Press "Enter" to skip to content

विमानतळ बाधित कोल्ही ग्रामस्थांचा सिडको विरूद्ध आक्रोश : न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार

आधी पुनर्वर्सन द्या आणि मगच प्रकल्प पूर्ण करा : दिलेल्या अश्वासनांना सिडको हरताळ फासत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

👇पहा संपूर्ण पत्रकार परिषद

👆पहा संपूर्ण पत्रकार परिषद

सिटी बेल | पनवेल |

सिडको च्या वतीने उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळासाठी कोल्ही गाव विस्थापित करण्यात आले.यातील बहुतांश नागरीक R3 झोन मध्ये पुनर्वसित झाले आहेत.येथे पायाभूत नागरी सुविधा प्रदान करण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या सिडको प्रशासनाने मंदिरे पाडण्याची नोटीस बजावल्याने ग्रामस्थ भलतेच आक्रमक झाले आहेत.आधी पुनर्वर्सन द्या आणि मगच प्रकल्प पूर्ण करा अशी मागणी कोल्ही पंच कमिटी आणि पुनर्वसन विकास समिती यांच्या वतीने लावून धरण्यात येत आहे.

कोल्ही पंच कमिटी आणि पुनर्वसन विकास समिती यांच्या वतीने R3 झोन मधील लक्ष्मी नारायण मंदिरात आज दिनांक २२ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली.या पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी आपला सिडको प्रती असणारा रोष प्रकट केला. विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांना सिडकोने जोत्याच्या तिप्पट जागा आणि दीड चा एफ एस आय देत तसेच अविकसित,उबजाऊ जमिनींसाठी साडे बावीस टक्के परतावा देत येथील जमिनी अधिग्रहित केल्या.

पुनर्वसन करत असताना सिडकोने गोड बोलून अनेक आश्वासने दिली.आज त्या अश्वासनांना सिडको हरताळ फासत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
१५ सप्टेंबर रोजी सिडकोच्या कार्यकारी अभियंता (विमानतळ) यांनी कोल्ही येथील तीन मंदिरे निष्कासीत करण्याची नोटीस बजावली.त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक भूमिका घेत आहेत.

मुळात जिल्हाधिकारी,धर्मादाय आयुक्त यांचे कडून मंदिरांच्या मिळकतीचे बाबत स्पष्टीकरण देऊन सुद्धा सिडको तोडक कारवाई करू पाहात असल्याने ग्रामस्थांनी सिडकोच्या विरोधात दंड थोपटले आहेत.मंदिरे उभारण्यासाठी सिडको ने भूखंड दिले असले किंवा मंदिर बांधणी साठी १ कोटी रुपये दिले असले तरी देवस्थानांच्या मालकीच्या असणाऱ्या अन्य मिळकतीचे काय ? याबाबत सिडको भूमिका घेत नाही.त्यामुळे देवस्थानांच्या मिळकतीचे बाबत निर्णय आधी घ्या! अशी रोखठोक भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे.

यासोबत येथे नसणाऱ्या नागरी सुविधांचे बाबत ग्रामस्थांनी टाहो फोडला.

ग्रामस्थांच्या मागण्या
कोल्ही गावाचे २६.२० प्लॉट सिडकोने बिनशर्त द्यावे.

शिल्लक घरांची पात्रता लवकरात लवकर देणे

शेतकरी असल्याचा कायमस्वरूपी दाखला तातडीने देणे

विमानतळ बाधित असल्याचा दाखला तातडीने देणे

घराच्या बांधकामाचे सी सी व ओ सी साठी पैसे घेऊ नये,यापूर्वी घेतलेले पैसे परत द्यावेत.

साडेबविस टक्के परतावा अंतर्गत मिळणारे भूखंड अधोरेखित करून घ्यावेत.

पुनर्वसन केलेल्या ठिकाणी सिडकोने मंदिरे,शाळा, समाजमंदिर,प्राथमिक शाळा,प्राथमिक आरोग्य केंद्र,रास्तभाव धान्य दुकान,ग्राम पंचायत कार्यालय, क्रीडांगण, उद्याने,बस थांबा या सुविधा तातडीने प्रदान कराव्यात.

राखीव भूखंड अन्य संस्थांना परस्पर दिले आहेत,ते सर्व भूखंड प्रस्तावित उद्देशासाठीच वापरले जावेत.

पाण्याची वहिनी,सांड पाण्याच्या वाहिन्या यांचे प्रवाह नकाशे जागोजागी प्रदर्शित करावे तसेच त्यांचे तंत्र प्रणाली सर्वांसाठी अवगत करून द्यावी.

कोल्ही गावातील तलावाचा मोबदला देणे.

या पत्रकार परिषदेला मोहन नाईक, धनराज भोईर,मनसुख नाईक,जनार्दन करावकर,प्रकाश नाईक, महेंद्र नाईक, तानाजी भोईर,राहुल नाईक,बबन घरत, गंगाराम नाईक,राम पाटील,कृष्णा नाईक, कृष्णा भोईर,प्रल्हाद नाईक, अमृत भोईर,प्रभाकर नाईक,मधुकर भोईर,हरिभाऊ नाईक,काशीनाथ भोईर,रोहिदास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


ग्रामस्थांच्यात तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती.विशेष म्हणजे हा लढा राजकीय हस्तक्षेप विरहीत असेल अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.
ह्रिषिकेश बाळकृष्ण भोईर यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने भूमि अधिग्रहण कायदा आणि नगरविकास खात्याने जारी केलेल्या शासकीय निर्णयाचा दाखला देत शेतकऱ्यांना भूमी संपादन प्रक्रियेत शासकीय दरातून सूट मिळाली पाहिजे हा मुद्दा मांडला तसेच पुनर्विकासीत जागेत नागरी सुविधा तातडीने द्याव्यात असा जि आर असून सुद्धा सिडको काहीही कामं करत नसल्याचा आरोप केला.
तर निकेत नकुल नाईक या तरुणाने आम्हाला आमच्या गावाची ओळख म्हणजे आमच्या गावचे कोल्ही हे नाव पत्ता लिहिताना आले पाहिजे अशी मागणी केली.R3 ही आमची ओळख होऊ शकत नाही,आमची ओळख पुसण्याचा सिडको प्रयत्न करत असल्याचा त्याने आरोप केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.