सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमिक शाळेच्या दीर्घकाळ मुख्याध्यापिका असणाऱ्या कर्जत मधील पहिल्या महिला डॉक्टरेट असणाऱ्या डॉ. विजया दत्तात्रेय पेठे म्हणजेच पेठे टीचर यांचे अल्पशा आजाराने पनवेल येथील सहस्त्रबुद्धे हॉस्पिटल येथे निधन झाले.
काही दिवसांपूर्वी त्यांना कोव्हीडची बाधा झाली होती परंतु बऱ्या झाल्यावर जुन्या आजाराने तोंड वर काढले. त्यांच्या निधनाने समाजमाध्यमातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. खेळ, संगीत, घोडेसवारी आणि वाड़मयाचा दांडगा व्यासंग असे कितीतरी पैलु असलेली व्यक्ती म्हणून त्या परिचित होत्या. इतरांना या सर्व विषयात प्रोत्साहीत करणं ही त्यांची विशिष्टता होती.
अनेक मंडळाची सुरवात त्यांच्या कल्पनेने व पुढाकारानेच कर्जत मध्ये झाली. स्वानंद महिला मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिला पुरोहित घडवले. महिला जेष्ठ नागरीक संघाच्या बांधणीतून महिलांचा वेळ आनंदात जाऊ लागला. व अनेक उपक्रमांना चालना मिळाली. तसेच लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालय, कर्जत येथील ब्राह्मण सभा, लायन्स क्लब, स्वरश्री संगीत विद्यालय अशा अनेक संस्थांचे अध्यक्षपद त्यानी यशस्वीपणे भुषविले. तसेच अष्टविनायकापैकी एक असणाऱ्या महडच्या गणपती देवस्थानाचे विश्वस्त म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले.
कर्जतमधे इंग्रजी माध्यमाची शाळा हे त्यांचे स्वप्न होते, ते त्यांनी यशस्वीपणे साकार केले. त्यानी दीर्घकाळ मुख्याध्यापिका म्हणून काम केले. त्यांनी एक सतत तेवणारा ज्ञानदीप लावून चिरंतन ज्ञानप्रकाश मागे ठेवला आहे अशी भावना त्यांच्या जुन्या सहकारी सीमा भिडे यांनी व्यक्त केली आहे.
उपक्रमशीलता म्हणजे पेठे टिचर असा त्यांचा लौकिक होता. कर्जत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक, सुरवातीला गणपती फक्त ढोलताशाच्या गजरात जात असे पण गेली काही वर्षे शाळा, अनेक संस्था यांच्या मनोरंजनपर कार्यक्रमांचा सहभाग असलेली शिस्तबद्ध पण मनोहारी मिरवणूक ही पूर्णपणे त्याची कल्पना होती. अशा गुणी व्यक्तिमत्वाच्या जाण्याने कर्जत मध्ये विद्यार्थी वर्गाकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा विवेक, मुलगी वृंदा, सुन,जावई, नातवंडे असा घरपरिवार आहे.







Be First to Comment