुडकावून या इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचेही बांधकाम केले असल्याने त्यांनी कोरोना विषाणूच्या महामारीच्या काळातील लॉकडाऊनचा फायदा घेत न्यायालयाचा अवमान केला केला असल्याने फामे यांनी रोहा येथील कनिष्ट स्तर दिवाणी न्यायालयात न्यायालयाच्या अवमान केल्या प्रकरणी अन्य दावाही दाखल केला आहे.
याप्रकरणी नागोठण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे यांनी सांगितले की, हे प्रकरण दिवाणी बाब असून न्यायप्रविष्ट आहे. जर न्यायालयाने आम्हास आदेश दिला तरच आम्हाला याप्रकरणी कारवाई करता येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच याच प्रकरणी नागोठणे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर यांनी सांगितले की, या इमारतीचे प्रकरण हे न्यायालयीन बाब असल्याने यामध्ये आम्हाला हस्तक्षेप करता येणार नाही.
तर आपण हे बांधकाम स्थगिती आदेशापुर्वीच केले असल्याचे प्रतिवादी असगर मांडलेकर यांचे म्हणणे असल्याने आता या प्रकरणी न्यायालयात काय निर्णय होतोय याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.






Be First to Comment