पाकिस्तानकडून तालिबान्यांचा काश्मीरमध्ये वापर होण्याची शक्यता; भारतीय सैन्य सडेतोड उत्तर देण्यास सक्षम ! – ब्रिगेडियर हेमंत महाजन
सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
अफगाणिस्तानमध्ये घडवून आणण्यात आलेल्या सत्तापालटाच्या मागे पाकिस्तानची मोठी भूमिका आहे. तेथे लढणार्या 50-60 हजार तालिबानी आतंकवाद्यांच्या सोबत पाकिस्तानचे 30-40 हजार सैन्य आणि सैन्याधिकारी आहेत. ते तालिबान्यांना नेतृत्व देण्याची भूमिका बजावत आहेत.
तालिबानसमोर बलाढ्य अमेरिका, तसेच 3 लाख अफगाणिस्तानी सैन्याला माघार घ्यावी लागल्यामुळे त्यांची हिंमत वाढली आहे. त्यामुळे पाकिस्तान पुढे या तालिबान्यांचा वापर काश्मीरमध्ये आतंकवादी कारवायांसाठी करण्याची शक्यता आहे. असे असले, तरी यापूर्वी ‘ऑपरेशन जिब्राल्टर’ आणि अन्य युद्धांच्या वेळी पाकिस्तानने पठाण, पख्तूनच्या 15-20 हजार कडवट आतंकवादी टोळ्यांच्या साहाय्याने भारतावर आक्रमण केले होते. तेव्हा भारतीय सैन्याने हजारो आतंकवाद्यांना मारून त्यांना पिटाळून लावले होते.
हवाई लढाई करणारे अमेरिकी सैन्य आणि शस्त्र खाली ठेवणार्या अफगाणिस्तानी सैन्याप्रमाणे भारताचे सैन्य नाही. भारतील सैन्य मैदानात उतरून सडेतोड उत्तर देणारे असल्यामुळे काश्मीरमध्ये तालिबान्यांनी आक्रमण केल्यास त्याला चोख उत्तर दिले जाईल, असे स्पष्ट प्रतिपादन सैन्याचे 18 गॅलेंट्री पुरस्कार मिळालेले (सेवानिवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘तालिबान : भारतासमोरील नवी आव्हाने !’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते. हा कार्यक्रम 13 हजार लोकांनी पाहिला.
या वेळी बोलतांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले की, समाजवादी पार्टीचे खासदार शफीकुर्रहमान बर्क, तसेच मुनव्वर राणा आणि स्वरा भास्कर यांनी अप्रत्यक्षपणे तालिबानची बाजू घेऊन भारताला आतंरराष्ट्रीय स्तरावर अपकीर्त केले आहे. खरेतर हा लोकशाही आणि सेक्युलिरीझम यांचा पराभव आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी आतंकवाद्यांची अमानवी कृत्ये पाहिल्यावरही ‘संयुक्त राष्ट्र संघ’ गप्प आहे. तो काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना हाकलून दिल्यावरही गप्प होता. आज भारतात अनेक ठिकाणी मिनी पाकिस्तान निर्माण झाले आहेत. हिंदूंचे रोज पलायन होत आहे. अशा वेळी तालिबानमुळे भारतासमोर निर्माण झालेल्या संकटाचा आता सर्वच हिंदूंनी एकत्र येऊन मुकाबला केला पाहिजे. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा वापर करून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी लढा द्यावा लागणार आहे.
भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय महासचिव श्री. अनिल धीर म्हणाले की, फ्रान्स आणि इस्त्रायल यांनी मुसलमानांवर अत्याचार केल्याचा आरोप करत जगभरातील मुसलमान त्यांच्या निषेधासाठी हिंसक मोर्चे काढतात; मात्र अफगाणिस्तानात तालिबानी आतंकवादी मुसलमानांना निर्दयपणे मारत असतांना हे सर्वजण गप्प का आहेत ? ही इस्लामी देश आणि संघटना यांची दुटप्पी भूमिका आहे, ढोंगीपणा आहे. आज तालिबानमधील भूमिकेवरून पाक आणि चीन खूश असले, तरी उद्या ते अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही.








Be First to Comment