सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
मोहोपाडा आळी आंबिवली येथील भालचंद्र हरिभाऊ जाधव (वय ४१)हा मोहोपाडा मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरील गणेश गीध यांच्या दुकानासमोरील विजपोलावरील बंद अवस्थेतील पथदिवा बदलून त्याजागी नवीन पथदिवा लावण्यास पोलावर चढला असता अचानक विजेचा धक्का लागून खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होवून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे.
याबाबत हकिकत अशी की भालचंद्र हरिभाऊ जाधव हा गेल्या काही वर्षे ग्रामपंचायतीचे पथदिवे तसेच विज मंडळाचे विज मीटर लावण्याचे काम करायचा.त्याचे काम चोख असल्याने मोहोपाडा विजवितरणाने भालचंद्रला कंत्राटी कामगार म्हणून सेवेत सामावून घेतले.गणेशोत्सवात कुठेही पथदिवा बंद राहू नये यासाठी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत गेल्या काही दिवस ठिकठिकाणी पथदिवे बदलण्याचे काम सुरू आहे.
यातच मोहोपाडा बाजारपेठेतील गणेश गीध यांच्या दुकानासमोरील पथदिवा कित्येक दिवस बंद अवस्थेत असल्याने त्याजागी नवीन पथदिवा लावावा अशी मागणी नागरिकांनी केली होती.हा पथदिवा बदलण्यासाठी भालचंद्र हरिभाऊ जाधव हा पोलावर चढला.
यावेळी काम सुरू असतानाच विजेचा झटका लागल्याने भालचंद्र जमीनीवर खाली कोसळला.त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने भालचंद्रला ताबडतोब एमजीएम हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.परंतू तपासणीत डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
आळी आंबिवली येथील भालचंद्र जाधवचा मृत्यू झाल्याचे समजताच एमजीएम हाॅस्पिटलमध्ये परिसरातील नागरिकांनी गर्दी केली.व भालचंद्रच्या मृत्यूबाबत घरच्यांना मदत करण्याची मागणी नागरिकांनी विजमंडळाकडे केली. आळी आंबिवली येथील भालचंद्र हरिभाऊ जाधव यांच्या मृत्युनंतर परिसरात शोककळा पसरली असून विज कर्मचाऱ्यांनी आपले काम करताना सुरक्षतेची साधने वापरावीत अशी मागणी होत आहे.








Be First to Comment