गुरु, शनि, हर्षलादी ग्रहांमधील योग राक्षसगणी नक्षत्रांमध्ये होतात, तेव्हा नैसर्गिक आपत्ती, राजकीय स्थित्यंतरे, युद्ध अशा घटना घडतात ! – ज्योतिष विशारद श्री. राज कर्वे
सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
प्राचीन भारतीय ऋषिमुनींनी नक्षत्रांचे गुणधर्म ओळखून सत्त्वगुणी नक्षत्रांना देवगणी, राजसिक नक्षत्रांना मनुष्यगणी आणि तमोगुणी नक्षत्रांना राक्षसगणी अशा संज्ञा दिल्या आहेत. राक्षसगणी नक्षत्रे ही व्यक्तीगत सौख्याच्या दृष्टीने साधारणपणे प्रतिकूल ठरतात; परंतु कर्तृत्व, अधिकार, प्रतिष्ठा आणि भौतिक उत्कर्ष या दृष्टीने अनुकूल ठरतात. मेदिनीय (राष्ट्रीय) ज्योतिषात राक्षसगणी नक्षत्रांची (कृत्तिका, धनिष्ठा, मूळ इत्यादी तमोगुणी नक्षत्रांची) भूमिका महत्त्वाची ठरते. गुरु, शनि, हर्षल आदी मोठ्या ग्रहांमधील योग जेव्हा राक्षसगणी नक्षत्रांमध्ये होतात, तेव्हा राष्ट्रीय स्तरावर नैसर्गिक आपत्ती, राजकीय स्थित्यंतरे, युद्ध अशा घटना घडतात.
हे गेल्या ५०-६० वर्षांत भारतात घडलेल्या ठळक घटनांचा ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोनातून वेध घेतांना आम्हाला लक्षात आले, असे प्रतिपादन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे ज्योतिष विशारद श्री. राज कर्वे यांनी व्याख्यानाच्या वेळी केले. ते ऑनलाइन ‘ज्योतिष कट्टा व्याख्यानमाले’त ‘राक्षसगणी नक्षत्रांची वैशिष्ट्ये’ या विषयावर बोलत होते. ‘फल ज्योतिष अभ्यास मंडळ, पुणे’ यांनी या व्याख्यानमालेचे आयोजन केले होते.
ज्योतिषशास्त्राच्या संवर्धनासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार ज्योतिषशास्त्रात संशोधन कार्य चालू आहे. जानेवारी २०२० पर्यंत ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने देशभरात १४ हून अधिक ज्योतिष अधिवेशनांमध्ये ज्योतिषशास्त्रावरील निबंध सादर करण्यात आले आहेत.
व्याख्यानाच्या शेवटी श्री. कर्वे म्हणाले की, अनेक संतांनी सांगितल्यानुसार येणार्या काही वर्षांत भारतासह जगभरात भीषण आपत्काळ येणार आहे. त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती, युद्ध इत्यादींच्या माध्यमातून मोठा जनसंहार होण्याची शक्यता आहे. या आपत्काळातून तरून जाण्यासाठी साधना करणे हाच एकमेव उपाय आहे. ‘कलियुगात नामजप ही सर्वोत्तम साधना आहे’, असे अनेक संतांनी सांगितले आहे.
Be First to Comment