Press "Enter" to skip to content

कर्जत तालुक्यात 2609 गौरींचे पूजन, सुवासिनींनी घेतला गौरीचा ओवसा

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

रायगड जिल्ह्यात गौरी गणपती सणाला फार महत्व आहे. या सणाला कुठेही असलेला माणूस आपल्या घरी येतो. गणरायाच्या प्राणप्रतिष्ठे नंतर दोन-तीन दिवसांनी गौरीचे आगमन होते. काही ठिकाणी फुलांच्या तर काही ठिकाणी मूर्तीच्या गौरींचे पूजन करण्यात येते. त्यानंतर घरातील व शेजारील सुवासिनी गौरीचा ओवसा घेतात. यंदा कोरोनाच्या सावटाखाली हा सोहळा पार पडला. यंदा कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1346, नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1252, माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीत 11 अशा 2609 गौरींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

गणेश चतुर्थीला श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. कुणी दीड दिवसांनी, कुणी पाच दिवसांनी, कुणी गौरींबरोबर, कुणी वामन नवमी तर कुणी अनंत चातुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन करतात. मात्र गौरींचे आगमन एकाच वेळी होते. कुणी मूर्तीची गौर पूजतात तर कुणी आदल्या दिवशी पहाटेच रानात जाऊन गौरी पूजनाच्या पूर्व संध्ये पर्यंत कचोऱ्याची फुले ( गौरीची फुले ) व तेरड्याच्या फुलांसकटच्या फांद्या आणतात. त्यानंतर महिला रात्रभर गाणी गात गौर सजवण्यात गुंततात साडी नेसवून गौर सजवून त्यावर मुखवटा आणि पुठ्ठ्याचे हात लाऊन खुर्चीवर गौर बसवितात. कुणाच्या उभ्या गौरी तर कुणाच्या नाचऱ्या गौरी असतात. त्यांचे पूजन मात्र सारख्याच पद्धतीचे असते.

दुपारी गौरीचे पूजन झाल्यावर घरातील सुवासिनी नटून थाटून सुपामध्ये पूजेचे साहित्य घेऊन गौरीचा ओवसा घेतला. विशेष म्हणजे नववधूने हा ओवसा घेतलाच पाहिजे असे परंपरेनुसार ठरलेले आहे. या वेळी त्यांनी उकडलेल्या पिठांचे दिवे लाऊन गौरींना ओवाळले. या सोहळ्याचा आनंद बहुतांश घरातील सुवासिनींनी घेतला. बऱ्याच ठिकाणी केवळ गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. गौर आणली जात नाही. काहींची गौर एकच असते अशा ठिकाणी सारे कुटुंबीय गौराई असलेल्या मोठ्या घरी एकत्रित झाले आणि गौरी पुजानाचा आनंद लुटला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.