Press "Enter" to skip to content

सिटी बेल आध्यात्म विषेश : जाणुन घ्या चातुर्मासाचे महत्त्व

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

वर्षाऋतूच्या चार मासांना ‘चातुर्मास’ म्हणतात. या वर्षी २० जुलैला (आषाढ शुद्ध एकादशीपासून) चातुर्मास आरंभ झाला असून १५ नोव्हेंबरला (कार्तिक शुद्ध एकादशीला) चातुर्मासाची समाप्ती होईल. पृथ्वीवरील रज-तम वाढल्याने या कालावधीत सात्त्विकता वाढवण्यासाठी चातुर्मासात व्रतस्थ राहावे, असे शास्त्र सांगते. या चार मासांच्या काळामध्ये श्रीविष्णु शेषशय्येवर योगनिद्रा घेत असतो. चातुर्मासास विष्णुशयन म्हटले जाते. तेव्हा श्रीविष्णु क्षीरसागरात शयन करतो, असे समजतात. श्रीविष्णूच्या उपासनेसाठी हा काळ उत्तम मानला जातो. सर्व तीर्थस्थाने, देवस्थाने, दान आणि पुण्य चातुर्मास आल्यावर श्रीविष्णूच्या चरणी अर्पण होतात. चातुर्मासाचे विविध दृष्टीकोनातून असलेले महत्त्व सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून जाणून घेऊया.



1. चातुर्मासाचे महत्त्व : देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. ‘असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे’, असे धर्मशास्त्र सांगते –



वार्षिकांश्चतुरो मासान् वाहयेत् केनचिन्नरः ।

व्रतेन न चेदाप्नोति किल्मिषं वत्सरोद्भवम् ।।


अर्थ : प्रतिवर्षी चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे, अन्यथा त्याला संवत्सरोद्भव असे पातक लागते.’

2. चातुर्मासातील व्रतवैकल्यांचे महत्त्व : श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक या चार मासांत (चातुर्मासात) पृथ्वीवर येणार्‍या लहरींत तमोगुण अधिक असलेल्या यमलहरींचे प्रमाण अधिक असते. त्यांना तोंड देता यावे; म्हणून सात्त्विकता वाढवणे आवश्यक असते. सण आणि व्रते यांद्वारे सात्त्विकता वाढत असल्याने चातुर्मासात जास्तीतजास्त सण आणि व्रते आहेत. चातुर्मासात (चार मास) व्रतस्थ राहायचे असते.

सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात. पर्णभोजन (पानावर जेवण करणे), एकभोजन (एक वेळेस जेवणे), अयाचित (न मागता मिळेल तेवढे जेवणे), एकवाढी (एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणे), मिश्रभोजन (सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणे) इत्यादी भोजननियम करता येतात.’ ‘कित्येक स्त्रिया चातुर्मासात ‘धरणे-पारणे’ नावाचे व्रत करतात. यात एक दिवस भोजन आणि दुसर्‍या दिवशी उपवास, असे सतत चार मास करायचे असते. कित्येक स्त्रिया चातुर्मासात एक किंवा दोन धान्यांवर रहातात. काही एकभुक्त रहातात. देशपरत्वे चातुर्मासातले असे विविध आचार दृष्टीस पडतात.

पावसाळ्यात आपण आणि सूर्य यांच्यात ढगांचा एक पट्टा निर्माण झालेला असतो. त्यामुळे सूर्याचे किरण, म्हणजे तेजतत्त्व, तसेच आकाशतत्त्व एरव्हीइतके पृथ्वीवर पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे वातावरणात पृथ्वी आणि आप तत्त्वांचे प्राबल्य वाढलेले असते. त्यामुळे वातावरणातील विविध जंतू, रज-तम किंवा काळी शक्ती यांचे विघटन न झाल्यामुळे या वातावरणात साथीचे रोग पसरतात आणि आळस किंवा मरगळ जाणवते. व्रतवैकल्ये करणे, उपवास करणे, सात्त्विक आहार घेणे आणि नामजप करणे यांमुळे आपण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या रज-तमाचा प्रतिकार करण्यास सक्षम होतो; म्हणून चातुर्मासात व्रतवैकल्ये करतात.

3. चातुर्मासातील उपवासाचे महत्त्व
चातुर्मासात एकाच प्रकारच्या अन्नाचे भोजन करणारा मनुष्य निरोगी रहातो. केवळ एकवेळ भोजन घेणार्‍याला बारा यज्ञांचे फळ मिळते. जो केवळ पाणी पिऊन रहातो, त्याला प्रतिदिन अश्वमेघ यज्ञाचे फळ मिळते. जो केवळ दूध किंवा फळ खाऊन रहातो, त्याची सहस्रो पापे तात्काळ नष्ट होतात. जो पंधरा दिवसांतून एक दिवस उपवास करील, त्याच्या शरिरातील अनेक दोष नष्ट होतात आणि चौदा दिवसांमध्ये त्याच्या शरिरात भोजन केल्यानंतर जो रस निर्माण होतो, त्याचे शक्तीत रूपांतर होते; म्हणून एकादशीचा उपवास महत्त्वपूर्ण असतो. हे चार मास नामजप आणि तपस्या यांच्यासाठी अतीयोग्य आहेत.

सण, व्रते अन् उत्सव केवळ रूढी म्हणून साजरे न करता त्यांमागील धर्मशास्त्र जाणून घेऊन साजरे केले, तर ते अधिक श्रद्धेने साजरे केले जाऊन त्यामुळे चैतन्यही मिळते. हे ‘धर्मशास्त्र’ या ग्रंथात दिले आहे. चातुर्मासातील सण, व्रते अन् उत्सवही धर्मशास्त्रानुसार साजरे करून ईश्वरी कृपा संपादन करूया.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.