Press "Enter" to skip to content

आम्ही राजकारणात नैतिकता पाळतो सत्ताधारी ती पाळत नाहीत : प्रितम म्हात्रे

ठाकूर इन्फ्रा कंपनीला दिलेल्या रस्त्याच्या कामात विरोधात विरोधी पक्षाने आवाज उठविला

विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी दिले स्पष्टीकरण

सिटी बेल | पनवेल |

माझे वडील जे एम म्हात्रे पनवेल नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाची एक हाती सत्ता असतानादेखील संपूर्ण पाच वर्षात त्यांनी कधीही पनवेल नगरपालिकेचे कंत्राट घेतले नाही आणि कंत्राटे घेण्यासाठी स्वतःच्या कंपनीचा राजीनामा दिला नाही. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी देखील पनवेल महानगरपालिकेचा विरोधी पक्ष नेता म्हणून काम करत असताना पनवेल महानगरपालिकेच्या कामासाठी कधीही निविदा घेतल्या नाहीत आणि कंत्राटे घेण्यासाठी मी माझ्या कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला नाही. हि राजकारणातली नैतिकता आम्ही पाळली आहे. परंतु दुर्दैवाने सभागृह नेते परेश ठाकूर यांनी ही नैतिकता न पाळता स्वतःच्या घरच्या कंपनीला कोट्यावधींचे कंत्राट दिले आणि केवळ आपण कायद्यात फसू नये याकरता ते स्थायी समितीच्या बैठकीत तटस्थ राहिले. अशी बोचरी टीका विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

ठाकूर इन्फ्रा कंपनीने पनवेल महानगरपालिके अंतर्गत असलेल्या रोहिंजण येथील रस्त्याचे 26 कोटी रुपयांचे काम घेतले. सदरचे काम महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आले. हा मुद्दा गेले दोन दिवस पनवेलमध्ये चर्चिला जात आहे. त्यातच स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते आणि विरोधी पक्षांचे नगरसेवक देखील उपस्थित असताना त्यांनी विरोध का केला नाही ? असा सवाल देखील विचारला जात होता. यावर स्पष्टीकरण देण्यासाठी आज विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी आपल्या दालनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सतीश पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस तथा नगरसेवक गणेश कडू, नगरसेवक रवींद्र भगत, नगरसेवक अरविंद म्हात्रे उपस्थित होते.

दोन दिवसापूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत जे 46 विषय मंजूर करण्यात आले त्यातील 36 विषय हे महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी सातत्याने गेल्या साडेचार वर्षामध्ये महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून व पत्रव्यवहार करून केलेल्या मागणीनुसार मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे त्याचे श्रेय सत्ताधार्‍यांनी घेवू नये असे देखील प्रितम म्हात्रे यांनी सांगितले.

दोन दिवसापूर्वी कळंबोली, तळोजा, नावडे, धानसर, रोहिंजण आदी पट्ट्यातील अनेक विषय मंजूर करून घेण्यात आले आहेत. परंतु या विषयाचा पाठपुरावा महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी केलेला आहे. आता फक्त हे विषय मंजूर करून घेवून नारळ फोडण्याचे काम सत्ताधारी करणार आहेत. जनता सुज्ञ असून महाविकास आघाडीचे काम त्यांच्या समोर असल्याने जनतेला सामोरे कसे जायचे ? त्यामुळे सत्ताधार्‍यांनी हे विषय मंजूर करून घेतल्याचे मत विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी नगरसेवक सतीश पाटील यांनी सुद्धा सत्ताधार्‍यांवर तोंडसुख घेताना आम्ही केलेल्या मागणीचे श्रेय सत्ताधारी घेत असल्याचे त्यांनी सांगितले. तर यावेळी नगरसेवक गणेश कडू यांनी शौचालय व साफसफाईच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचे त्यांनी सांगितले व या संदर्भात आम्ही न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यावेळी वेगवेगळ्या नागरी सुविधांसंदर्भात तसेच पनवेल महानगरपालिकेतील भ्रष्टाचारा संदर्भात अनेक विषयांची माहिती नगरसेवक अरविंद म्हात्रे व रवींद्र भगत यांनी यावेळी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.