श्रीवर्धन बागमंडला फीडरवरील बागमंडला, दांडा, वडशेत वावे, जावेळे गावे पुन्हा प्रकाशमान-वीजपुरवठा पूर्ववत

सिटी बेल लाइव्ह / संजय कदम / रायगड #
‘निसर्ग’ चक्रीवादळात श्रीवर्धन येथे उध्वस्त झालेली महावितरणची वीज यंत्रणा पूर्वपदावर आण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र परिश्रम करून अनेक भागाचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे. श्रीवर्धन येथील बागमंडला फीडरवरील बागमंडला,दांडा, वडशेत वावे, जावेळे गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.भांडूप परिमंडलच्या मुख्य अभियंता, सुरुवातीपासून रायगड जिल्ह्यातील विविध भागात होत असलेल्या महावितरणच्या कामाची पाहणी करून मनुष्यबळ व साहित्याचे नियोजन करीत आहेत. तसेच प्रत्येक गावात जाऊन फीडरवर सुरु असलेल्या कामाची पाहणी करून वीज पुरवठा लवकरात लवकर सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत.
अतिशय कठीण डोंगराळ दुर्गम भाग असलेले श्रीवर्धन तालुक्यातील एकूण 80 गावांपैकी बहुतांश गावे प्रकाशमान करण्यात महावितरणने यश मिळविले आहे. या फीडरच्या कामात अनेक अडचणी येत होत्या. परंतु, महावितरणने नेहमी ग्राहक सेवेला प्राधान्य देऊन काम केले आहे. मागील कित्येक दिवस येणाऱ्या अडचणींना दुर्लक्ष करून महावितरणचे अधिकारी व कर्मचारी युद्धपातळीवर काम करीत आहेत. या डोंगराळ भागात 27 उच्चदाब खांब, 6 वितरण रोहित्र व 94 लघुदाब खांब ची उभारणी करून बागमंडला,दांडा, जावेळे, वडशेत वावे गावांचा वीजपुरवठा पुन्हा सुरु केला आहे.
अधीक्षक अभियंता, पेण, श्री.दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, गोरेगावचे कार्यकारी अभियंता श्री.अप्पासाहेब खांडेकर व विशेष नियुक्तीवर आलेले अतिरिक्त कार्यकारी अभियंता, ठाणे, श्री. व्यंकटेश कासल यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहे. कनिष्ठ अभियंता श्री.आदित्य जाधव सह हरिहरेश्वर शाखाचे लाईन स्टाफ श्री.अनिकेत व श्री.डाफळे यांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्यात मोलाची मदत केली आहे. याकामासाठी कंत्राटदार, मे. भगवती इलेकट्रीकल्स, मे. स्टार रिवाइंडर्स, मे. अर्णव इलेकट्रीकल्स व मे. रुपाली इलेकट्रीकल्सची नियुक्ती अधीक्षक अभियंता, पेण, श्री. दीपक पाटील यांच्याद्वारे करण्यात आली होती. कार्यकारी अभियंता, गोरेगाव श्री. खांडेकर यांनी श्रीवर्धन उपविभागातील या सर्व गावांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत करण्याकरिता विशेष परिश्रम घेतले आहेत.






Be First to Comment